अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम यांच्यात 5 मे 2026 रोजी , डिजिटल पेमेंट आणि वित्तीय नवोन्मेष अधिक बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या


डिजिटल पेमेंट आणि वित्तीय नवोन्मेष क्षेत्रात द्वीपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठीच्या सामंजस्य करारात, सीमापार पेमेंट व्यवस्था वाढवण्याची तसेच भारताला एक महत्वाचे फिन टेक केंद्र बनवण्याची क्षमता

भारत-व्हिएतनाम यांच्यातील भागीदारी क्यू आर कोड आधारित सीमापार पेमेंट व्यवस्थेचा विस्तार करेल

Posted On: 29 MAY 2026 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

रिझर्व बँक ऑफ इंडिया  आणि  स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम यांच्यात 5 मे 2026 रोजी , डिजिटल पेमेंट आणि वित्तीय नवोन्मेष सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात माहितीचे आदानप्रदान, नियमनातील समन्वय आणि सीमा पार क्यू आर कोड आधारित व्यापारी पेमेंट्स साठी, पेमेंट प्रणाली संपर्क जोडणी या सुविधांचाही समावेश आहे.

दोन्ही देशांमधील वित्तीय नवोन्मेष आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात  द्वीपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी एक भविष्यवेधी आणि महत्वाचे पाऊल म्हणून या सामंजस्य कराराकडे पहिले जात आहे. त्यात, सीमापार पेमेंट संपर्क जोडणी साध्य करत, भारताला फिन टेक चे एक महत्वाचे केंद्र बनवण्याची क्षमता आहे.

वित्तीय नवोन्मेष आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याचे,  भारतीय रिझर्व बैंक आणि व्हिएतनाम स्टेट बैंक यांचे उद्दिष्ट आहे. याद्वारे , संयुक्त नवोन्मेष आणि डिजिटल पेमेंट प्रोग्राम आणि प्रकल्प सुलभ बनवण्याचा  हा प्रयत्न आहे. यात, पेमेंट प्रणालीमध्ये संपर्क जोडणी करून, दोन्ही देशात क्यू आर कोड आधारित व्यापारी पेमेंट शक्य होईल अशी व्यवस्था विकसित करण्याचाही समावेश आहे.

सामंजस्य कराराची थोडक्यात माहीती:

i.हा सामंजस्य करार, हे आरबीआय आणि एसबीव्ही यांच्यातील वित्तीय नवोन्मेष आणि डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील सहकार्यासाठीचे इरादापत्र आहे. या कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमध्ये माहितीची देवाणघेवाण, सहकार्य आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक आराखडा निर्माण करणे हा आहे. हे सहकार्य संबंधित देशांमध्ये लागू असलेले कायदे, नियम आणि विनियमांच्या अधीन राहून केले जाणार आहे.

ii.या सामंजस्य कराराअंतर्गत सहकार्याच्या कक्षेत उदयोन्मुख बाजारपेठेतील नवनवे प्रवाह व घडामोडींविषयी माहितीची देवाणघेवाण, डिजिटल पेमेंट्स आणि नवोन्मेष तंत्रज्ञानातील मानके आणि सर्वोत्तम पद्धती, त्यांच्याशी संबंधित नियामक आराखडा, तसेच वित्तीय सेवांमधील डिजिटल पेमेंट्सच्या विकास आणि देखरेखीचा समावेश आहे.

iii.या करारामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सीमापार व्यापार/व्यवहार अधिक कार्यक्षम, पारदर्शक, सोयीस्कर, वास्तविक वेळेत आणि कमी खर्चात होण्यास मदत होईल. व्यवहारांवरील शुल्काची माहिती आधीच स्पष्टपणे उपलब्ध होईल. तसेच, या उपक्रमामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल व भारतातील उद्योगांना अधिक निर्यात संधी उपलब्ध होतील.

iv.या सामंजस्य करारावर आरबीआय चे डेप्युटी गव्हर्नर आणि एसबीव्हीचे डेप्युटी गव्हर्नर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह कराराचा महत्वाचा प्रभाव

भारतीय रिझर्व बैंक आणि व्हिएतनाम स्टेट बैंक यांच्यातला हा सामंजस्य करार प्राथमिक पातळीवर एक नियामक सहकार्य आराखडा असून,  सुलभ, सुरळीत सीमापार वित्तीय व्यवहार करण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. यातून सहकार्यासाठीची एक यंत्रणा आणि माहितीचे आदानप्रदान करण्यासाठीची व्यवस्था निर्माण होईल. पेमेंट प्रणाली, मेसेज व्यवस्था आणि कार्ड बदलण्याची सुविधाही यामुळे वेगवान होईल.


सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266856) अभ्यागत कक्ष : 10