वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योगजगत आणि सरकार यांच्यात अधिक दृढ सहकार्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन, जागतिक अनिश्चिततेला सुधारणा आणि लवचिक स्वरुपाच्या प्रगतीच्या संधींमध्ये रूपांतरीत करण्याचे केले आवाहन
देशाने जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय आव्हानांचे रूपांतर वेगवान सुधारणा, मजबूत पुरवठा साखळी आणि निर्यातीच्या अधिक संधींमध्ये केले पाहिजे - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
उद्योग जगताने सुधारणा घडवून आणण्यासाठी चौकटीबाहेरच्या कल्पना राबवाव्यात असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
19 MAY 2026 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथे असोचॅम या उद्योजकांच्या संघटनेच्यावतीने आयोजित इंडिया बिझनेस रिफॉर्म समिट 2026 या शिखर परिषदेला संबोधित केले. देशात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी, भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत 2047 चा संकल्प साकार करण्याच्या दिशेने देशाच्या वाटचालीला गती देण्यासाठी उद्योग जगत आणि सरकार यांच्यात अधिक दृढ सहकार्य स्थापित व्हायला हवे असे आवाहन त्यांनी केले.
सध्याची जागतिक परिस्थिती आणि भू राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेकडे देशातील उद्योग व्यवसाय विषयक प्रक्रियांना बळकटी देण्याची, वेगाने सुधारणा घडवून आणण्याचे उपक्रम हाती घेण्याची, अधिक लवचिकता निर्माण करण्याची आणि पुरवठा साखळीला बळकटी देण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.
सध्याची बदलती जागतिक परिस्थिती आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा उल्लेखही त्यांनी केला. या परिस्थितीत उद्योग व्यवसाय क्षेत्रांनी घाबरून न जाता संधी आणि जोखीम या दोन्ही बाबींबाबत सजग राहायला हवे असा सल्ला त्यांनी दिला.
भारताकडे जागतिक कार्यान्वयनाला उपयुक्त ठरू शकेल असे सक्षम, युवा आणि प्रतिभावान मनुष्यबळ आहे, त्यामुळे भारत हा एक विश्वासार्ह भागीदार देश होऊ शकतो याची आंतरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात दखल घेऊ लागल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या सेवा क्षेत्रावरचा विश्वासही त्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या श्रेत्रांतल्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे नवीन संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.
देशाने उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योग व्यवसायाभिमुख सुधारणा आणि जागतिक घडामोडींकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे असे ते म्हणाले. केंद्र सरकार विश्वासार्ह जागतिक भागीदारी, कमी खर्चात माहिती साठ्याची उपलब्धता, नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार आणि ऊर्जा विषयक भक्कम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून माहितीसाठा केंद्र आणि क्लाउड सेवांमधील गुंतवणुकीसाठी एक सक्षम परिसंस्था उभारत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
आज जागतिक पातळीवर भारत भक्कम स्थितीत असून, आपल्या बलस्थानांच्या बळावर जगासोबत वाटाघाटी करत असल्याचे पीयुष गोयल यावेळी म्हणाले. आज भारत हा वस्तुमालाचा एक स्पर्धात्मक उत्पादक तसेच सेवा पुरवठादार देश बनला आहे असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांनी 38 देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारांचा संदर्भही दिला. या करारांमुळे अधिक व्यापक स्तरावर वाटाघाटींचे मार्ग खुले झाले असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या उद्योग व्यवसायांनी आयातीत वाढ होऊ देण्याऐवजी, देशात गुंतवणूक आणण्यासाठी आणि देशाची निर्यात वाढवण्यासाठी या करारांचा प्रभावीपणे उपयोग करून घेतला पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले.
देशातल्या शेतकरी आणि मच्छीमार वर्गाला चांगल्या किमती आणि सुधारित मूल्याचा लाभ मिळवून देण्याकरता, देशाने मोटारवाहन उद्योग, वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहकोपयोगी वस्तूमाल आणि कृषी क्षेत्रावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांसोबतच, अधिक मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात वाढवण्यावर भर द्यायला हवा असे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादने केवळ कच्चा माल म्हणून नव्हे तर त्याऊलट ती तयार उत्पादने म्हणून पोहोचली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पर्यटन आणि देशांतर्गत खप या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी नागरिकांनी देशातील पर्यटन स्थळांची किर्ती सर्वदूर पोहोचवावी असे आवाहनही त्यांनी केले.
आता देशाने 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याच्या निर्यातीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. अशावेळी निर्यातदारांनी झालेले करार औपचारिकरित्या अमलात येण्यापूर्वीच नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा, नमुना तपासण्या करून घ्याव्यात तसेच चाचणीपर ऑर्डरवर काम करावे, आणि या माध्यमातून जागतिक पातळीवरील संपर्काचा विस्तार करत आगामी मुक्त व्यापार करारांचा सक्रियपणे लाभ उठवावा, असे आवाहनही त्यांनी निर्यातदारांना केले.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2262876)
आगंतुक पटल : 52