कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत 'सेहत मिशन'चा शुभारंभ: शेतीपासून आरोग्यापर्यंत भारताचा नवा मोठा उपक्रम

Posted On: 11 MAY 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि  खते मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत "सेहत मिशन" चा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीपासून आरोग्यापर्यंत भारताचा हा एक नवा मोठा उपक्रम आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)  आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर)  यांच्या भागीदारीतून सुरू झालेला हा उपक्रम निरोगी अन्न, निरोगी शेती आणि निरोगी भारत या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

सेहत मिशन” हे भारताच्या धोरण-निर्मिती प्रक्रियेतील एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे, सरकार आता केवळ उपचारांवर नाही, तर प्रतिबंध, वेळेवर निदान आणि निरंतर काळजी यावर भर देत आहे, असे नड्डा यांनी या कार्यक्रमात बोलताना नमूद केले. भारत आता 'प्रतिक्रियाशील' नाही तर पूर्वलक्षी विचारसरणीने पुढे जात आहे, असेही नड्डा म्हणाले. दीर्घकाळापासून कृषी आणि आरोग्य संस्था वेगवेगळ्या दिशांनी काम करत होत्या. मात्र, आता भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांचे एकत्र येणे ही विज्ञान-आधारित समाधानांची एक नवी सुरुवात आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे मिशन कुपोषण आणि वेगाने वाढणारे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासारखे असंसर्गजन्य रोग या दोन्ही आव्हानांचा सामना करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असेही ते पुढे म्हणाले. भारताला आता स्वतःचा अनुभव, स्वतःचे संशोधन आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्वदेशी उपाय विकसित करावे लागतील, असे त्यांनी सांगितले. कमी खर्चिक, उच्च दर्जाचे आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित उपायच देशासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरतील आणि या दिशेने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पूर्ण वचनबद्धतेने काम करेल, अशी हमी त्यांनी दिली.

सेहत मिशन हा केवळ एक कार्यक्रम नसून तो समग्र सरकारी सहभाग आणि समग्र व्यवस्थात्मक सहभाग या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे, यामध्ये विज्ञान, धोरण आणि अंमलबजावणी यांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल, असेही नड्डा यांनी अधोरेखित केले.  हे मिशन 'हेल्दी इंडिया' आणि 'स्ट्रॉन्ग इंडिया'च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सेहत अभियाना’चा शुभारंभ भारतासाठी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व पाऊल असून शेती, पोषण आणि आरोग्याला एकत्र आणत निरोगी भारताच्या उभारणीसाठीची मजबूत दिशा यामुळे निश्चित केली जाईल, असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

हाच विचार पुढे नेण्यासाठी, आयसीएआर आणि आयसीएमआर यांनी एकत्रित येत, ‘सेहत अभियान’ सुरू केला असून ही अभियान, शेती पासून थाळी, आणि थाळीपासून आरोग्य अशी एक वैज्ञानिक साखळी तयार करणार आहेत. हे अभियान, जैव- पोषणमूल्ययुक्त पिके, पोषणयुक्त खाद्यपदार्थ, एकीकृत कृषी प्रणाली, शेतकऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुरक्षिततेचे उपाय, जीवनशैलीशी संबधित आजारांवर मात करता येईल,असे उपयुक्त आहार आणि ‘वन हेल्थ’ या दृष्टिकोनावर केंद्रीत झाले आहे.

आज देशात अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन होत आहे, मात्र आता आपले पुढचे लक्ष्य, पोषणयुक्त उत्पादन हे असले पाहिजे. शेतकरी आणि शेतमजुरांचे आरोग्य हे ही या अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे चौहान यांनी सांगितले. कीटकनाशकांच्या संपर्कामुळे, रसायनांच्या असंतुलित वापरामुळे आणि शेतात काम करताना उद्भवणाऱ्या धोक्यांमध्ये घट करण्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना, सुरक्षित शेती पद्धती आणि जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

योग्य आहार आणि योग्य पिकांच्या निवडीवर शास्त्रीय पद्धतीने काम केले, तर आहार हेच औषध ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या संदर्भात लोकांना आजारांपासून वाचवणारे आणि रोगनियंत्रणास मदत करणारे अन्नपर्याय विकसित करण्यावर आणि त्यांचा प्रसार करण्यावर त्यांनी भर दिला.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान निश्चित कालमर्यादेत पूर्ण होऊन, ठोस परिणाम देईल आणि देशातील जनतेला निरोगी ठेवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी वैज्ञानिक, अधिकारी आणि सर्व सहभागी संस्थांचे अभिनंदन करत त्यांनी सांगितले की, कृषी आणि आरोग्य यांच्या या संगमाचा लाभ केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला होईल.

सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2259998) अभ्यागत कक्ष : 9