संरक्षण मंत्रालय
परिचालन कार्यक्षमता बळकट करण्याकरिता क्षेत्र कमांडर्सच्या वित्तीय मर्यादेत दुप्पटीने वाढ करण्याला संरक्षण मंत्र्यांची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2026 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 4 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण दलांसाठी सुधारित वित्तीय अधिकारांचे प्रत्यायोजन जाहीर केले. यामध्ये वैद्यकीय आणि बांधकाम प्रकल्पांचाही समावेश आहे. या सुधारणांनुसार वित्तीय अधिकारांमध्ये 100% पर्यंत वाढ करण्यात आली आहे तर काही बाबतीत दुप्पटीपेक्षाही अधिक वाढ करण्यात आली आहे. यामुळे क्षेत्र कमांडर्सची परिचालन कार्यक्षमता अधिक बळकट होईल आणि करार जलदगतीने पूर्ण होण्यास तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होण्यास मदत होईल.
परदेशी उपकरण निर्मात्यांवरील अवलंबित्व कमी करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी लष्करी परिसंस्थेअंतर्गत स्वदेशीकरण तसेच संशोधन आणि विकासासाठी प्रदान केलेले वित्तीय अधिकार दुप्पट करण्यात आले आहेत. वित्तीय अधिकारांच्या या सुधारणांमुळे, चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार महसुली मार्गाने 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी सुलभ होईल.
लष्कर/वायुसेना/नौदल कमांडर्सना प्रदान केलेल्या विशेष वित्तीय अधिकारांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली असून तातडीच्या कार्यान्वयन गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध एकूण कमाल मर्यादेत 100% वाढ करण्यात आली आहे. या वाढीव्यतिरिक्त, प्रमुख सेवा दलामार्फत संयुक्त सेवा खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. वस्तू आणि सेवांच्या खरेदीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी अनेक नवीन सक्षम वित्तीय प्राधिकरणांची स्थापना करण्यात आली आहे.
यापूर्वीचे वित्तीय अधिकार 2021 मध्ये अधिसूचित करण्यात आले होते. सैन्यदलांच्या वाढलेल्या आकारमानामुळे तसेच कार्यवाही आणि देखभालीवरील वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये झालेल्या वाढीचा विचार करून ही सुधारणा करणे आवश्यक होते.

* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268883)
आगंतुक पटल : 15