दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी यांनी घेतला एपीटी 2.0 चा आढावा
Posted On:
12 MAY 2026 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
केंद्रीय दूरसंवाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आज भारतीय टपाल विभागाच्या एपीटी 2.0 (प्रगत टपाल तंत्रज्ञान 2.0) या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा सविस्तर आढावा घेतला आणि भारतीय टपाल विभागाला एका आधुनिक लॉजिस्टिक्स व सेवा केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात, त्याचे महत्त्व अधोरेखित केले.

एपीटी 2.0 शाखा कार्यालयांना रिअल-टाइम इंटेलिजन्स देऊन कसे सक्षम करत आहे, त्यामुळे स्थानिक मागणीचे विश्लेषण करणे, कामगिरीवर लक्ष ठेवणे आणि क्षेत्रीय स्तरावर जलद, डेटा-आधारित निर्णय घेणे कसे शक्य होत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. एआय एकात्मीकरणामुळे टपाल विभागला मोठ्या प्रमाणातील परिचालन डेटावर प्रक्रिया करणे, परिणामांचा अंदाज बांधणे, नियमित कामे स्वयंचलित करणे आणि संपूर्ण टपाल नेटवर्कमध्ये सेवा वितरणात लक्षणीय वाढ करण्यास मदत होत आहे.
या क्षमतांमुळे टपाल विभागाला जलद सेवा वितरण, मानवी हस्तक्षेपात घट, सुधारित निर्णयक्षमता, वाढते ग्राहक समाधान आणि अधिक विश्वसनीय व कार्यक्षम कामकाज यांसारखे स्पष्ट लाभ साध्य करता येत असल्याचे डॉ. पेम्मासानी यांनी नमूद केले.
या प्लॅटफॉर्ममुळे होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक परिणामांवर त्यांनी भर दिला. विशेषतः सेवा कमी उपलब्ध असलेल्या ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमधले ग्राहक ओळखणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे, शाखा कार्यालय स्तरावर सुधारित सेवा आणि वेळेवर, डेटा-आधारित पोहोचद्वारे महसुलाच्या नवीन संधी निर्माण करणे, या प्लॅटफॉर्मच्या क्षमतेवर त्यांनी भर दिला. शाखा-स्तरीय डेटाचे कृतीयोग्य माहितीमध्ये रूपांतर करून, एपीटी 2.0 बदलत्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात भारतीय टपाल विभागाची स्पर्धात्मकता बळकट करत आहे.
भारतीय टपाल विभाग, राष्ट्रीय लॉजिस्टिक कणा म्हणून विकसित होण्यासाठी हे परिवर्तन अत्यंत आवश्यक असून ते डिजिटलरित्या सशक्त आणि सेवाभिमुख संस्था दृष्टिकोनाला अनुरूप असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार तळाच्या स्तरापासून या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. एका पारंपरिक जुन्या व्यवस्थेकडून अधिक जलद, कॉर्पोरेट शैलीच्या, तंत्रज्ञानप्रणित संस्थेकडे, असा स्पष्ट सांस्कृतिक बदल घडवण्याचा शासनाचा दृष्टिकोन यातून दिसून येतो.
सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे, डेटाची सत्यता जपणाऱ्या, सायबर सुरक्षेला बळकटी देणाऱ्या आणि परिणामी, विश्वासार्ह, लवचिक व भविष्यासाठी सज्ज अशा डिजिटल सार्वजनिक सेवांची उपलब्धता शक्य करणाऱ्या बळकट आणि सुरक्षित संरचनांची सुनिश्चिती होते, असे डॉ. पेम्मासानी यांनी अधोरेखित केले. यामुळे देशाच्या विस्तारणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांवरील विश्वास अधिक दृढ होत असून व्याप्तीसोबत सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित होत आहे.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260288)
अभ्यागत कक्ष : 11