युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'फिट इंडिया संडेज ऑन सायकल'च्या 75 व्या आवृत्तीच्या भव्य आयोजनासह देशभरात राष्ट्रकुल क्रीडा दिन साजरा केला जाणार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 चे यजमानपद भूषविणारे अहमदाबाद भारताच्या भव्य फिटनेस कार्यक्रमाचे नेतृत्व करणार


केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नायकांना मानवंदना म्हणून देशव्यापी राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवाची केली घोषणा; आयुष्मान खुराना आणि अनेक नामवंत खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा चळवळ देशभरात पुढे नेण्यासाठी मशालवाहकाची भूमिका बजावतील

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

फिटनेस आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रतिकात्मक देशव्यापी सोहळ्यापैकी एक म्हणून, फिट इंडिया संडेज़ ऑन सायकलच्या विशेष 75 व्या आवृत्तीचे 24 मे रोजी आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने देशभरातील  8,000 हून अधिक ठिकाणी नागरिक एकत्र येतील. राष्ट्रकुल क्रीडा दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम, भारताच्या क्रीडा भविष्याला आणि अहमदाबादमध्ये होणाऱ्या आगामी 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी  एक भव्य मानवंदना  ठरेल.

केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे 2030 मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणाऱ्या अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट येथे या सोहळ्याचे नेतृत्व करतील. त्यांच्यासोबत गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी असतील. या कार्यक्रमात हजारो सायकलस्वार, युवा स्वयंसेवक, खेळाडू आणि फिटनेसप्रेमी राष्ट्रीय एकता, क्रीडा संस्कृती आणि सामुदायिक सहभागाच्या नेत्रदीपक प्रदर्शनासाठी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे.

“2030 मध्ये भारत 100 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे, या विचाराने संपूर्ण देश उत्साही आहे. 24 मे रोजी, आपण हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करणार असून यात  क्रीडा क्षेत्राशी संबंधित सर्वजण - क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण क्रीडा परिसंस्था  एकत्र येतील.  भारताला राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच, त्यासाठीच्या तयारीचाही हा सोहळा असेल,” असे डॉ. मांडविया म्हणाले. “याचा उद्देश तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि क्रीडा संस्कृती रुजवणे हा आहे, त्यामुळे हा सोहळा मोठ्या प्रमाणावर युवकांच्या  पुढाकाराने साजरा केला जाईल.”

हॉकीपटू रजनी एतिमारपू, गुरजीत कौर आणि सोनिका तांडी, नेमबाज अंकुर मित्तल आणि अंजुम मौदगिल, तसेच बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे यांच्यासह देशातील अनेक प्रतिष्ठित राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांसोबत अभिनेता आयुष्मान खुराना, अहमदाबादमधील सोहळ्याला उपस्थित राहून शोभा वाढवणार आहे.

'संडेज ऑन सायकल' या उपक्रमाच्या देशव्यापी विस्ताराला अनुसरून, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संकल्पनेवर आधारित 'संडेज ऑन सायकल' सोहळ्याचे आयोजन केले जाईल. तसेच, साई प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे, खेलो इंडिया केंद्रे आणि देशभरातील विविध ठिकाणी देशाच्या  राष्ट्रकुल क्रीडा प्रवासाला समर्पित विशेष सायकल फेऱ्या आणि उपक्रमांचे आयोजन केले जाईल. माजी राष्ट्रकुल क्रीडा विजेते, ऑलिम्पिकपटू  आणि आघाडीचे खेळाडू आपापल्या शहरांतील नागरिकांसोबत सहभागी  होतील आणि प्रतिकात्मकरीत्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा उत्साह स्टेडियममधून रस्त्यांवर आणि उच्चभ्रू खेळांकडून  तळागाळापर्यंत पोहोचवतील.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे गुवाहाटी येथील सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, माजी कुस्तीपटू बबिता फोगट धरमशाला येथे उपस्थित राहतील, तर ‘चक दे! इंडिया’ या चित्रपटाच्या प्रेरणास्थानांपैकी एक असलेल्या माजी हॉकीपटू सबा अंजुम मुंबईत उपस्थित राहतील.

75 वी आवृत्ती केवळ एक सायकल मोहीम म्हणून नव्हे, तर भारताचा एक जागतिक क्रीडा शक्ती म्हणून उदय दर्शवणारा एक देशव्यापी क्रीडा महोत्सव म्हणून साजरी केली जात  आहे.

 

* * *

सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263927) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam