भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. जितेंद्र सिंह यांनी 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' 2026 च्या तयारीचा घेतला आढावा ; भारत आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या व्यवस्थेची केली पाहणी.

Posted On: 09 MAY 2026 5:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज आगामी “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर” (एसएसएसएस) अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि आगामी भारत आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या व्यवस्थेचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. दोन्ही राष्ट्रीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी या संस्थांमध्ये  समन्वय साधावा तसेच  त्यामध्‍ये  लोकांचा सहभाग व्यापक   असावा, असे आवाहन डॉ . सिंह यांनी या बैठकीत केले.

पृथ्वी भवन येथे झालेल्या या बैठकीत, 12 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेच्या 2026 च्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेची सांगता आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाच्या दिवशी होईल. या बैठकीला पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि त्याच्या संलग्न संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ, तसेच भारतीय तट रक्षक दल, सीमा जागरण मंच, पर्यावरण संरक्षण गतीविधी, विभा (VIBHA)आणि इतर संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सहसचिव डी. सेंथिल पांडियन आणि शास्त्रज्ञ जी. डॉ. जगवीर सिंग हे सुद्धा  या बैठकीला उपस्थित होते.

2026 ची मोहीम ही भारताच्या 11,098 किमी लांबीच्या किनारपट्टीवर एक आठवडाभर चालणारा महत्वाचा देशव्यापी उपक्रम म्हणून राबवली जाईल. या मोहिमेमध्‍ये  केंद्रीय आणि राज्य मंत्रालये, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, जिल्हा प्रशासन, युवा संघटना आणि स्थानिक समुदाय यांचा सक्रिय सहभाग असेल,असे मंत्री जितेंद्र सिंह यांनी  यावेळी सांगितले.ही मोहीम किना-यांचे  संवर्धन आणि सागरी पर्यावरणीय सुरक्षेविषयी वाढत्या राष्ट्रीय वचनबद्धतेचे प्रतीक आहे,असे ही त्यांनी पुढे नमूद केले

या बैठकीदरम्यान सादर झालेल्या एका सादरीकरणात, राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्र (एनसीसीआर) द्वारे 2025 मोहिमेच्या प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. यावेळी  नागरिक-विज्ञान व्यासपीठ असलेल्या आणि  किनारी प्रदेशांमधून 150 टनांहून अधिक सागरी कचऱ्याच्या दस्तऐवजीकरणास मदत झाली आहे,अशा   'सागर ॲप'च्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत नील अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेचा संदर्भ देत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, की वैज्ञानिक संस्था आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या सहभागाद्वारे समर्थित, समुदाय-चालित पर्यावरण संवर्धनाचे एक आदर्श म्हणून भारताचे किनारी उपक्रम उदयास येत आहेत.

यावर्षी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यात होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या तयारीचाही मंत्रीमहोदयांनी यावेळी आढावा घेतला आणि विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांमध्ये जनतेचा सहभाग अधिक दृढ करण्यासाठी वैज्ञानिक संस्था, नवोपक्रम करणारे उद्योजक, विद्यार्थी आणि तरुण संशोधकांचा सहभाग वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

***

सुवर्णा बेडेकर/संपदा पातगोंकार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2259486) अभ्यागत कक्ष : 8