वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
चिली प्रजासत्ताकाचे परराष्ट्र मंत्री फ्रान्सिस्को पेरेझ मॅकेना भारत दौऱ्यावर; आर्थिक आणि व्यापारी सहकार्य बळकट करण्यावर भर
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची चिलीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वृद्धीसंदर्भात चर्चा
Posted On:
13 MAY 2026 4:55PM by PIB Mumbai
चिली प्रजासत्ताकाचे परराष्ट्र मंत्री फ्रान्सिस्को पेरेझ मॅकेना यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भारत आणि चिली यांच्यातील आर्थिक व व्यापारी सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताला भेट दिली.
या भेटीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चिलीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसेच प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी भारत-चिली आर्थिक संबंधांमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीची नोंद घेतली आणि द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक तसेच उद्योग-व्यवसाय सहकार्य विस्तारण्यासाठी आपली सामायिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
या चर्चेमध्ये भारत आणि चिली यांच्यात सुरू असलेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (Comprehensive Economic Partnership Agreement - CEPA) संदर्भातील वाटाघाटींवर विशेष भर देण्यात आला. CEPA मुळे द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आणि हा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
वाणिज्य सचिवांनी चिली सरकारच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध विभागाच्या (SUBREI) उपमंत्री पावला एस्तेव्हेझ यांच्यासोबत स्वतंत्र बैठकही घेतली. CEPA लवकर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेबरोबरच व्यापार सुलभीकरण, बाजारपेठेतील प्रवेश, गुंतवणूक प्रोत्साहन आणि दोन्ही देशांमधील संस्थात्मक आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासंबंधी विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
द्विपक्षीय सहकार्याचा भाग म्हणून नवी दिल्ली येथे भारत-चिली व्यावसायिक गोलमेज परिषद (Business Roundtable) आयोजित करण्यात आली. या परिषदेत दोन्ही देशांतील प्रमुख उद्योग प्रतिनिधी आणि व्यावसायिक भागधारक सहभागी झाले होते. या परिषदेमुळे महत्त्वपूर्ण खनिजे, अक्षय ऊर्जा, कृषी-व्यवसाय, पायाभूत सुविधा, औषधनिर्मिती, डिजिटल सेवा, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले.
भारतीय आणि चिली अर्थव्यवस्थांमधील परस्परपूरकतेवर भर देत मजबूत पुरवठा साखळी, शाश्वत विकास आणि खासगी क्षेत्राच्या अधिक सहभागाचे द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे महत्वाचे असल्याचे दोन्ही देशांनी अधोरेखित केले.
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260809)
अभ्यागत कक्ष : 10