पंचायती राज मंत्रालय
पंचायत विकास आराखडा (2026-27) तयार करण्यासाठी नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
03 MAY 2026 2:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2026
पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने 4 आणि 5 मे 2026 रोजी, नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणार असून, पंचायत विकास आराखडा तयार करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य विषय आहे.
पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि जलशक्ती मंत्रालयाचे सचिव अशोक के. के. मीना यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
उद्घाटन सत्रात पंचायत विकास आराखडा (2026-27) तयार करण्यासाठी जन योजना अभियान पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल. सोबतच गुणवत्तापूर्ण ग्रामपंचायत विकास आराखडा पुस्तिका आणि अद्ययावत ई-ग्रामस्वराज नियोजन पोर्टलचे अनावरण करण्यात येईल.
या कार्यशाळेत विषयानुसार ‘पंचायत विकास आराखड्याची बदलती भूमिका’ आणि ‘16व्या वित्त आयोग अनुदान आराखडा’ यांसारख्या विषयांवर चर्चा होईल.
या कार्यशाळेत भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि पंचायत राजमधील प्रमुख घटक एकत्र येतील. यामध्ये तांत्रिक सत्रे आणि गट चर्चांचे आयोजन केले जाईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गट अद्ययावत पोर्टलवर प्रारूप आराखडे तयार करतील. हे आराखडे उपजीविका, आरोग्य, बालस्नेही प्रशासन, पाणी उपलब्धता, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, सुशासन, महिला सक्षमीकरण आणि पेसा व वन हक्क कायद्याची अंमलबजावणी अशा 10 प्रमुख क्षेत्रांवर आधारित असतील.
या दोन दिवसीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश तळागाळातील नियोजन प्रक्रिया अधिक बळकट करणे, हा आहे. हे नियोजन पूर्णपणे माहिती आणि लोकसहभागावर आधारित असेल. 2026-27 या वर्षाचे पंचायत विकास आराखडे 16व्या वित्त आयोगाच्या अटींशी सुसंगत असतील, याची खात्री होईल, या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास प्रत्यक्षात दिसून येईल. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित पंचायत हा त्याचा पाया आहे, ही संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

* * *
शिल्पा नीलकंठ/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257621)
अभ्यागत कक्ष : 15