शिक्षण मंत्रालय
भारत इनोव्हेट्स 2026 या उच्चस्तरीय राजनैतिक परिषदेला धर्मेंद्र प्रधान यांनी आज केले संबोधित
Posted On:
12 MAY 2026 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या विषयावर उच्चस्तरीय राजनैतिक संवाद परिषदेचे आयोजन केले होते. हा संवाद म्हणजे 'भारत इनोव्हेट्स 2026' च्या पूर्वतयारीचाच भाग होता. 'भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष या अंतर्गत, 14 ते 16 जून 2026 या कालावधीत फ्रान्समधील नीस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.
या संवादात्मक सत्रामध्ये विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त, राजनैतिक अधिकारी आणि केंद्र सरकारी अधिकारी सहभागी झाले होते. भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या नवोपक्रम परिसंस्थेच्या माध्यमातून जागतिक सहयोगासाठी उपलब्ध संधींवर विचारमंथन करणे हा या संवादाचा मुख्य उद्देश होता.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. आज भारत जागतिक स्तरावरील अडचणी आणि आव्हानांकडे नवनिर्मितीच्या संधी म्हणून पाहत आहे आणि भविष्यातील विकासाला चालना देणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून उदयास येत आहे, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. भारताची ओळख केवळ तंत्रज्ञानाची बाजारपेठ अशी राहिली नसून भारत आता तंत्रज्ञान विकसक आणि जागतिक स्तरावर विश्वसनीय भागीदार म्हणून विकसित होत आहे, असे त्यांनी सांगितले.
'भारत इनोव्हेट्स 2026' ही राष्ट्रीय नवोपक्रम चळवळ असून, नवप्रवर्तक, गुंतवणूकदार, संस्था, उद्योग आणि सरकारे यांच्यातील सहयोगासाठीचे जागतिक व्यासपीठ आहे, असे प्रधान म्हणाले. "समावेशकतेसाठी नवोपक्रम" या भारतीय तत्त्वज्ञानावर भर देत, ते म्हणाले, की भारताच्या नवोपक्रमांचा उद्देश केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करणे इतकाच नाही, तर जगासाठी, विशेषतः 'ग्लोबल साऊथ' अर्थात विकसनशील राष्ट्रांसाठी विस्तारक्षम, किफायतशीर आणि समावेशक उपाययोजना पुरवणे हादेखील आहे.

फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या 'भारत इनोव्हेट्स 2026' मध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांनी आमंत्रित केले. भारताला भागीदारी, सहयोग आणि समन्वयाद्वारे विकास साध्य करायचा आहे. “तंत्रज्ञानाने जनसेवेचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे" आणि विकास हा नेहमी सर्वसमावेशी असला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करत, प्रधान यांनी समग्र मानवतेच्या हितासाठी भारताच्या या नवोपक्रम प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन जागतिक भागीदारांना केले.
सुवर्णा बेडेकर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260462)
अभ्यागत कक्ष : 3