सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दाशेला येथील मधुर डेअरी च्या अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन; सहकार से समृद्धी या संकल्पनेला नवी गती
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2026 7:28PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील दाशेला येथील, मधुर डेअरी युनिट-2 च्या अत्याधुनिक, स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकेजिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले.

यावेळी अमित शाह म्हणाले की, दाशेला येथे उभारण्यात आलेला हा आधुनिक डेअरी प्रकल्प केवळ एक औद्योगिक प्रकल्प नाही, तर लाखो दूध उत्पादक कुटुंबांच्या, विशेषतः ग्रामीण भागातील माता आणि भगिनींच्या—आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 15 एकर जागेवर आणि सुमारे 128 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची दूधावरील प्रक्रियेची क्षमता सध्या दररोज 2.5 लाख लिटर असून ती लवकरच दररोज 5 लाख लिटरपर्यंत नेली जाईल.
अमित शाह यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यातील मोठा वाटा थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. डेअरी सहकार चळवळीच्या माध्यमातून गावागावातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा आमूलाग्र बदललेला आहे. पूर्वी महिला प्रामुख्याने केवळ घरगुती जबाबदाऱ्याच पार पाडत होत्या. मात्र आज डेअरी क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रमुख घटक म्हणून पुढे आल्या आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल, त्रिभुवनदास पटेल, डॉ. वर्गीस कुरियन आणि सहकार क्षेत्रातील इतर अनेक आद्यप्रवर्तकांनी घालून दिलेल्या सहकाराच्या समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत, मधुर डेअरी आज एक भक्कम आणि विश्वासार्ह डेअरी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. 1971 मध्ये केवळ 6,000 लिटर दुधाचे संकलन आणि 7,000 रुपयांच्या उलाढाली पासून प्रवास सुरू करणाऱ्या मधुर डेअरीने आज 628 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल गाठली आहे. त्याचबरोबर दूध संकलन, प्रक्रिया आणि वितरण यासाठीचे एक मोठे नेटवर्क निर्माण केले आहे. असे सांगून त्यांनी या यशाचे वर्णन सहकार चळवळीच्या यशाचे एक जिवंत उदाहरण असे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने श्वेतक्रांती 2.0 ची कास धरली असून पुढील एका दशकात भारताचे दूध उत्पादन तिप्पट करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. अमूल, बनास डेअरी आणि मेहसाणा डेअरी यांसारख्या गुजरातच्या अग्रगण्य दुग्धसंस्थांनी पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने स्वीकारली आहेत; आणि सहकारी रचनेच्या माध्यमातून, हे लाभ ते थेट दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवत आहेत. असेही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2262088)
आगंतुक पटल : 41