विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्ता,डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादनाला प्रमुख प्राधान्य देत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात भविष्यकालीन तंत्रज्ञानामध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर सहमती


केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि दक्षिण आफ्रिकेचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष उपमंत्री डॉ.नोमालुंगेलो जीना यांच्यात द्विपक्षीय बैठक संपन्न

Posted On: 03 JUN 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आज भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली असून, द्विपक्षीय संबंधांच्या पुढील टप्प्यासाठी प्रमुख प्राधान्यक्रम म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रांवर भर देण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष उपमंत्री डॉ. नोमालुंगेलो गिना यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. बैठकीतील चर्चेदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी दोन्ही देशांमधील संबंध केवळ पारंपरिक संशोधन सहकार्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यापलीकडे जाऊन व्यापक आर्थिक आणि सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी सक्षम, नवोन्मेश-आधारित भागीदारींच्या दिशेने नेण्याचे पुढे आवाहन केले.

दक्षिण आफ्रिकेचे मंत्री डॉ. नोमालुंगेलो जीना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत-दक्षिण आफ्रिका सहकार्याचा पुढील टप्पा हा उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष, स्टार्टअप भागीदारी आणि उद्योगाशी संलग्न संशोधनाद्वारे आकाराला यायला हवा. ते म्हणाले की, आपल्या दोन्ही देशांकडे परस्परांना पूरक सामर्थ्य आहे, आणि त्याचा उपयोग करून विकसनशील जगासाठी परवडणारे, विस्तारक्षम आणि समावेशक तांत्रिक उपाय निर्माण करता येतील. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक विशेष भागीदारी आहे, जी सामायिक इतिहास, लोकशाही मूल्ये आणि समावेशक विकासाप्रती असलेल्या समान वचनबद्धतेतून आकाराला आली आहे. 'ग्लोबल साऊथ'चे प्रभावशाली आवाज म्हणून, दोन्ही देश ब्रिक्स इब्सा जी-20  (आणि आयओआरए यासारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, यावरील आंतरराष्ट्रीय चर्चांना दिशा देण्यात अधिकाधिक योगदान देत आहेत, तसेच विविध धोरणात्मक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यालाही पुढे नेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

विज्ञानाचे रूपांतर अशा उपायांमध्ये झाले पाहिजे जे जीवनमान सुधारतील, रोजगार निर्माण करतील आणि अर्थव्यवस्था बळकट करतील, यावर भर देत, त्यांनी दोन्ही देशांमधील संशोधन संस्था, नवोन्मेष संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यात अधिक सखोल भागीदारीचे आवाहन केले. ते म्हणाले की, भविष्यातील सहकार्य केवळ वैज्ञानिक उत्कृष्टतेवरच केंद्रित नसावे, तर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, त्याचे व्यापारीकरण आणि समाजावर होणारे सकारात्मक परिणाम यावरही केंद्रित केले पाहिजे.

या चर्चेचे प्रमुख फलित म्हणजे, भारत-दक्षिण आफ्रिका संयुक्त समिती यंत्रणेअंतर्गत निश्चित केलेल्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये, म्हणजेच प्रगत साहित्य आणि उत्पादन, भू-स्थानिक तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधा, या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्ष केंद्रित केलेल्या या क्षेत्रांचे ठोस सहकार्यात्मक कार्यक्रम आणि परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी परस्परांचे शास्त्रज्ञ, संस्था आणि तंत्रज्ञ यांच्यातील सुसंवादाला गती देण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. दोन्ही नेत्यांनी खगोलशास्त्रातील सहकार्याचाही आढावा घेतला. भारत-दक्षिण आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीतील प्रमुख क्षेत्रांपैकी ते एक आहे.


राधिका अघोर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2268448) अभ्यागत कक्ष : 71