सांस्कृतिक मंत्रालय
भारताच्या हरवलेल्या सांस्कृतिक वारशाच्या पुनरागमनाचा सोहळा : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात वार्ताहर परिषदेला केले संबोधित.
Posted On:
13 MAY 2026 5:56PM by PIB Mumbai
भारतातील पवित्र पुरातन वस्तू अमेरिकेतून परत स्वदेशी येणे ही घटना म्हणजे भारताच्या सांस्कृतिक स्मृतीचे पुनरुज्जीवन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला परत मिळवण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्या अढळ निश्चयाचे प्रतीकआहे, असे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे.
स्मिथसोनियनच्या राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालयातून तीन ऐतिहासिक कांस्य मूर्तीं स्वदेशी परत आणणे हा चोरीला गेलेल्या सांस्कृतिक ठेव्याला परत आणण्याच्या आणि जागतिक स्तरावर वस्तुसंग्रहालयाशी निगडित नैतिक पद्धतींचा आदर करण्याची प्रवृत्ती मजबूत करण्याच्या भारताच्या सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे शेखावत यांनी आज नवी दिल्लीत जनपथ येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितले.

अमेरिकेतून परत आणण्यात आलेल्या कांस्य मूर्तींमध्ये सुमारे इ.स. 990 मधील चोलकालीन शिव नटराज मूर्ती, 12 व्या शतकातील सोमास्कंद ( शिव आणि उमा यांचे रूप), तसेच 16 व्या शतकातील विजयनगरकालीन संत सुंदरर आणि परावई यांची कांस्य शिल्पमूर्ती यांचा समावेश आहे. या पवित्र मंदिरातील कांस्य मूर्ती मूलतः तामिळनाडू येथील असून, 20व्या शतकाच्या मध्यकाळात त्यांची भारतातून बेकायदेशीररीत्या चोरी करून त्या परदेशात नेण्यात आल्या होत्या. नंतर त्या परदेशातील संग्रहांमध्ये ठेवण्यात आल्या

या पुरातन मूर्ती म्हणजे केवळ कारागिरीचा नमुना नाहीत तर भारताची आध्यात्मिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक स्मृतींचे प्रतीक आहेत, असे शेखावत म्हणाले. अशा प्रकारच्या पुरातन पवित्र वस्तूंच्या चोरीमुळे भारताला कित्येक दशके आपल्या अमूल्य सांस्कृतिक खजिन्यापासून वंचित रहावे लागले, असे त्यांनी सांगितले.

भारतीय पुरातत्त्वशास्त्र सर्वेक्षण विभागाने 1950 आणि 1960 च्या दशकातील मंदिरांच्या ऐतिहासिक छायाचित्रांच्या आधारे सखोल मूळ-संशोधन करून तसेच अभिलेखीय नोंदी आणि क्षेत्रीय दस्तऐवजीकरण यांचा वापर करुन त्या कलावस्तूंचा यशस्वी मागोवा घेतला आणि तामिळनाडूमधील त्यांच्या मूळ मंदिर स्थळाची ओळख पटवली. सांस्कृतिक मंत्रालय, स्मिथसोनियन संस्था आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा शोध लागणे शक्य झाले.

भारताने 2014 पासून विविध देशांतून एकूण 666 प्राचीन कलावस्तू यशस्वीरित्या परत मिळवल्या आहेत. त्यापैकी 653 कलावस्तू केवळ 2014 नंतर परत आणण्यात आल्या आहेत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्त्वशास्त्र सर्वेक्षण विभाग, परदेशातील भारतीय दूतावास आणि सक्तवसुली यंत्रणांच्या सातत्यपूर्ण राजनैतिक, कायदेशीर आणि संस्थात्मक प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले, असे शेखावत यांनी सांगितले.
अलीकडेच अमेरिकेच्या सक्तवसुली यंत्रणांनी मूळच्या भारतीय 657 कलावस्तू अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडे सुपूर्द केल्या असून भारतीय पुरातत्त्व विभागाकडून त्यांनी पडताळणी आणि त्यांना भारतात परत आणायची व्यवस्था सध्या सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
***
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2260863)
अभ्यागत कक्ष : 7