पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर


पंतप्रधान वाराणसी येथील 'महिला संमेलन'मध्ये सहभागी होणार; सुमारे ₹6,350 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार

या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, पर्यटन आणि शहरी पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांचा समावेश

पंतप्रधान बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान हरदोई येथे 594 किमी लांबीच्या 'ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड गंगा एक्सप्रेसवे' या पूर्णपणे नवीन प्रवेश-नियंत्रित गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करणार

सुमारे ₹36,230 कोटींच्या एकूण खर्चातून बांधण्यात आलेला हा 'गंगा एक्सप्रेसवे' मेरठ आणि प्रयागराज दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 10-12 तासांवरून अंदाजे 6 तासांपर्यंत लक्षणीयरीत्या कमी करणार

या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शहाजहानपूर जिल्ह्यात 3.5 किमी लांबीच्या 'इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी'ची (आपत्कालीन लँडिंग सुविधा) तरतूद ,यामुळे या प्रकल्पाचे आर्थिक लाभांच्या पलीकडे धोरणात्मक मूल्यही वाढले

Posted On: 26 APR 2026 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी साधारण 5 वाजता, पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होतील. येथे ते वाराणसीमधील सुमारे ₹6,350 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

29 एप्रिल रोजी सकाळी साधारण 8:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर, पंतप्रधान हरदोईला प्रयाण करतील आणि सकाळी साधारण 11:30 वाजता गंगा एक्सप्रेसवे या दृतगती मार्गाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

वाराणसीमध्ये पंतप्रधान

पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होणार असून  संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतील. पंतप्रधान ₹1,050 कोटींहून अधिक किमतीचे 48 पूर्ण झालेले प्रकल्प देशाला समर्पित करतील. मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये,  वाराणसी-आझमगड रस्ता रुंदीकरणाचे पूर्ण झालेले काम,  कज्जाकपुरा आणि कादीपूर येथील महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि भगवानपूर येथील 55 एम एल डी (दररोज दशलक्ष लिटर) क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस टी पी) उद्घाटन, यांचा समावेश आहे.

पंतप्रधान समाजाभिमुख अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 30 ग्रामीण पेयजल योजना, चंद्रावती घाटाचा पुनर्विकास, सारनाथ जवळील सारंगनाथ मंदिराचा पर्यटन विकास आणि संत रविदास पार्क, नगवा येथील सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

सार्वजनिक सेवा आणि क्रीडा क्षेत्रातील विकासालाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेश महाविद्यालयातील सिंथेटिक हॉकी टर्फ, रामनगरमधील 100 खाटांचा वृद्धाश्रम आणि भेलूपूर जलशुद्धीकरण प्रकल्पातील 1 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान  सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटन स्टडीजमधील सोवा रिग्पा भवन आणि रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे सोवा रिग्पा भवन आणि रुग्णालय पारंपरिक वैद्यकशास्त्राला आधुनिक आरोग्यसेवा प्रणालींशी जोडण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

पंतप्रधान सुमारे 5,300 कोटी रुपयांच्या 112 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात अमृत 2.0 अंतर्गत 13 मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा योजना, श्री शिव प्रसाद गुप्ता विभागीय जिल्हा रुग्णालयात 500 खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी रुग्णालय, भोजुवीर आणि सिगरा येथे बाजार संकुल आणि कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम, तलावांचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन, 198 खाटांच्या रुग्णालयाचा पुनर्विकास, 100 खाटांच्या क्रिटिकल केअर ब्लॉकचे बांधकाम, आणि अस्सी घाट, दशाश्वमेध घाट तसेच नमो घाट यांसारख्या प्रमुख घाटांवर पर्यटन सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. प्रशासन आणि सामाजिक कल्याण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान रामनगर येथे एकात्मिक विभागीय कार्यालय, नगर निगम कार्यालय इमारत तसेच शासकीय बालसंरक्षण गृह आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाच्या इमारतीचे भूमिपूजन देखील करणार आहेत. पंतप्रधान बनास डेअरीशी संबंधित उत्तर प्रदेशातील दूध पुरवठादारांना बोनस म्हणून 105 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करतील. पंतप्रधान वाराणसी जंक्शन–पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील, यात गंगा नदीवरील रेल्वे-कम-रोड पुलाच्या बांधकामाचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे वाहतूकीची कोंडी कमी होऊन लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढेल, बहु आयामी संपर्क प्रणाली बळकट होईल. यांचा लाभ वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांना होईल, काशी विश्वनाथ धाम, रामनगर परिसर आणि राष्ट्रीय महामार्ग-19 पर्यंत पोहोचणेही सोपे होईल, तसेच पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारसोबतची रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल.

