पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंतर मंत्रालयीन वार्ताहर परिषद


2026 च्या खरीप हंगामासाठी खतांचा निर्धारित गरजेच्या 51% पेक्षा जास्त साठा उपलब्ध,33% या सरासरी पातळीपेक्षा हा साठा लक्षणीयरीत्या जास्त

गेल्या 3 दिवसांत, घरगुती एलपीजी वापराच्या स्वयंपाकासाठीच्या सिलेंडरच्या सुमारे 1.14 कोटी इतक्या झालेल्या मागणीपर नोंदणीच्या तुलनेत 1.26 कोटींपेक्षा जास्त सिलेंडरचे प्रत्यक्ष वितरण

Posted On: 11 MAY 2026 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार  नागरिकांना सातत्याने अद्ययावत माहिती देण्याचे प्रयत्न  करत आहे. यासंदर्भात आज नॅशनल मीडिया सेंटर इथे एका वार्ताहर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इंधनाची उपलब्धता, सागरी क्षेत्राशी संबंधित कार्यान्वयन, संघर्षग्रस्त क्षेत्रातील भारतीय नागरिकांना पुरवले जात असलेले सहकार्य आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

रसायन आणि खते मंत्रालयानेही खतांच्या साठ्याची सद्यस्थिती आणि उपलब्धतेबद्दल माध्यमांना माहिती दिली.

खतांच्या साठ्याची सद्यस्थिती आणि उपलब्धता:

2026 च्या खरीप हंगामासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 390.54 लाख मेट्रिक टन इतक्या खताच्या आवश्यकतेचा अंदाज मांडला आहे. त्या तुलनेत आजमितीला सुमारे 199.65 लाख मेट्रिक टन (51% पेक्षा जास्त) इतका खताचा साठा उपलब्ध आहे. साठ्याचे हे प्रमाण सुमारे 33% या नेहमीच्या सरासरी पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यातून सरकारचे सुधारित नियोजन, अग्रीम साठवणूक आणि रसद पुरवठा व्यवस्थेचे कार्यक्षम व्यवस्थापन दिसून येते.

अंमलबजावणी आणि देखरेख विषयक कार्यवाही:

एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अंमलबजावणी स्वरूपाची कार्यवाही देशभरात सुरूच आहे. या अंतर्गत काल देशभरात 1500 पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (PSU OMCs) विनासूचना तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. याअंतर्गत 382 एलपीजी वितरकांना दंड आकारण्यात आला आहे, तर कालपर्यंत 76 एलपीजी वितरकांना निलंबित करण्यात आले आहे.

एलपीजी पुरवठा:

घरगुती वापराच्या एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती:

काल उद्योगक्षेत्रांतर्गत एलपीजी सिलेंडरच्या ऑनलाइन मागणीपर नोंदणीचे प्रमाण वाढून 98% पर्यंत पोहोचले.

इंधनाचा गैरवापर रोखण्यासाठी वितरण प्रमाणीकरण सांकेतांक आधारित वितरणाचे प्रमाण सुमारे 94% पर्यंत वाढले आहे. हा सांकेतांक ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो.

घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या वितरणाची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने बहुतांश एलपीजी वितरक रविवारीही कार्यरत होते.

गेल्या 3 दिवसांत, घरगुती एलपीजी वापराच्या स्वयंपाकासाठीच्या सिलेंडरच्या सुमारे 1.14 कोटी इतक्या झालेल्या मागणीपर नोंदणीच्या तुलनेत 1.26 कोटींपेक्षा जास्त सिलेंडरचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले आहे.

व्यावसायिक एलपीजी (LPG) पुरवठा आणि वाटप उपाययोजना : 
• गेल्या 3 दिवसांत, 1.4 लाखांहून अधिक 5 किलो वजनाच्या 'एफटीएल' (FTL) सिलिंडरची विक्री झाली आहे.
• 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (PSU OMCs) 5 किलो एफटीएल सिलिंडरसाठी सुमारे 11,300 जनजागृती शिबिरांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये 2 लाखांहून अधिक 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री झाली.
• काल, अंदाजे 93 शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 2100 - 5 किलो एफटीएल सिलिंडर विकले गेले.
• व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनाच्या एकूण 8.97 लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडरची विक्री झाली आहे.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी (PNG) विस्तार उपक्रम:

• मार्च 2026 पासून,  सुमारे 6.79 लाख पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, अतिरिक्त 2.68 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 9.47 लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय, सुमारे 7.29 लाख ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.

• 10 मे 2016 पर्यंत, 52,300 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे आपल्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

इंधन उपलब्धता आणि दर नियंत्रण उपाययोजना:

• देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर स्थिर असून, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर कोणतीही दरवाढ झालेली नाही.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक व्यवस्थापन:

• मंत्रालयाने नौवहन महासंचालनालयाच्या (DG Shipping) माध्यमातून आतापर्यंत 3,096 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये गेल्या 72 तासांत आखाती देशांतील विविध ठिकाणांहून परतलेल्या 77 खलाशांचा समावेश आहे.

संबंधित क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा:

• माहितीची देवाणघेवाण आणि प्रयत्नांमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहे.
• विमान वाहतुकीच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असून, संबंधित क्षेत्रांतून भारतातील विविध शहरांसाठी अतिरिक्त विमाने चालवण्यात येत आहेत.

 

सुषमा काणे/तुषार पवार/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2260006) अभ्यागत कक्ष : 12