भूविज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताच्या पहिल्या 'स्कायकास्ट' प्रणालीचे केले उद्घाटन; भारताने धुक्यापासून मुक्त, हवामान-स्मार्ट विमानचालनाच्या नवीन युगात प्रवेश केल्याचे सिंह यांचे प्रतिपादन
'स्कायकास्ट' विमानचालकाला हवामानाची प्रत्यक्ष काळातली माहिती देईल, त्यामुळे धुके आणि हवेच्या दाबातील बदलामुळे होणारा विमानांचा विलंब, मार्ग बदलणे आणि उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण कमी होईल : डॉ.जितेंद्र सिंह
प्रगत एकात्मिक विमानचालन हवामान देखरेख प्रणाली तैनात करणारा भारत जगातला 19 वा देश बनला आहे : डॉ.जितेंद्र सिंह
Posted On:
29 MAY 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2026
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताच्या पहिल्या "स्कायकास्ट प्रणाली"चे उद्घाटन केले आणि ही भारतीय विमानउड्डाण क्षेत्रातल्या एका नव्या युगाची नांदी असल्याचे सांगितले.
आतापर्यंत जगभरात अशा केवळ 18 प्रगत प्रणाली अस्तित्वात आहेत आणि विमानचालन हवामान देखरेखीसाठी ही एकात्मिक वायुमंडलीय दूरस्थ संज्ञापन प्रणाली स्थापित करणारा भारत आता जगातला 19 वा देश बनला आहे, अशी माहिती सिंह यांनी यावेळी दिली. दिल्लीच्या आयजीआय विमानतळानंतर दुसरी अशी सुविधा जेवर विमानतळावर सुरू केली जाणार आहे, आणि त्यानंतर देशातल्या इतर विमानतळांवर त्याचा विस्तार केला जाईल, असे ते म्हणाले.
हवामान खराब असताना स्कायकास्ट पायलट आणि विमानउड्डाण चालकांना प्रत्यक्ष काळातली माहिती देऊन विमानचालन सुरक्षिततेमध्ये मोठा बदल घडवून आणेल, असे सिंह यांनी सांगितले.
या प्रणाली मुळे भविष्यात धुके आणि हवेच्या दाबातील बदलामुळे उड्डाणांमध्ये येणारे अडथळे लक्षणीयरीत्या कमी होतील, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. ही प्रणाली विमान कर्मचारी आणि चालक यांना सुमारे 3 तासांच्या कमी कालावधीतही आगाऊ सूचना देईल, त्यामुळे त्यांना विमान उतरवण्यागसाठी सर्वात सुरक्षित वेळ ठरवायला मदत होईल आणि विनाकारण मार्ग बदलणे, उड्डाणे रद्द करणे आणि विलंब टाळता येईल, असेही सिंह यांनी सांगितले.
ही सुविधा धावपट्ट्यांवरील देखरेख आणि इशारा देण्याची क्षमता मजबूत करेल, त्यामुळे विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग अधिक सुरक्षित होईल, असे ते म्हणाले.
प्रगत 'बाउंड्री लेअर रडार विंड प्रोफाईलर' हा स्कायकास्टचा मुख्य भाग आहे, तो विमानतळाच्या वर सुमारे 3 किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेच्या दाबातील बदल , वरच्या दिशेचा वेग आणि बाउंड्री-लेअर डायनॅमिक्सचे सतत मोजमाप करतो, असे सिंह यांनी सांगितले. ही परिमाणे विमानाचे उतरणे आणि उतरण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, तिथे अचूक वायुमंडलीय माहिती सुरक्षितता बळकट करायला मदत करते, अशी माहिती सिंह यांनी दिली.
धुके, सूक्ष्मतुषार, हवामान प्रक्षुब्धता, आर्द्रता, दृश्यमानता आणि वायुमंडलीय परिस्थितीचे प्रत्यक्ष काळातले मोजमाप स्कायकास्ट एकाच प्रगत विमानचालन हवामान मापक चौकटीत एकत्र आणते. ही प्रणाली अचूक तात्काळ अंदाज आणि पूर्व इशारा सेवांद्वारे विमानचालक, विमान कंपन्या, विमानतळ चालक आणि हवाई वाहतूक व्यवस्थापन संस्थांना मदत करेल, असे सिंह म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, वैज्ञानिक नवोन्मेष आणि प्रगत हवामान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत “धुकेमुक्त उड्डाणांच्या” युगाकडे वाटचाल करत आहे.
विमानचालनाव्यतिरिक्त, स्कायकास्टची निरीक्षणे प्रगत अंदाज प्रारुपे, कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम निर्णय समर्थन प्रणाली, शहरी हवामानाचा अंदाज, प्रदूषण व्यवस्थापन, वाहतूक सल्लागार आणि आपत्ती सज्जता उपक्रमांसाठी उपयुक्त ठरतील असे सिंह यांनी सांगितले.
'मिशन मौसम' अंतर्गत स्कायकास्ट प्रणाली हवामान-स्मार्ट पायाभूत सुविधा निर्माण करणे, विमानचालन लवचिकता बळकट करणे आणि वैज्ञानिक नवकल्पनांद्वारे अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेची खातरजमा करण्यात भारताची वचनबद्धता दर्शवते, असेही ते यावेळी म्हणाले.





निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266862)
अभ्यागत कक्ष : 8