पंतप्रधान बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. या गाड्यांमुळे प्रवासाचे किफायतशीर आणि आधुनिक पर्याय उपलब्ध होतील तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील संपर्क वाढेल. बनारस-पुणे रेल्वेमुळे काशी विश्वनाथ धामला जाणे अधिक सुलभ होईल, तर अयोध्या-मुंबई गाडीमुळे श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्राशी संपर्क व्यवस्था  सुधारेल आणि प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देणे सुलभ होईल.

हरदोई येथे पंतप्रधान

पंतप्रधान हरदोई जिल्ह्यात गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करणार असून, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गंगा द्रुतगती मार्ग  ही 594 किलोमीटर लांबीची, 6-पदरी (8 पदरांपर्यंत विस्तारयोग्य), प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड  उच्च वेग  मार्गिका असून, यासाठी  सुमारे 36,230 कोटी रुपये खर्च आला आहे.  हा  द्रुतगती मार्ग  12 जिल्ह्यांमधून जातो. मेरठ, बुलंदशहर, हापूर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहानपूर, हरदोई , उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराजचा यात समावेश असल्यामुळे उत्तर प्रदेशातील पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांना एका अखंड अतिजलद मार्गाने जोडतो.

या प्रकल्पामुळे मेरठ ते प्रयागराज दरम्यानचा प्रवास वेळ सध्याच्या 10-12 तासांवरून सुमारे 6 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे प्रवास सुलभ होईल आणि वाहतूक कार्यक्षमता वाढेल.

या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शाहजहानपूर जिल्ह्यात 3.5 किलोमीटर लांबीच्या आपत्कालीन विमान उतरण्याच्या सुविधेची उभारणी. या दुहेरी उपयोगाच्या सुविधेमुळे राष्ट्रीय सुरक्षेची तयारी अधिक मजबूत होईल आणि आर्थिक फायद्यांपलीकडे धोरणात्मक महत्त्व वाढेल.

गंगा द्रुतगती मार्ग  ही एक महत्त्वाची आर्थिक मार्गिका म्हणून विकसित करण्याचा उद्देश असून, त्याच्या मार्गावरील 12 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2,635 हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक उत्पादन आणि लॉजिस्टिक  मार्गिका विकसित केली जाणार आहे. या  द्रुतगती मार्गामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल, पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारेल आणि उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढेल.

सुधारित संपर्कामुळे शेतकऱ्यांना शहरी आणि निर्यात बाजारपेठांशी थेट जोडणी मिळेल. यामुळे त्यांना चांगल्या किंमती मिळण्यास मदत होईल आणि ग्रामीण उत्पन्नात वाढ होईल. या प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि प्रदेशात थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल.

गंगा द्रुतगती मार्ग हा राज्यातील व्यापक जलदमार्ग जाळ्याचा कणा ठरेल. यामध्ये आग्रा ते लखनऊ  द्रुतगती मार्ग  , जेवर जोडणी  द्रुतगती मार्ग, फर्रुखाबाद जोडणी  द्रुतगती मार्ग  आणि मेरठ ते हरिद्वार प्रस्तावित विस्तार यांसारखे अनेक जोड मार्ग कार्यरत किंवा नियोजित आहेत. या विकसित होत असलेल्या  द्रुतगती मार्ग   जाळ्यामुळे उत्तर प्रदेशात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशांनी अतिजलद रस्ते संपर्क वाढेल आणि संतुलित प्रादेशिक विकास साध्य होईल.

गंगा द्रुतगती मार्ग हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून एक परिवर्तनकारी उपक्रम आहे, जो लॉजिस्टिक खर्च कमी करेल, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करेल, शेती आणि ग्रामीण उत्पन्न वाढवेल, रोजगार निर्माण करेल आणि राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती देईल.


सुषमा काणे/आशुतोष सावे/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर‍

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2255703) अभ्यागत कक्ष : 16