संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्र्यांनी कोरियातील सोल येथे संरक्षणमंत्री आणि कोरियाच्या पॅट्रियट्स अँड व्हेटरन्स अफेअर्स मंत्र्यांच्या हस्ते भारतीय युध्द स्मारकाचे केले उद्घाटन


कोरियातील युद्धाच्या काळात भारतीय तुकड्यांनी दाखवलेले शौर्य, त्याग तसेच मानवतावादी योगदान यांना साजेशी आदरांजली

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कोरिया प्रजासत्ताकाचे (आरओके) पॅट्रियट्स अँड व्हेटरन्स अफेअर्स मंत्री क्वोन ओह-यूल यांनी आज, दिनांक 21 मे 2026 रोजी इम्जिंगक पार्क येथील भारतीय युध्द स्मारकाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. कोरियन युद्धाच्या 75व्या वर्षपूर्तीच्या स्मरणार्थ साजऱ्या करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा भाग म्हणून हे युध्द स्मारक उभारण्यात आले असून या युद्धादरम्यान भारतीय लष्कर आणि कस्टोडीयन फोर्स ऑफ इंडिया (सीएफआय) तील 60 पॅरा फिल्ड रुग्णवाहिकांच्या कार्यातून दिसून आलेल्या शौर्य, त्याग तसेच मानवतावादी योगदानविषयक सेवेप्रती आदरांजलीच्या रुपात हे स्मारक उभे आहे.

आजच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही मंत्र्यांनी युद्धस्मारकापाशी पुष्पचक्र अर्पण केले आणि शूर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. कोरियातील जनतेकडून आजही अत्यंत आदराने आणि कृतज्ञतापूर्वक या सैनिकांच्या सेवेचे स्मरण केले जाते.

याप्रसंगी केलेल्या भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोरियन द्वीपकल्प येथे शांतता प्रस्थापित करून मानवतावादी मदतीसाठी भारताच्या योगदानाची चिरस्थायी परंपरा अधोरेखित केली. या दोन्ही देशांचा सामायिक इतिहास आणि समर्पण हे घटक भारत-कोरिया विशेष धोरणात्मक भागीदारीचा सशक्त पाया म्हणून काम करतात याचा त्यांनी उल्लेख केला.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारतीय तुकड्यांनी निभावलेल्या भूमिकेचे स्मरण करण्यातून दोन्ही देशांच्या जनतेमधील सामंजस्य दृढ करण्यासाठी मदत होते आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक बंधांकडे सर्वांचे पुन्हा नव्याने लक्ष वेधले जाते. भारत सरकारच्या वतीने त्यांनी कोरियाच्या सरकारप्रती, विशेषतः देशभक्त आणि माजी सैनिक व्यवहार मंत्रालयाने हे स्मारक उभारण्यासाठी दिलेला मौल्यवान पाठींबा आणि सहकार्य यांच्याप्रती तीव्र कृतज्ञता व्यक्त केली  

   

कोरियाच्या युद्धात भारताने बजावलेल्या भूमिकेची कोरियाच्या देशभक्त आणि माजी सैनिक व्यवहारमंत्र्यांनी मनापासून प्रशंसा केली. भारतीय सैनिकांनी केलेली बलिदाने आणि मानवतावादी सेवा यांच्या माध्यमातून फुललेल्या मैत्रीच्या चिरस्थायी बंधांचा त्यांनी उल्लेख केला.

