वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी लॉजिस्टिक्स आणि नवोन्मेष क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या LEAPS 2025 पुरस्काराच्या 13 श्रेणींमधील विजेत्यांचा केला सन्मान


जीसीसी, कॅनडा, चिली, मेक्सिको आणि इतर देश-प्रदेशांसमवेत भारत व्यापार चर्चा पुढे नेत आहे: पीयुष गोयल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्याचे अभियान पायाभूत सुविधांचा विकास, अखंड पुरवठा साखळी आणि अधिक जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देत आहे: पीयुष गोयल

Posted On: 13 MAY 2026 8:33PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात LEAPS पुरस्कार 2025 प्रदान केले. कोअर लॉजिस्टिक्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, संस्था आणि विशेष श्रेणी अशा 13 श्रेणींमधील LEAPS पुरस्कार 2025 च्या विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोयल यांनी LEAPS पुरस्कार 2025 सोहळ्यात LEADS 2025 अहवालाचे प्रकाशनही केले.

गेल्या साडेतीन वर्षांत भारताने 9 मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) माध्यमातून 38 विकसित आणि समृद्ध अर्थव्यवस्थांपर्यंत व्यापार विस्तार साध्य केल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी 4 करार आधीच कार्यान्वित झाले असून, पुढील 12 महिन्यांत आणखी 5 करार लागू होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. जपान, कोरिया आणि आसियान देशांसोबत यापूर्वी झालेल्या एफटीए करारांसह, हे करार आता जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थांच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त भागाला व्यापतात, अशी माहिती त्यांनी दिली.

भारत चिली आणि मालदीवसह अनेक देश आणि प्रदेशांसोबत व्यापार करारांवर सक्रियपणे वाटाघाटी करत असून, हे दोन्ही करार या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यापार सहभाग आणि बाजारपेठ प्रवेशाच्या संधींचा विस्तार करण्यासाठी भारत कॅनडा, युरेशिया, मेक्सिको, SACU आणि मर्कोसुर यांच्यासोबत सक्रिय चर्चा करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उच्च शुल्क, युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशिया संकट यांसारख्या जागतिक आव्हानांना न जुमानता, भारताने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक विकास दर मंदावला असतानाही भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. यामध्ये सेवा निर्यातीत सुमारे 8.5 ते 9 टक्के वाढीची नोद झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत एकूण निर्यातीत जवळपास 5 टक्क्यांची वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, विविध मुक्त व्यापार करारांची  अंमलबजावणी आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेबाबत वाढीव संधींच्या जोरावर सरकारने विद्यमान वर्षासाठी 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

पश्चिम आशियातील संकट, मंदावलेला जागतिक विकास आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यत्ययांकडे भारताने कार्यक्षमता सुधारण्याची, मालवाहतूक (लॉजिस्टिक) खर्च कमी करण्याची, स्पर्धात्मकता वाढवण्याची आणि निर्यात बाजारपेठांचा विस्तार करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मंत्र्यांनी सांगितले.

पीयूष गोयल म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉजिस्टिक खर्च कमी करणे हे एक तातडीचे 'राष्ट्रीय मिशन' म्हणून हाती घेतले आहे.

ते म्हणाले की, जग आता नवोन्मेष, संशोधन आणि विकास, तसेच स्पर्धात्मक उत्पादन आणि सेवांसाठी भारताकडे वाढत्या अपेक्षेने पाहत आहे. ते पुढे म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या जागतिक कार्याचा विस्तार करण्यासाठी भारताची प्रतिभा, कमी परिचालन खर्च आणि मजबूत डिजिटल परिसंस्थेचा लाभ घेत आहेत.

मंत्र्यांनी सर्व भागधारकांना राष्ट्र उभारणीसाठी आणि भारताची जागतिक स्पर्धात्मकता अधिक मजबूत करण्यासाठी सामूहिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/आशुतोष सावे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2260882) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English , Gujarati