युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या क्रीडा भविष्यासाठी एकात्मिक, खेळाडू-केंद्रित दृष्टीकोन आखण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘श्रीनगर खेल संकल्प’ केला प्रकाशित

Posted On: 26 APR 2026 6:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026

श्रीनगरमधील तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी विविध राज्यांचे क्रीडामंत्री आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘श्रीनगर खेल संकल्प’ या दस्तऐवजाचे प्रकाशन केले.

हा दस्तऐवज सहकारी संघराज्याच्या  तत्वावर आधारित क्रीडा संस्कृती मजबूत करण्यासाठी एका सामूहिक राष्ट्रीय दृष्टीकोनाची रूपरेषा मांडतो. या दस्तऐवजात खेळाडू-केंद्रित विकास, क्रीडा पायाभूत सुविधांचा विस्तार, प्रतिभा शोध, प्रादेशिक क्रीडा समूहांचा विकास तसेच एकता, युवा सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन व आर्थिक विकासासाठी क्रीडा क्षेत्राचा उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे.

‘श्रीनगर खेल संकल्प’ हा केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा क्रीडा क्षेत्राला राष्ट्रउभारणीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा एकत्रित निर्धार दर्शवतो.या संकल्पाद्वारे सामाजिक सलोखा वाढवणे, समाजाला मजबूत करणे तसेच एक निरोगी आणि अधिक सक्षम पिढी घडवण्यात क्रीडा क्षेत्राची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. या संकल्पात, सरकार  आणि क्रीडा संघटनांनी समन्वयाने कार्य करून खेळाडूंसाठी विना अडथळा पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

हा संकल्प भारताच्या विविधतेचा सामर्थ्य म्हणून उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. तसेच, राज्यांना त्यांच्या विशिष्ट भौगोलिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक संदर्भांत रुजलेल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, प्रतिभा शोधण्यासाठी आणि क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी प्रोत्साहित करतो. यासोबतच क्रीडा क्षेत्राला सामाजिक-आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक मानून पर्यटनाला चालना देणे, रोजगार निर्माण करणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, तसेच ऑलिम्पिक आणि विश्वचषक यांसारख्या प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने भारताला सक्षम करण्याची क्षमता देखील अधोरेखित करतो.

चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' सायक्लोथॉनने झाली. या उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, शिस्त आणि लोकसहभागाचा संदेश देण्यात आला.

यानंतर क्रीडा प्रशासन, क्रीडा साहित्य उत्पादन आणि 'माय भारत'च्या माध्यमातून युवा सहभाग या विषयांवर विशेष सत्रे झाली. या सत्रांमध्ये संस्थात्मक चौकट मजबूत करणे, सर्व संबंधित घटकांमध्ये पारदर्शकता आणि समन्वय वाढवणे तसेच क्रीडा प्रशासन अधिक व्यावसायिक बनवणे यावर भर देण्यात आला.


सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2255734) अभ्यागत कक्ष : 13