कोरियन युद्धात कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करणे आणि त्यांच्यादरम्यान विचारांची देवाणघेवाण अधिक बळकट करणे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एका सामंजस्य करारावर दोन्ही मंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या युद्धात सैनिकांनी दिलेल्या निःस्वार्थ बलिदानाच्या स्मरणार्थ एका स्मरणिकेचे देखील अनावरण करण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल (डॉ.) एजी रंगराज यांच्या नेतृत्वाखाली परिचालित 60 पॅरा फिल्ड रुग्णवाहिकांच्या तुकडीने युद्धाच्या वेळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार होत असतानाच्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हजारो जखमी सैनिक तसेच नागरिक यांच्यावर उपचार करुन, अनुकरणीय वैद्यकीय सेवा आणि समर्पण यांचे दर्शन घडवल्याबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात लोकमान्यता मिळाली. या सैनिकांचे अतुलनीय शौर्य तसेच मानवतावादी दृष्टीकोन यामुळे आरओकेचे जखमी सैनिक आणि नागरी भागातील लोकांकडून त्यांना ‘मरुन एंजेल्स’ ही उपाधी देण्यात आली.

   

भारताने सीएफआयच्या माध्यमातून कोरियन युद्धामध्ये युध्दविरामाच्या काळात देखील महत्त्वाची भूमिका निभावली. तटस्थ राष्ट्रे प्रत्यावर्तन आयोगाच्या (एनएनआरसी) अंतर्गत सीएफआयला या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. लेफ्टनंट जनरल केएस थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अध्यक्षपदात एनएनआरसीची स्थापना करण्यात आली असून, 1953 मध्ये कोरियन युद्धविराम करार झाल्यानंतर मानवी प्रत्यावर्तन आणि कैद्यांच्या कोठडीबाबत सुलभता निर्माण करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात आली.

सीएफआयने अत्यंत व्यावसायिकता, निःपक्षपातीपणा तसेच करुणाभावासह ही संवेदनशील आणि गुंतागुंतीची जबाबदारी पार पाडली आणि कोरियन द्वीपकल्पात शांतता, सलोखा तसेच मानवतावादी मूल्यांप्रती दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. लेफ्टनंट जनरल थिमैय्या यांचे उत्कृष्ट नेतृत्व तसेच राजनैतिक कौशल्य हे कोरियन युद्धादरम्यान भारताने बजावलेल्या रचनात्मक आणि शांतताप्रिय भूमिकेचे चिरस्थायी प्रतीक बनून राहिले आहे.

सीएफआयने सप्टेंबर 1954 मध्ये सुमारे 22,000 कैद्यांना त्यांच्या शांततामय प्रत्यावर्तनापर्यंत मुक्काम करण्यासाठी जेथे ‘हिंद नगरा’ची स्थापना केली होती त्याच भागात भारतीय युध्द स्मारक उभारण्यात आले आहे. सामायिक इतिहासाप्रती तीव्र आदराचे तसेच दोन्ही देशांदरम्यान अभंग मैत्रीचे दर्शन घडवत, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी निधीविषयक पाठबळ दिले आहे.

   

आजच्या कार्यक्रमाला दोन्ही देशांचे ज्येष्ठ अधिकारी, लष्करी प्रतिनिधी, माजी सैनिक, राजनैतिक समुदायाचे सदस्य तसेच सन्माननीय पाहुणे उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल (डॉ.) एजी रंगराज यांच्या भाची कल्पना प्रसाद देखील याप्रसंगी उपस्थित होत्या. कोरियाच्या देशभक्त आणि माजी सैनिक व्यवहार मंत्रालयाने हा महिना कर्नल रंगराज यांच्या सन्मानार्थ समर्पित केला आहे.

आजचा हा स्मरणोत्सव भारत-कोरिया सामायिक इतिहासातील महत्त्वाच्या पण तुलनेने कमी ज्ञात असलेल्या अध्यायाला पुनरुज्जीवन देण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे. कोरियन युद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी दिलेले योगदान हा शांतता, मानवतावादी सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्याप्रती भारताच्या प्रदीर्घ वचनबद्धतेचे शक्तिशाली प्रतीक ठरले आहे. भारतीय युध्द स्मारकाच्या उद्घाटनासह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चार दिवसीय व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया दौरा संपन्न झाला आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/ संजना चिटणीस/ दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263746) आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Malayalam