संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदल प्रमुखांचा म्यानमार दौरा

Posted On: 02 MAY 2026 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2026

 

नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, 02 ते 05 मे 2026 या कालावधीत म्यानमारच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान ते म्यानमार सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर जनरल ये विन ऊ, म्यानमारचे संरक्षण मंत्री जनरल यू ह्तुन आंग, म्यानमार नौदलाचे प्रमुख ॲडमिरल ह्तेन विन यांच्यासह म्यानमार सशस्त्र दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. या संवादांमुळे चालू असलेल्या द्विपक्षीय सागरी सहकार्याचा आढावा घेण्याची, कार्यकारी स्तरावरील संबंध अधिक मजबूत करण्याची आणि दोन्ही नौदलांदरम्यान सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याची संधी मिळेल.

या दौऱ्यात नौदल प्रमुख, म्यानमार नौदलाच्या सेंट्रल नेव्हल कमांड, नेव्हल ट्रेनिंग कमांड आणि क्रमांक 1 फ्लीट येथे भेट देणार आहेत. तसेच म्यानमार सशस्त्र दलांच्या हुतात्मा वीरांच्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. या भेटींमध्ये संरक्षण सहकार्याच्या विविध विषयांवर, विशेषतः सागरी सुरक्षा, क्षमता विकास, कार्यक्षमता वाढ आणि प्रशिक्षण यांवर भर दिला जाईल.

भारतीय नौदल म्यानमार नौदलासोबत संरक्षण सहकार्य बैठक, स्टाफ चर्चा, प्रशिक्षण देवाणघेवाण आणि परिचालनाशी संबंधित समन्वयातून नियमित संपर्क ठेवते. यामध्ये भारत-म्यानमार नौदल सराव (IMNEX), भारत-म्यानमार समन्वित गस्त (IMCOR), बंदर भेटी आणि हायड्रोग्राफी सर्वेक्षण यांचा समावेश आहे. याशिवाय, दोन्ही नौदल नियमितपणे प्रशिक्षण देवाणघेवाण पुढे नेतात, बहुपक्षीय मंचांमध्ये सहभाग घेतात आणि क्षमता वृद्धीसाठी सहकार्य करतात. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम, मिलन, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू, गोवा मॅरिटाइम कॉन्क्लेव्ह/सिम्पोजियम, IOS सागर आणि ॲडमिरल्स कप, या कार्यक्रमांमध्ये म्यानमारने सहभाग घेतला आहे.  

नौदल प्रमुखांचा हा दौरा भारत–म्यानमार यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना पुन्हा अधोरेखित करतो. उभय देशांमधले हे संबंध परस्पर आदर, विश्वास आणि हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा व स्थैर्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत.

 

* * *

आशिष सांगळे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257478) अभ्यागत कक्ष : 22