पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

Posted On: 11 MAY 2026 3:26PM by PIB Mumbai

जय सोमनाथ ! 

जय सोमनाथ ! 

हर-हर महादेव !

गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, उपमुख्यमंत्री भाई हर्ष संघवी जी, गुजरात सरकारचे मंत्रीगण, खासदार आणि आमदार, इतर सर्व मान्यवर, बंधु आणि भगिनींनो,

आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!

 

मित्रांनो,

ज्यांच्या इच्छेने काळ स्वतः प्रकट होतो, जे स्वतः कालातीत आहेत, जे स्वतः काळस्वरूप आहेत, आज त्या देवाधिदेव महादेवाच्या विग्रह प्रतिष्ठेची आपण 75 वर्षे साजरी करत आहोत. ही सृष्टी ज्यांच्यापासून निर्माण होते, ज्यांच्यामध्ये विलीन होते, 'यतो जायते पाल्यते येन विश्वं, तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्'! आज आपण त्यांच्या धामच्या पुनर्निर्माणाचा उत्सव साजरा करत आहोत. ज्यांनी हलाहल प्राशन करून नीलकंठ रूप धारण केले, आज त्यांच्याच चरणी येथे सोमनाथ अमृत महोत्सव होत आहे. ही सर्व भगवान सदाशिवाचीच लीला आहे.

मित्रांनो,

दादा सोमनाथ यांचा अनन्य भक्त म्हणून मी कितीतरी वेळा येथे आलो आहे, कितीतरी वेळा त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आहे. पण आज जेव्हा मी येथे येत होतो, तेव्हा काळाचा हा प्रवास एक सुखद अनुभूती देत होता. काही महिन्यांपूर्वीच मी येथे आलो होतो. तेव्हा आपण 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' साजरे करत होतो. पहिल्या विध्वंसाच्या 1000 वर्षांनंतरही सोमनाथ अविनाशी असल्याचा अभिमान आणि आज या आधुनिक स्वरूपाच्या प्राणप्रतिष्ठेची 75 वर्षे; आपण केवळ दोन कार्यक्रमांचे भाग बनलो नाही, तर भगवान शिवांनी आपल्याला हजार वर्षांच्या अमृतमय प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी दिली आहे.

मित्रांनो,

75 वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी सोमनाथ मंदिराची पुनर्स्थापना होणे, हा काही साधा प्रसंग नव्हता. जर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला होता, तर 1951 मधील सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या स्वतंत्र चेतनेचा उद्घोष केला होता. स्वातंत्र्याच्या वेळी, सरदार साहेबांनी 500 हून जास्त संस्थानांना एकत्र आणून भारताचे आधुनिक भारताची निर्मिती केली. त्याचबरोबर, सोमनाथच्या पुनर्निर्माणातून त्यांनी जगाला दाखवून दिले की, भारत केवळ स्वतंत्र झाला नाही, तर भारत आपल्या प्राचीन गौरवाला पुन्हा प्राप्त करण्याच्या मार्गावरही आता पुढे जात आहे.

मित्रांनो,

म्हणूनच आज याप्रसंगी मी केवळ 75 वर्षांचा इतिहास पाहत नाही आहे. मी येथे पाहत आहे - विनाशातून सृजनाचा संकल्प, जो सोमनाथाने चरितार्थ केला आहे. मी येथे पाहत आहे - असत्यावर सत्याचा विजय, जो प्रभास-पाटणने वारंवार अनुभवला आहे. मी येथे पाहत आहे - हजारो वर्षांची आध्यात्मिक चेतना, जिने मानवमात्राच्या कल्याणाची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. मी येथे पाहत आहे - भारताचे ते अविनाशी स्वरूप, ज्याला शतकांच्या कुत्सित प्रयत्नांनीही पुसता आले नाही किंवा हरवता आले नाही. आणि मी येथे पाहत आहे - सोमनाथ अमृत-महोत्सव; हा केवळ भूतकाळाचा उत्सव नाही, तर हा पुढील एक हजार वर्षांसाठी भारताच्या प्रेरणेचा महोत्सव आहे. मी सर्व देशवासियांना, दादा सोमनाथ यांच्या कोटी कोटी भक्तांना या महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आजचा दिवस आणखी एका कारणासाठी विशेष आहे. 11 मे 1998, म्हणजेच आजच्याच दिवशी भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. देशाने 11 मे रोजी पहिल्या तीन अणुचाचण्या केल्या. आपल्या वैज्ञानिकांनी भारताचे सामर्थ्य, भारताची क्षमता जगासमोर ठेवली आणि जगभरात मोठी खळबळ उडाली. भारत, असा कोण आहे, जो अणुचाचणी करेल? या भावनेने जगातील अनेक शक्ती संतप्त झाल्या आणि भारताला रोखण्यासाठी, दबावाखाली आणण्यासाठी जगभरातील सामर्थ्यशाली राष्ट्रे पुढे सरसावली. अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले. आर्थिक संकट निर्माण करण्याचे मार्ग उभे करण्यात आले. कोणीही डगमगले असते. जेव्हा जगभरातील मोठ्या शक्ती इतका मोठा हल्ला करतात, तेव्हा पुढचा मार्ग दिसत नाहीत. पण आपण वेगळ्या मातीचे बनलो आहोत. 11 मे नंतर जग आपल्यावर तुटून पडले होते. 11 मे रोजी वैज्ञानिकांनी आपले काम केले होते. पण 13 मे रोजी पुन्हा दोन अणुचाचण्या झाल्या, त्यातून जगाला समजले की भारताची राजकीय इच्छाशक्ती किती अढळ आहे. त्यावेळी संपूर्ण जगाचा दबाव भारतावर होता, पण अटलजींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दाखवून दिले की आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. जगातील कोणतीही ताकद भारताला झुकवू शकत नाही किंवा दबावात आणू शकत नाही.

