विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी अणुउर्जा सहकार्याच्या संदर्भात अमेरिकेतील उद्योगक्षेत्रातील धुरीणांशी केली चर्चा


डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की भारताच्या अणु कार्यक्रमाचा विस्तार आणि शांती कायदा यामुळे जागतिक औद्योगिक भागीदारीसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत

भारत- अमेरिका दरम्यानच्या चर्चेत खासगी गुंतवणूक, एसएमआर तसेच प्रगत अणु तंत्रज्ञान यांवर अधिक भर

Posted On: 18 MAY 2026 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

अणुउर्जा संस्था (एनईआय) आणि अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंच (युएसआयएसपीएफ) यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय अमेरिकी उद्योग शिष्टमंडळाने आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन भारतातील अणुउर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि औद्योगिक सहयोग यांतील उदयोन्मुख संधींबाबत तपशीलवार चर्चा केली.

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित या शिष्टमंडळ भेटीने अमेरिकेच्या उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, व्यापारी भागीदार तसेच नागरी अणुउर्जा आणि प्रगत तंत्रज्ञानांतील भारत-अमेरिका सहकार्याशी संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र आणले.

सदर चर्चेमध्ये भारताची महत्त्वाकांक्षी अणुउर्जा मोहीम, खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग शक्य करणाऱ्या, अलीकडच्या धोरणात्मक सुधारणा तसेच स्वच्छ उर्जा आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये भारत-अमेरिका सहकार्याच्या संधींचा विस्तार यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की आजच्या घडीला भारत आणि अमेरिका हे देश, विज्ञान, तंत्रज्ञान, स्वच्छ उर्जा आणि उदयोन्मुख क्षेत्रे यामध्ये सशक्त आणि भविष्यवेधी भागीदारी सामायिक करतात, आणि त्यात नागरी अणु सहकार्याला सातत्याने धोरणात्मक तसेच आर्थिक महत्त्व प्राप्त होत आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये झालेल्या बैठकीदरम्यान अमेरिका-भारत ट्रस्ट उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाच्या तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानांतील सहयोगाचे नवे मार्ग खुले झाले आहेत असे त्यांनी सांगितले.

   

विश्वसनीय तंत्रज्ञान विषयक भागीदारी, लवचिक पुरवठा साखळ्या आणि नवोन्मेष परिसंस्था यांच्याभोवती केंद्रित असलेला हा ट्रस्ट उपक्रम दोन्ही देशांची सरकारे, उद्योग विश्व, शिक्षण क्षेत्र तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर्स, जैवतंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, महत्त्वपूर्ण खनिजे, उर्जा तसेच अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील स्टार्ट अप उद्योग यांच्यात अधिक दृढ सहयोगासाठी सशक्त चौकट देऊ करतो अशी माहिती  डॉ.सिंह यांनी दिली.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की उत्पादन, तंत्रज्ञान विषयक सहकार्य, पुरवठा साखळ्यांचे एकत्रीकरण तसेच आधुनिक संशोधन अशा क्षेत्रांमध्ये भारताचा वेगाने वाढता अणुउर्जा कार्यक्रम जागतिक भागीदारीसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे.

अणुउर्जा क्षेत्रात परदेशी सहभागासह, खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग सुलभ करण्याच्या उद्देशाने भारताने शांती कायदा,2025 हा महत्त्वाची धोरणात्मक सुधारणा करणारा कायदा नुकताच लागू केला अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. ते म्हणाले की ही सुधारणा, भारताच्या अणुउर्जा मोहिमेशी जुळवून घेऊन गुंतवणूक, औद्योगिक सहयोग, उत्पादन भागीदारी आणि तंत्रज्ञान सहकार्य यांसाठी अधिक सक्षम परिसंस्थेची निर्मिती करेल.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह भारत लघु मोड्युलर रिअॅक्टर्स (एसएमआर्स) च्या विकास योजनेसह आगेकूच करत आहे. ते पुढे म्हणाले की, मायक्रो-रिअॅक्टर्स, एआय-सक्षम आण्विक सुरक्षा प्रणाली, वैज्ञानिक गणन, अणुउर्जा मॉडेलिंग आणि संस्थात्मक क्षमता निर्मिती यांसारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका सहयोगाला लक्षणीय वाव आहे.

सध्या सुरु असलेल्या अनेक भारत-अमेरिका सहयोगात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा देखील या बैठकीतील चर्चेदरम्यान घेण्यात आला.

 

* * *

सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2262468) अभ्यागत कक्ष : 12