नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पुरवठा साखळीतील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, जेएनपीए येथे कंटेनर वाहतूक सुलभ करण्याच्या दिशेने सरकारच्या उपाययोजना


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि सर्बानंद सोनोवाल यांनी आयात-निर्यात उद्योगातील भागधारकांबरोबर जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांचा घेतला आढावा

व्यवसाय सुलभता टिकवून ठेवण्यासाठी रेल्वेद्वारे मालाची जलद उचल, हाताळणी शुल्क माफी, ग्रीन चॅनेल्स आणि ट्रेलर पूलिंग यासारख्या उपाययोजना लागू

Posted On: 22 MAY 2026 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर 'व्यवसाय सुलभता' टिकवून ठेवण्यासाठी आणि अखंड व्यापार परिचालन सुनिश्चित करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलत, भारत सरकारने आयात-निर्यात (एक्झिम) समुदायाने उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वित ‘संपूर्ण सरकार’ प्रतिसाद लागू केला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशन'च्या प्रतिनिधींबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच मालाची वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी यासाठी कामकाजातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा केली.

या बैठकीत कंटेनर्सच्या अधिक सुरळीत हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले; कारण आखाती देशांकडे जाणारे कंटेनर्स आता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडे (जेएनपीए) वळवण्यात आले आहेत, त्यामुळे बंदर आणि लॉजिस्टिक्सच्या पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देत, जेएनपीएने टर्मिनल्सवरील ताण कमी करण्यासाठी आणि मालवाहतुकीच्या कामाला गती देण्यासाठी अनेक ऑपरेशनल उपाययोजना लागू केल्या आहेत. मालवाहतूक प्रक्रियेचा वेळ कमी करण्यासाठी एकाच वेळी दोन कंटेनर्सचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले, तसेच रेल्वे सायडिंगची सुविधा असलेल्या जवळच्या कंटेनर फ्रेट स्टेशन्सवरही रेल्वेद्वारे कंटेनर्स जलद गतीने पोहोचवण्यात आले.

जागतिक परिस्थितीतून उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि व्यापारी समुदायासाठी अखंड व्यापार सुलभता सुनिश्चित करण्यासाठी माझे ज्येष्ठ सहकारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर एक अत्यंत फलदायी बैठक पार पडली. ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोनाच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला अनुसरून, ‘व्यवसाय सुलभता’ टिकवून ठेवण्यासाठी, पुरवठा साखळीची लवचिकता बळकट करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी परिसंस्था उभारण्यासाठी, बंदरे आणि लॉजिस्टिक्स प्रणालींमध्ये समन्वित आणि सक्रिय उपाययोजना लागू करत आहोत, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.

व्यापारी भागधारकांना दिलासा देण्यासाठी इंटर-टर्मिनल रेल्वे हाताळणी शुल्क आणि वाहतूक पद्धतीतील बदलाचे शुल्क माफ करण्यात आले. बंदर टर्मिनल्सनी देखील प्रत्येक प्रकरणाच्या स्वरूपानुसार, ग्राउंड रेंट शुल्कात (जागेचे भाडे) सवलत आणि सूट दिली आहे.

जलद ये-जा  सुलभ करण्यासाठी टर्मिनल्सवर रिकाम्या ट्रेलरसाठी समर्पित ग्रीन चॅनल उभारण्यात आले. आणखी एका प्रमुख उपक्रमांतर्गत, आघाडीच्या प्रमुख सीएफएस ऑपरेटर्सनी कंटेनरचे संपूर्ण स्टॅक्स उचलण्यासाठी जवळपास  100 ट्रेलर्स  एकत्र केले, ज्यामुळे गर्दीच्या यार्डमधून दीर्घकाळ प्रलंबित कंटेनर बाहेर काढणे शक्य झाले. या समन्वित प्रयत्नांमुळे यार्ड व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा झाली असून, टर्मिनल्सवर पडून असलेल्या तुलनेने जुन्या कंटेनरची संख्या कमी झाली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला अनुसरून, केंद्र सरकार एक लवचिक, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशी व्यापार आणि लॉजिस्टिक्स परिसंस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे. एक्झिम (EXIM) समुदायाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी जलद आणि समन्वित उपाययोजना करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या कल्पनेतील ‘संपूर्ण शासन’ दृष्टिकोनाच्या मार्गदर्शनाद्वारे , आम्ही पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, आपले व्यापारी हितसंबंध जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठेवण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेची व्यवसाय सुलभता  (EODB)कायम राखण्यासाठी काम करत  आहोत,” असे सर्बानंद  सोनोवाल यांनी  सांगितले.

दीर्घकालीन लवचिकता धोरणाचा एक भाग म्हणून, जेएनपीएने लॉजिस्टिक्स सज्जता आणि भविष्यातील माल हाताळणी क्षमता मजबूत करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा देखील तयार केला आहे. या उपायांमध्ये सीएफएस ऑपरेटर्स आणि वाहतूकदारांकडून चालकांची उपलब्धता वाढवण्यासाठी गतिशील प्रयत्न, रेल्वेमार्फत मालाची वाहतूक आणि प्रशिक्षित ट्रेलर चालकांचा मोठा समूह  तयार करण्यासाठी मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळांशी संवाद  यांचा समावेश आहे. बंदर प्राधिकरण परिचालन स्थिरता  आणि चालकांसाठी आरामदायी सुविधा  प्रदान करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याची योजना आखत आहे. याव्यतिरिक्त, टर्मिनल गेट्सवरील वाहतूक  सुधारण्यासाठी एक ट्रक अपॉइंटमेंट सिस्टीम सुरू करण्यात येत आहे, तसेच वाढत्या मालवाहतुकीला आधार देण्यासाठी टर्मिनल्सना अतिरिक्त हाताळणी उपकरणे तैनात करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

  

  

 

 

* * *

शैलेश पाटील/निलिमा चितळे/सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264416) अभ्यागत कक्ष : 23