पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींवर आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद
आतापर्यंत 3,019 हून अधिक भारतीय खलाशांचे सुरक्षितपणे मायदेशी प्रत्यावर्तन, गेल्या 48 तासांत आखाती क्षेत्रातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या 20 खलाशांचा समावेश
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार आखाती क्षेत्रातल्या देशांशी संपर्क मोहीम सुरू; परराष्ट्र सचिवांची 7 मे 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीला अधिकृत भेट
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2026 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2026
पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने नागरिकांना नियमित अद्ययावत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या संदर्भात, आज नॅशनल मीडिया सेंटरमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इंधनाची उपलब्धता, सागरी मोहिमा आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्थिरता राखण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबत माहिती दिली.
ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सध्याच्या इंधन पुरवठा स्थितीबद्दल माहिती दिली. यात पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली. त्यानुसार:
- गेल्या 2 दिवसांत, सुमारे 87 कोटी 66 लाख सिलिंडरचे बुकिंग झाले असून त्यापैकी 97 लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले.
व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटपासंबंधी उपाययोजना:
- एकूण व्यावसायिक एलपीजी वाटप संकटपूर्व पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले आहे, त्यामध्ये 10% सुधारणा-संबंधित वाटपाचा समावेश आहे.
- गेल्या 2 दिवसांत, 1.11 लाखांहून अधिक 5 किलोग्रॅम एफटीएल सिलिंडरची विक्री झाली.
- गेल्या 2 दिवसांत, एकूण 15,493 एमटी (8.15 लाखांहून अधिक 19 किलोग्रॅम च्या एलपीजी सिलिंडरच्या बरोबरीचे) व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे.
- गेल्या 2 दिवसांत, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांद्वारे) एकूण 613 एमटी ऑटो एलपीजीची विक्री झाली आहे.
- 07.05.2026 पर्यंत, 50,400 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in वेबसाइटद्वारे आपल्या एलपीजी जोडणीचा त्याग केला आहे.
- मंत्रालयाने, नौवहन महासंचालनालयामार्फत आखाती क्षेत्रातल्या विविध ठिकाणांहून गेल्या 48 तासांतील 20 जणांसह आतापर्यंत 3,019 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय केली आहे.
क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा
परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामध्ये या क्षेत्रातल्या भारतीय समुदायाची सुरक्षितता आणि कल्याणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यात खालील माहिती देण्यात आली:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार आखाती क्षेत्रातील देशांशी संपर्क मोहीम सुरू आहे.
- भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 7 मे 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीला अधिकृत भेट दिली. यापूर्वी, परराष्ट्र मंत्र्यांनी 11-12 एप्रिल 2026 दरम्यान यूएईला भेट दिली होती आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 25-26 एप्रिल 2026 रोजी यूएईला भेट दिली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी 9-10 एप्रिल 2026 रोजी कतारला भेट दिली होती. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 19 एप्रिल 2026 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली होती.
- या भेटीदरम्यान, परराष्ट्र सचिवांनी रीम अल हाशिमी (राज्यमंत्री आणि भारतासाठी विशेष दूत) आणि महामहीम खल्दून अल मुबारक (मुबादला गुंतवणूक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) यांची भेट घेतली.
- परराष्ट्र सचिवांनी राज्यमंत्री आणि भारतासाठीचे विशेष दूत रीम अल हाशिमी यांच्यासोबत द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य, ऊर्जा, संचारसंपर्क, संरक्षण आणि सुरक्षा, फिनटेक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि जनसंपर्क या क्षेत्रांमधील सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंनी पश्चिम आशिया प्रदेशातील सद्यस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक व जागतिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली.
- परराष्ट्र सचिवांनी रीम अल हाशिमी आणि फ्रान्सच्या युरोप मंत्रालयाचे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासचिव मार्टिन ब्रिएन्स यांच्यासमवेत भारत-फ्रान्स-यूएई चौकटीअंतर्गत झालेल्या त्रिपक्षीय बैठकीतही सहभाग घेतला. तिन्ही बाजूंनी त्रिपक्षीय भागीदारीप्रति आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आणि निश्चित कालमर्यादेसह एका संरचित आराखड्यावर सहमती दर्शवली.
- माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच प्रयत्नांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहे.
- भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी मंत्रालयात विशेष समर्पित नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
- भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास वेळेवर मदत पुरवण्यासाठी चोवीस तास हेल्पलाईन चालवत असून आपल्या नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत. ते स्थानिक सरकारांच्याही निकट संपर्कात आहेत.
- नियमित सूचना जारी केल्या जात आहेत ज्यामध्ये स्थानिक शासनाच्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, दूतावास सेवा आणि समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांशी संबंधित माहितीचा समावेश आहे.
- भारतीय दूतावास रहिवासी भारतीय समुदायाच्या सक्रिय संपर्कात आहे. भारतीय समुदाय संघटना, संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधला जात आहे.
- सरकार या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत, ज्यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधणे, दूतावासाची मदत देणे आणि भारतात परत येण्याच्या विनंत्यांसाठी साहाय्य करणे यांचा समावेश आहे.
* * *
शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259236)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam