अवजड उद्योग मंत्रालय
देशभरात ई-बसेस आणि ई-ट्रक्सच्या वापराला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सल्लामसलत बैठक संपन्न
भारतामध्ये पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या बदलाच्या पुढील टप्प्यात सर्व संबंधित घटकांनी पुढाकार घेण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे भागधारकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2026 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2026
भारताच्या स्वच्छ गतिशीलता संक्रमणाला म्हणजेच पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या बदलांना मोठी गती देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय भागधारक सल्लामसलत बैठक पार पडली. देशभरात इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक ट्रक्सचा उपयोग आणि तैनाती वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा मुख्य हेतू होता.

या बैठकीत देशभरातील प्रमुख भागधारक एकत्र आले होते. यांमध्ये, फ्लीट ऑपरेटर (वाहनांचे ताफे चालवणारे), ॲग्रीगेटर्स(वेगवेगळ्या सेवा किंवा पुरवठादारांना एकत्र जोडणारे मंच), वाहतूक क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, वित्तीय संस्था, भाडेतत्त्वावर वाहने देणाऱ्या कंपन्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक गतिशीलता (वाहन वाहतूक) परिसंस्थेशी निगडीत संबंधित उद्योग प्रतिनिधींचा समावेश होता. क्षेत्रीय पातळीवरील प्रत्यक्ष परिचालनात्मक परिस्थिती समजून घेणे, ई-बसेस आणि ई-ट्रक्सच्या वापराला वेग देणे आणि सरकार तसेच खाजगी भागधारकांमधील सहकार्य अधिक मजबूत करणे या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली होती.
उपस्थितांना संबोधित करताना एच. डी. कुमारस्वामी यांनी यावर भर दिला की, इलेक्ट्रिक बसेस या भारतातील प्रवासी वाहतुकीचा भविष्यातील कणा ठरणार आहेत, तर इलेक्ट्रिक ट्रक्स, शाश्वत लॉजिस्टिक (मालपुरवठा व्यवस्था) आणि मालवाहतुकीच्या भविष्याला आकार देण्यात परिवर्तनीय भूमिका बजावतील.

"भारत स्वच्छ आणि कार्यक्षम वाहतुकीच्या दिशेने एक निर्णायक बदल अनुभवत आहे. ई-बसेस हे प्रवासी गतिशीलतेचे भविष्य आहे आणि ई-ट्रक्स आपल्या देशातील लॉजिस्टिक आणि मालवाहतुकीच्या पुढील युगाला परिभाषित करतील," असे एच. डी. कुमारस्वामी म्हणाले.
सहकार्यात्मक धोरण निर्मितीच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारतातील इलेक्ट्रिक गतिशीलतेचे संक्रमण व्यावहारिक, सर्वसमावेशक आणि व्यावसायिकदृष्ट्या शाश्वत असेल याची खात्री करण्यासाठी सरकार, परिचालक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास वचनबद्ध आहे.
"ही सल्लामसलत केवळ धोरणात्मक चर्चा नव्हती. संपूर्ण भारतातातील, वास्तवात प्रत्यक्ष वाहतूक सेवा देणारे परिचालक आणि भागधारकांकडून, त्यांचे अनुभव-मते थेट ऐकण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ होते. भविष्यातील पथदर्शी कृती आराखडा तयार करण्यासाठी त्यांचा अभिप्राय आणि अनुभव अत्यंत मोलाचा आहे," असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, हा उपक्रम शाश्वतता, कार्यात्मक कार्यक्षमता आणि जबाबदार कारभाराप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीशी तंतोतंत सुसंगत आहे.

बैठकीदरम्यान, भागधारकांनी त्यांचे सविस्तर अभिप्राय, व्यावहारिक अनुभव, क्षेत्राशी संबंधित चिंता आणि इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी वित्तपुरवठा, चार्जिंग पायाभूत सुविधा, वाहनांची तैनाती, व्यावसायिक व्यवहार्यता आणि दीर्घकालीन परिसंस्थेचे पाठबळ या संदर्भातील व्यावहारिक सूचना मांडल्या.
या क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर सरकारशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि मंत्रालयाच्या या सक्रिय पुढाकाराबद्दल सहभागींनी मनापासून स्वागत केले.
निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2263442)
आगंतुक पटल : 50