महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे ब्रिक्स महिला कार्यगटाच्या पहिल्या तयारी बैठकीचे आयोजन


बैठकीत महिला-नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार, तसेच आर्थिक वाढ, सुशासन आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रमुख चालक म्हणून महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित

Posted On: 01 MAY 2026 10:18AM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 30 एप्रिल 2026 रोजी दूरदृश्य प्रणालीमार्फत ब्रिक्स महिला कार्यगटाची पहिली तयारी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला ब्रिक्स सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच भारत सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांचे प्रतिनिधी, याशिवाय यूएन विमेन (UN Women) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांसारखे ज्ञान भागीदारही उपस्थित होते.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव कॅरालिन खोंगवार देशमुख यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले आणि चर्चेची दिशा निश्चित केली.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना ‘सक्षमता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी बांधणी’ यावर आधारित असलेल्या या बैठकीत जागतिक स्तरावरील महिलांशी संबंधित प्रमुख संकल्पना आणि सामायिक मुद्द्यांवर गहन चर्चा करण्यात आली. चर्चेत चार प्राधान्य क्षेत्रांवर भर देण्यात आला – शासन आणि नेतृत्व क्षेत्रातील महिलांचा सहभाग; आर्थिक आणि डिजिटल समावेशन; महिला उद्योजकता आणि कौशल्य विकास; तसेच हवामान बदल कृती, अन्न सुरक्षा आणि पोषण यांमध्ये महिलांची भूमिका यांचा समावेश आहे.

या बैठकीत महिला-नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला, तसेच महिलांना आर्थिक प्रगती, सुशासन आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रमुख चालक म्हणून मान्यता देण्यात आली.

ब्रिक्स सदस्य राष्ट्रांनी आपल्या भाषणांमध्ये भारताच्या अध्यक्षपदाबद्दल अभिनंदन केले, प्राधान्य क्षेत्रांचे स्वागत करुन त्यांना पाठिंबा दिला, तसेच सहकार्य आणि परस्पर शिकण्याची भावनेला पाठबळ दिले.

या चर्चांमधून मिळालेले निष्कर्ष पुढे 6–7 जुलै 2026 रोजी होणाऱ्या ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बैठकीत आणि 8–9 जुलै 2026 रोजी केरळमधील कोची येथे आयोजित ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठकीत अंतिम स्वरूपात मांडले जाणार आहेत.

***

हर्षल अकुडे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257220) अभ्यागत कक्ष : 17