मित्रांनो,

देशाने पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव दिले होते. कारण शिवासोबत शक्तीची आराधना ही आपली परंपरा राहिली आहे. अर्धनारीश्वर शिव स्वतः देखील शक्तीसोबतच पूर्ण होतात. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा देशाची 'चांद्रयान' मोहीम यशस्वी झाली, तेव्हा चंद्रावर जिथे भारताचा रोव्हर उतरला, त्या ठिकाणाचे नावही आपण 'शिवशक्ती पॉइंट' ठेवले आहे. कारण, आमच्या श्रद्धेत चंद्र शिवाशी जोडलेला आहे आणि शिव शक्तीशी जोडलेले आहेत. आणि हे किती सुखद आहे की चंद्राच्या नावावरूनच या ज्योतिर्लिंगाला आपण 'सोमनाथ' म्हणतो.

मित्रांनो,

शिव आणि शक्तीच्या आपल्या आराधनेचा जो विचार आहे, तो देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठीही प्रेरणा ठरो; आज आपण हा संकल्प साकार होताना पाहत आहोत. याप्रसंगी, भगवान सोमनाथ यांच्या चरणी मी सर्व देशवासियांना 'ऑपरेशन शक्ती'च्या वर्धापन दिनाच्याही शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

जेव्हा मी गेल्यावेळी येथे आलो होतो, तेव्हा मी म्हणालो होतो - ज्याच्या नावातच सोम अर्थात अमृत सामावले आहे, त्याला नष्ट कोण करू शकते? इतिहासाच्या प्रदीर्घ कालखंडात या मंदिराने कितीतरी आक्रमणे सोसली. महमूद गझनवी, अलाउद्दीन खिल्जी यांसारखे अनेक आक्रमक आले, लुटारूंनी सोमनाथ मंदिराचे वैभव पुसण्याचा प्रयत्न केला. ते सोमनाथला एक भौतिक वास्तू मानून त्यावर वारंवार हल्ले केले. हे मंदिर पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त झाले, पण प्रत्येक वेळी नव्याने उभे राहिले, प्रत्येक वेळी ताठ मानेने उभे राहिले, कारण विध्वंसकांना माहित नव्हते की, आपल्या राष्ट्राचे वैचारिक सामर्थ्य काय आहे. आपण भौतिक शरीराला नश्वर मानणारे लोक आहोत. पण, आपल्याला ठाऊक आहे की त्यातील आत्मा अविनाशी आहे. आणि शिव तर सर्वात्मा आहेत. म्हणूनच, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या जीवांच्या संकल्पशक्तीमध्ये शिव प्रकट होत राहिले. राजा भोज, कधी राजा भीमदेव प्रथम, कधी राजा कुमारपाल, कधी राजा महीपाल प्रथम, तर कधी राव खंगार; असे अनेक शिवभक्त वेळोवेळी सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करत राहिले. लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या कितीतरी मनीषांनी प्रभास पाटण क्षेत्राचा वारसा जतन केला आणि याला शैव साधना व दर्शनाचे महान केंद्र बनवले. भाव बृहस्पती, पाशुपताचार्य आणि अनेक विद्वानांनी या तीर्थाच्या आध्यात्मिक परंपरा जिवंत ठेवल्या. विशालदेव आणि त्रिपुरांतक यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी येथील बौद्धिक चेतना सुरक्षित ठेवण्याचे पवित्र कार्य केले.

