जलशक्ती मंत्रालय
जल संशोधन व नवोन्मेष परिसंस्था बळकट करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र एकत्र
भारताच्या जल नवोन्मेषाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत जल क्षेत्रातील संशोधन व विकास (आर अँड डी) विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
31 MAY 2026 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2026
जलशक्ती मंत्रालयातर्फे 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात जल क्षेत्रातील संशोधन व विकास (आर अँड डी) विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या एकदिवसीय कार्यशाळेला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, तसेच अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव, पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव आणि राष्ट्रीय जल अभियानाचे अतिरिक्त सचिव व अभियान संचालक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे.
सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांचा हा संगम भारताच्या जल संशोधन परिसंस्थेला अधिक बळकट करण्याच्या आणि शाश्वत जल व्यवस्थापनासाठी नवोन्मेषाधारित उपाययोजनांना गती देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे वैज्ञानिक संस्था, धोरणनिर्माते, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप, तांत्रिक संस्था आणि समुदायातील भागधारक यांच्यात अधिक सुसंवाद आणि समन्वय साधला जाईल.
या कार्यक्रमातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे `एमएएचए आॅन वाॅटर` (जल क्षेत्रातील उच्च प्रभाव असलेल्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासासाठी अभियान) या उपक्रमाचा शुभारंभ. जलशक्ती मंत्रालय आणि एएनआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा उपक्रम जलसंपदा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, हवामान लवचिकता आणि जलवापर कार्यक्षमता यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांतील अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देईल. या उपक्रमांतर्गत संशोधन प्रस्तावांसाठी खुली निमंत्रण प्रक्रिया देखील जाहीर करण्यात येईल.
जल क्षेत्रातील उत्पादने आणि नमुना तंत्रज्ञान (प्रोटोटाइप) विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय भारत-वीन पोर्टलअंतर्गत स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमइ) खुली निमंत्रण प्रक्रिया देखील सुरू करणार आहे.
या कार्यशाळेत जल संचय जन भागीदारी : कॅच द रेन(जेएसजेबी:सीटीआर) या सहभागी डिजिटल मंचाचाही शुभारंभ होईल. नागरिक, संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना जलसंवर्धन, पर्जन्यजल संधारण आणि भूजल पुनर्भरण उपक्रमांचे दस्तऐवजीकरण व सादरीकरण करण्यास सक्षम करून समुदाय-आधारित जलसंवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी हा मंच विकसित करण्यात आला आहे. संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज या दृष्टीकोनाला बळ देत हा मंच जनसहभाग, वर्तनात्मक परिवर्तन, स्थानिक सहभाग आणि तळागाळातील नवोन्मेष यांना दीर्घकालीन जलसुरक्षा आणि हवामान लवचिकतेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून प्रोत्साहन देईल.
जलशक्ती मंत्रालय आणि इस्रो यांच्यात जलसंपत्तीचे मूल्यमापन, निरीक्षण आणि व्यवस्थापन यासाठी उपग्रह-आधारित अनुप्रयोग व प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराला बळकटी देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) होण्याची अपेक्षा आहे. यासाठी 24 प्राधान्य अभ्यास आणि सहकार्याची क्षेत्रे आधीच निश्चित करण्यात आली आहेत.
या कार्यशाळेत भूजल व्यवस्थापन, सिंचन पद्धती, नदी आकारशास्त्र, पूर मैदानी क्षेत्र जलमग्न नकाशांकन, हवामान लवचिकता, पर्यावरणीय मूल्यमापन, धरणे व जल रचनांची सुरक्षितता, शहरी जलभांडारांचे नकाशांकन तसेच जल प्रशासनात दूरसंवेदन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध महत्त्वाच्या विषयांवरील तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात येईल.
अंतिम लाभार्थी आणि प्रमुख संशोधक (पीआय) संशोधनाधारित उपक्रमांमधून मिळालेल्या यशस्वी पद्धती, महत्त्वपूर्ण अनुभव आणि ठोस परिणाम यांची माहिती सामायिक करतील. मागील 12 वर्षांत जल क्षेत्रात करण्यात आलेल्या संशोधनाच्या परिणामांचाही आढावा घेतला जाईल तसेच 16व्या वित्त आयोगचक्रासाठी धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि पुढील दिशा यावर चर्चा केली जाईल.
कार्यशाळेसोबतच जल क्षेत्रातील नवोन्मेषी तंत्रज्ञान, संशोधन निष्कर्ष आणि सर्वोत्तम पद्धती यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाद्वारे संशोधन संस्था, स्टार्टअप, एमएसएमइ आणि तांत्रिक संस्था यांना शाश्वत आणि तंत्रज्ञान-सक्षम जल व्यवस्थापनासाठी विकसित केलेली अत्याधुनिक उपाययोजना सादर करण्यासाठी मंच उपलब्ध होईल.
ही कार्यशाळा संशोधनाधारित धोरणनिर्मिती, नवोन्मेष परिसंस्था आणि समुदाय सहभाग यांना धोरणात्मक दिशा देईल, तसेच दीर्घकालीन जलसुरक्षा आणि शाश्वत जल व्यवस्थापनासाठी भारताच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.
यश राणे/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267197)
अभ्यागत कक्ष : 7