वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले यांच्या नेतृत्वाखाली आग्र्यात उद्योग संवाद संपन्न
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारांतर्गत शिक्षण, प्रतिभा गतिशीलता आणि विविध क्षेत्रांतील संधींचा लाभ घ्या; पीयूष गोयल यांचे उद्योगांना आवाहन
Posted On:
26 APR 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले यांनी आग्र्यात एका उद्योग संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. या संवादामध्ये चामडे आणि पादत्राणे, आयुष , वैद्यकीय उपकरणे, लघु अभियांत्रिकी उद्योग, क्रीडा साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग प्रतिनिधी आणि लघु उद्योग भारती, उत्तर प्रदेश यांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. उद्योगांनी मांडलेली मते, भारताचे चामड्याचे उत्पादन कौशल्य, औषध निर्मिती उद्योग, वैद्यकीय उपकरणे आणि अभियांत्रिकी उत्पादनांची व्याप्ती आणि विविधता दर्शवणारी होती.
समावेशक, भविष्याचा वेध घेणारी आणि भारताच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी घट्ट जोडलेली व्यापार भागीदारी निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून, दोन्ही मंत्र्यांनी अधोरेखित केले की, भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्काबाबतचा (टॅरीफ) करार नाही. ही एक व्यापक चौकट असून यामध्ये बाजारपेठेची उपलब्धता, कृषी उत्पादकता, गुंतवणूक, प्रतिभा गतिशीलता (गुणवंतांचे आदानप्रदान), क्रीडा क्षेत्रातील सहकार्य, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संबंधांचा समावेश आहे. हा करार दोन्ही देशांतील उत्पादक, शेतकरी, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग(एमएसएमई), महिला उद्योजक, विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला आहे.
भारताच्या चामड्याच्या पादत्राणांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 75 टक्के वाटा उचलणाऱ्या आग्रा शहराच्या पादत्राणांना भौगोलिक मानांकन (जी आय टॅग ) मिळाले असून, 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेअंतर्गत हे एक प्रमुख उत्पादन आहे. हा मुक्त व्यापार करार लागू झाल्यापासून भारतीय निर्यातीवरील 100 टक्के शुल्क रद्द होणार असून, चामडे आणि पादत्राणांवरील शुल्क 5 टक्क्यांवरून शून्यावर येणार आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत एक निर्णायक स्पर्धात्मक लाभ मिळणार आहे.
मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाकडून उच्च मूल्यवर्धित उत्पादन या धोरणात्मक बदलामुळे हे क्षेत्र 2030 सालापर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वृद्धिंगत होण्याची क्षमता बाळगत असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी अधोरेखित केले. न्यूझीलंडमधील कच्च्या चामड्याच्या स्रोतांची भारताच्या उत्पादन क्षमतेशी सांगड ही बळकट पूरकता प्रदान करते, ज्याचा वापर करून घेण्यास दोन्ही बाजूंनी उत्सुकता दर्शवली. या वेळी दोन्ही मंत्र्यांनी आग्रा शहराला जागतिक स्तरावरील स्रोताचे स्थान, रोजगार केंद्र आणि निर्यातीचे सामर्थ्यशाली केंद्र म्हणून स्थापित करण्याबाबत उद्योग प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
या चर्चेत औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्राचाही समावेश होता. उद्योग प्रतिनिधींनी एफटीएच्या जलद नियामक प्रवेशाच्या तरतुदींचे स्वागत केले. त्यामध्ये तुलनात्मक आंतरराष्ट्रीय नियामकांकडून जीएमपी आणि जीसीपी तपासणी अहवाल स्वीकारणे याचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय उत्पादकांवरील अनुपालन भार कमी होईएल आणि उत्पादन मंजुरीला गती मिळेल . आयुषला मान्यता देणाऱ्या दोन्ही देशांसाठी पहिल्यांदाच एफटीएमधील होत असलेल्या, आरोग्य आणि पारंपरिक औषधांवरील एका समर्पित विभागाच्या समावेशाचे स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोयल यांनी एफटीए हा मुक्त द्वार आणि मुक्त विचार करणारा असल्याचे नमूद केले आणि उद्योगांना चौकटीबाहेरचा विचार करण्यास भाग पाडून औषधनिर्माण, आयुष, शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये कराराच्या व्याप्तीचा लाभ करून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत आणि लहान उद्योगांपर्यंत याचे फायदे पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन उद्योग संघटनांना केले. टॉड मॅकले यांनी भारत हा न्यूझीलंडसाठी धोरणात्मकदृष्ट्या प्राधान्य असलेला देश आहे याचा पुनरूच्चार केला आणि न्य़ूझीलंडने आतापर्यंत केलेला सर्वोच्च दर्जाचा मुक्त व्यापार करार असल्याचे नमूद केले. त्यांनी दोन्ही देशांतील उद्योगांना सक्रियपणे संयुक्त उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले आणि न्यूझीलंडच्या उद्योगव्यवसायांना भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधी अधोरेखित केल्या.
सुषमा काणे/आशुतोष सावे/विजयालक्ष्मी साळवी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255757)
अभ्यागत कक्ष : 20