मित्रांनो,

वीर हमीरजी गोहिल, वीर वेगडाजी भील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जी, बडोद्याचे गायकवाड, जाम साहेब महाराजा दिग्विजय सिंह जी; अशा कितीतरी महान विभूती आहेत ज्यांनी सोमनाथच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण केले. मी आज याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्रीमान के. एम. मुंशी जी आणि अशा सर्व ज्ञात-अज्ञात दिव्यात्म्यांना श्रद्धापूर्वक आणि आदरपूर्वक नमन करतो. त्यांचे स्मरण आपल्याला ही प्रेरणा देते की आपल्याला केवळ आपला सांस्कृतिक वारसा पुढे न्यायचा नाही, तर ही जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांच्या हाती सोपवून जायची आहे.

मित्रांनो,

आपली सांस्कृतिक स्थळे हजारो वर्षांपासून भारताची ओळख राहिली आहेत. इतका समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. पण विडंबना पहा, आपण अनेक दशके त्याचे महत्त्व समजून घेतले नाही. जगात अशी कितीतरी उदाहरणे आहेत, जिथे परकीय आक्रमकांनी राष्ट्रीय ओळखीशी संबंधित स्थळे नष्ट केली. पण जेव्हा त्या देशातील लोकांना संधी मिळाली, तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन आपली ओळख पुन्हा जपली, पुन्हा सावरली आणि पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. पण आपल्याकडे राष्ट्रीय स्वाभिमानाशी संबंधित विषयांवरही राजकारण होत राहिले. सोमनाथ हे स्वतः याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जबाबदाऱ्यांपैकी एक होती की सोमनाथ मंदिराचा उद्धार करणे. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी यासाठी खूप प्रयत्न केले. पण आपल्याला ठाऊक आहे की त्यांना यासाठी नेहरूजींचा किती विरोध सहन करावा लागला होता. मी आज याच्या विस्तारात जाणार नाही, पण ही सरदार साहेबांची इच्छाशक्ती होती की इतक्या विरोधामुळेही सरदार साहेब डगमगले नाहीत. सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माणही झाले आणि देशाने शतकांचा कलंकही धुवून काढला.

मित्रांनो,

दुर्दैवाने देशात अशा शक्ती आजही प्रभावी आहेत, ज्यांना राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरण अधिक महत्त्वाचे वाटते. राम मंदिर निर्माणासारख्या प्रसंगीही आपण पाहिले आहे की कशा प्रकारे राम मंदिर निर्माणाचाही विरोध केला गेला. आपल्याला अशा मानसिकतेपासून सावध राहायचे आहे. या प्रकारच्या संकुचित राजकारणाला आपल्याला मागे सोडावे लागेल. आपल्याला विकास आणि वारसा सोबत घेऊन पुढे जावे लागेल.

मित्रांनो,

गेल्या वर्षांत मला सोमनाथ ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून सोमनाथ दादांची सेवा करण्याची जी संधी मिळाली आणि या मंदिराच्या व क्षेत्राच्या विकासासाठी जी ऐतिहासिक कामे झाली, तो बदल आज आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. पण सोबतच या सेवेचा मला वैयक्तिक लाभही झाला आहे. आज मला देशातील सर्व पवित्र तीर्थांच्या विकासाची जी संधी मिळत आहे, हा भगवान सोमनाथ यांचाच कृपाप्रसाद आहे.

मित्रांनो,

आज काशीमध्ये अनेक शतकांनंतर बाबा विश्वनाथ धामाचा इतका भव्य विस्तार झाला आहे. आज उज्जैनमध्ये महाकाल महालोकचे विशाल दर्शनही आपल्याला घडत आहे. केदारनाथ धामाचे पुनर्निर्माणही झाले आहे. जसे मी आधी सांगितले, अयोध्येत 500 वर्षांची प्रतीक्षाही पूर्ण झाली आहे. आज तिथे भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान आहेत.

मित्रांनो,

अशी कितीतरी पवित्र तीर्थे, पवित्र मठ, मंदिरे आणि क्षेत्रे ज्यांची महिमा आपण पुराणात ऐकली आहे, आज तिथे आपल्याला त्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडू लागले आहे. आणि हे सर्व काही 10-12 वर्षांच्या आत झाले आहे.

