संरक्षण मंत्रालय
जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
31 MAY 2026 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2026
जनरल एन एस राजा सुब्रमणी, पी वी एस एम, ए, वी, एस एम, एस एम, वी एस एम, यांनी आज, 31 मे 2026 रोजी, देशाचे तिसरे संरक्षण दल प्रमुख (सी डी एस) आणि लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांचे अद्वितीय नेतृत्व कौशल्य आणि देशाच्या सामरिक शक्तीत दिलेल्या योगदानाची यथोचित दखल घेत, त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली. संरक्षण दलांप्रती देशाला असलेल्या अतूट विश्वासाविषयी कृतज्ञता व्यक्त करत, जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक समग्र देश या दृष्टिकोनातून सर्व हितसंबंधीयांसोबत मिळून काम करण्यावर भर दिला. सर्व सैन्य दलांममधील सुसूत्रता, एकोपा आणि सामाईक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण काम करू, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, आत्मनिर्भर होण्यासाठी, विकासाची गती वाढवणे आणि अधिकाधिक स्वदेशी शस्त्रास्ते संरक्षण दलात समाविष्ट करणे यावरही आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व हितसंबंधीयांचा क्षमता विकास आणि आधुनिकीकरण साध्य करण्यासाठी, विचार आणि कृती या दोन्हीमध्ये नवी दृष्टी आणि अभिनवता यायला हवी, असे सीडीएस म्हणाले. संरक्षण दलांमध्ये असलेली व्यावसायिक जाणीव, कर्तव्य तत्परता याची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांच्या प्रशिक्षणाविषयीची कटिबध्दता व्यक्त करतांना, माजी ज्येष्ठ सैनिक आणि वीर नारी यांच्या कल्याणाचीही जबाबदारी घेतली जाईल, असे आश्वस्त केले. सैन्यदलातील सर्व श्रेणीतल्या जवानांनी बदलाचा अंगिकार करावा, सैनिकी मूल्ये जपावीत आणि सर्वच क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकात देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. तसेच साऊथ ब्लॉक लॉन इथे सिडीएस यांना तिरंगा ध्वजाची मानवंदना देखील देण्यात आली.

तब्बल चार दशके संरक्षण सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलेले जनरल सुब्रमणी यांच्या कारकिर्दीची सुरुवात डिसेंबर 1985 मध्ये गढ़वाल रायफल्स तुकडीपासून झाली होती. त्यांच्या नेत्रदीपक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदांची जबाबदारी पार पाडली आहे. यात जनरल ऑफिसर कमांडिंग, 2 कॉर्प्स, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सेंट्रल कमांड, आणि आर्मी स्टाफचे व्हाईस चीफ अशा विविध पदांचा समावेश आहे. सिडीएस म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

* * *
नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267923)
अभ्यागत कक्ष : 69