गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लेहमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या दर्शन कार्यक्रमाचे  उद्घाटन


बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिनी 75 वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे लडाखमध्ये झालेले पुनरागमन हा एक ऐतिहासिक आणि खऱ्या अर्थाने सुवर्ण क्षण

Posted On: 01 MAY 2026 7:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लेह इथे भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. बुद्ध पौर्णिमेचा आजचा दिवस लडाखच्या रहिवाशांसाठी एक ऐतिहासिक आणि खऱ्या अर्थाने सुवर्ण क्षण असल्याचे ते म्हणाले. या भूमीवर, या शुभ घटनेच्या वेळी 75 वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे झालेले आगमन बौद्ध धर्मीय अनुयायांसह इतर धर्माच्या लोकांनाही प्रेरणा देईल असे त्यांनी सांगितले.

भगवान बुद्धांच्या आयुष्यात ज्याप्रमाणे घडले, त्याप्रमाणे आपला जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे सर्व एकाच दिवशी घडणे कोणाच्याही आयुष्यात दुर्मिळ असल्याची बाब त्यांनी नमूद केली. यामुळेच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत शुभ आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगतिले. आजचा हा कार्यक्रम केवळ धार्मिक स्वरुपाचा नाही, तर हा कार्यक्रम म्हणजे ऐतिहासिक पुनर्भेट असल्याचे ते म्हणाले. इतक्या वर्षांनंतर तथागत बुद्ध या पवित्र आणि त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या भूमीत परतले आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे असे ते म्हणाले. लडाख ही शतकानुशतके धम्माचे चिरंतन अस्तित्व असलेली भूमी राहिली आहे असे त्यांनी सांगितले. जेव्हा दलाई लामा इथे येतात, त्यावेळी ते ही भूमी केवळ भौगोलिक प्रदेश नसून, बौद्ध संस्कृती आणि करुणा भावनेची जिवंत प्रयोगशाळा असल्याचे सांगतात ही बाब त्यांनी नमूद केली.

या भूमीत ज्ञानाचे जतन आणि संवर्धन झाले आहे. ज्या ज्या वेळी बौद्ध धर्मासमोर आव्हाने आली, त्या त्या वेळी या भूमीने भगवान बुद्धांचा संदेश जतन करण्याचे काम केले. ज्यावेळी शांतीचा काळ आला, त्यावेळी या जतन केलेल्या आणि समृद्ध केलेल्या ज्ञानाचा अधिक प्रचार प्रसार करण्याचे कामही या भूमीने केले असल्याचे त्यांनी सांगितले. हाच मार्ग एक तथागतांच्या शिकवण भारतातून चीन आणि इतर अनेक देशांपर्यंत विस्तारण्याचे एक माध्यम बनल्याची बाबही त्यांनी नमूद केली.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2257408) अभ्यागत कक्ष : 10