मित्रांनो,

आपल्या सांस्कृतिक केंद्रांची उपेक्षा देशाच्या विकासात मोठा अडथळा राहिली आहे. कारण, आपली तीर्थे ही भारताच्या आध्यात्मिक-सामाजिक व्यवस्थेचे केंद्र तर आहेतच, पण ती देशाच्या आर्थिक प्रगतीचे स्रोतही राहिली आहेत. आज तुम्ही पहा - चारधाम महामार्ग प्रकल्प, गोविंदघाट ते हेमकुंड साहिबपर्यंत रोपवे प्रकल्प, करतारपूर कॉरिडॉर, बौद्ध सर्किटचा विकास; यांच्या माध्यमातून देशातील तीर्थक्षेत्रांमध्ये आर्थिक क्रियाकलाप वाढले आहेत. सोमनाथ परिसरही याचे एक सशक्त उदाहरण आहे. आज सोमनाथ मंदिर ट्रस्टशी शेकडो कुटुंबे जोडलेली आहेत. हजारो लोकांचे जीवन या क्षेत्राशी जोडलेले आहे. देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून जे लोक येथे येतात, ते गुजरातच्या इतर भागांतही जातात. यामुळे प्रदेशात आणि देशात प्रगतीची नवीन द्वारे उघडतात.

मित्रांनो,

आपली श्रद्धा आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा देखील देते. कारण आपण मानतो - 'सर्वं खल्विदं ब्रह्म' ! अर्थात, सृष्टीचा प्रत्येक घटक, हे संपूर्ण निसर्गही ईश्वराचेच स्वरूप आहे. म्हणूनच, आपली श्रद्धा नद्यांमध्येही आहे आणि वृक्षांमध्येही आहे. आपण जंगलांकडेही श्रद्धेच्या दृष्टीने पाहतो. आपण पर्वतांमध्येही पवित्रतेची भावना ठेवतो. आणि आज जेव्हा जग नैसर्गिक जीवनशैलीकडे परतत आहे, तेव्हा आपल्याला आपल्या या शक्तीलाही ओळखावे लागेल. आपल्याला आपल्या तीर्थांच्या आणि मंदिरांच्या विकासासोबतच त्यांच्या प्रतिष्ठेसाठी जागरूक व्हावे लागेल. आपण असे जीवन स्वीकारावे ज्यामुळे निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. सोबतच, आपण आपल्या पुण्यस्थळांना संपूर्ण जगासाठी एक उदाहरण म्हणून विकसित करूया. आपल्याला हे संकल्प आपल्या श्रद्धेशी जोडून जगावे लागतील.

मित्रांनो,

जेव्हा नवीन पिढ्या आपल्या इतिहासाशी, आपल्या श्रद्धेशी आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांशी जोडल्या जातात, तेव्हा राष्ट्राचे आत्मबळ अधिक मजबूत होते. आज भारत ज्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे, त्यात आपल्या या सांस्कृतिक निरंतरतेचीही मोठी भूमिका आहे. आधुनिकता आणि वारसा; भारतात या गोष्टींना कोणीही वेगळे करू शकत नाही. भारतात हे एकमेकांचे विरोधी नाहीत, तर हे हातात हात घालून पुढे जाणारे सामर्थ्य आहेत. सोमनाथ आपल्याला आठवण करून देतो की कोणतेही राष्ट्र तेव्हाच दीर्घकाळ मजबूत राहू शकते, जेव्हा ते आपल्या मुळांशी जोडलेले राहते. जेव्हा आपण आपला वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत त्याच श्रद्धा आणि विश्वासाने त्यांच्या स्वाधीन करू. 75 वर्षांपूर्वी, जेव्हा या पुनर्निर्मित सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली होती, तेव्हा भारताने एक नवीन चेतना यात्रा सुरू केली होती. आज, 75 वर्षांनंतर तीच यात्रा अधिक व्यापक रूपात आपल्यासमोर आहे. आपल्याला याला नव्या उंचीवर न्यायचे आहे. आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी दादा सोमनाथ यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहो, हिच प्रार्थना. पुन्हा एकदा सर्व देशवासियांना, वारशावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि तुम्हा सर्वांना या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासोबत म्हणा- 

जय सोमनाथ। 

जय सोमनाथ। 

हर-हर महादेव।

***

NitinFulluke / NehaKulkarni / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2260177) अभ्यागत कक्ष : 7