पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींच्या महत्वाच्या क्षेत्रांविषयीची सद्यस्थिती


घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी डीएसी म्हणजेच- वितरण संकेतांकावर आधारित सिलेंडर वितरणाचे प्रमाण 94.5% वर पोहचले

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या वतीने 5 किलो एफटीएल सिलिंडरशी संबंधित 8,770 पेक्षा जास्त जनजागृती शिबिरांचे आयोजन, 3 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 5 किलो एफटीएलच्या 1,38,000 पेक्षा जास्त सिलिंडरची विक्री

नऊ एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, वायझॅग, चेन्नई आणि मथुरा इथल्या तेल शुद्धीकरण कारखान्यांद्वारा रसायने आणि औषध उद्योगाला 7,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त प्रोपलीनची विक्री

संघर्षग्रस्त क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांबाबत कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झाल्याचे वृत्त नाही

Posted On: 25 APR 2026 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2026

 

पश्चिम आशियातील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारचे विविध विभाग, महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सज्जता राखण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करत आहेत. ऊर्जा पुरवठा, सागरी क्षेत्रासंबंधीचे कार्यान्वयन आणि संघर्षग्रस्त क्षेत्रातील भारतीय नागरिकांना दिल्या जात असलेल्या सहकार्याबाबत हाती घेतलेल्या उपाययोजनांविषयीचा तपशील खाली नमूद केला आहे :

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सद्यस्थिती लक्षात घेऊन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय देशभरात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा विनाखंड सुरळीत पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. यासंदर्भात मंत्रालयाने दिलेली माहिती खाली नमूद केली आहे:

सरकारची सज्जता आणि पुरवठा व्यवस्थापनासंबंधीच्या उपाययोजना

  • सध्याची भू राजकीय परिस्थिती तशीच कायम असतानाही सरकारने घरगुती वापराचा एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीचा (वाहतूकीसाठी) 100% पुरवठा होत राहील हे सुनिश्चित केले आहे.
  • व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या (LPG) बाबतीत रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्यक्रमावर ठेवले गेले आहे. याव्यतिरिक्त औषध निर्मिती, पोलाद, मोटारवाहन, बियाणे, कृषी ही क्षेत्रेही प्राधान्यक्रमावर ठेवली गेली आहेत. यासोबतच 2 आणि 3 मार्च 2026 रोजीच्या सरासरी दैनंदिन पुरवठ्याच्या तुलनेत स्थलांतरित मजुरांना दिला जाणारा 5 किलो एफटीएल सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट केला गेला आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि संस्थात्मक यंत्रणांसोबतचा समन्वय

  • अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 आणि एलपीजी नियंत्रण आदेश, 2000 या अंतर्गत पुरवठ्यावर देखरेख ठेवण्याचे तसेच साठेबाजी आणि काळाबाजाराविरोधात कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.
  • पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याच्या परिस्थितीवर देखरेख ठेवण्यात आणि त्याचे नियमन करण्याची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांची प्राथमिक जबाबदारी असेल. भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अनेक पत्रे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचा पुनरुच्चार केला आहे.
  • साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियंत्रण कक्ष तसेच जिल्हास्तरीय देखरेख समित्या स्थापन केल्या आहेत.

अंमलबजावणी आणि देखरेख विषयक कारवाई

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीची कारवाई सुरू आहे. देशभरात काल 2400 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी अचानक तपासण्या अधिक कडक केल्या असून, कालपर्यंत 309 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर 70 एलपीजी वितरकांचे परवाने रद्द केले आहे.

एलपीजी पुरवठा

घरगुती एलपीजी पुरवठ्याची स्थिती:

  • काल संपूर्ण उद्योग क्षेत्रात ऑनलाइन एलपीजी सिलेंडर बुकिंगमध्ये सुमारे 99% वाढ झाली आहे.
  • सिलेंडरचा गैरवापर टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) आधारित वितरण 94.5% पेक्षा अधिक वाढवण्यात आल्या आहेत. डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:

  • व्यावसायिक एलपीजीचे एकूण वाटप संकटापूर्वीच्या पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले असून त्यात 10% सुधारणा-संबंधित वाटपाचा समावेश आहे.
  • 1 एप्रिल 2026 पासून 18.63 लाखांपेक्षा अधिक - 5 किलोचे एफटीएल सिलिंडर विकले गेले आहेत.
  • काल, देशभरात सुमारे 80,000 - 5 किलोचे एफटीएल सिलिंडर विकले गेले
  • 3 एप्रिल 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 5 किलो एफटीएल सिलेंडर्स संदर्भात 8770 पेक्षा अधिक जनजागृती शिबिरे आयोजित केली असून त्यात 1,38,000 पेक्षा अधिक - 5 किलोचे एफटीएल सिलेंडर्स विकले गेले.
  • काल, 230 हून अधिक शिबिरांद्वारे 5717 - 5 किलोचे एफटीएल विकण्यात आले.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

  • पाइप द्वारे घरगुती नैसर्गिक वायू पुरवठा (डी-पीएनजी) आणि वाहतूक क्षेत्रातील सीएनजी ग्राहकांना 100% पुरवठा प्राधान्याने देण्यात येत आहे.
  • खत कारखान्यांसाठी एकूण गॅस वाटप त्यांच्या सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या सुमारे 95% पर्यंत वाढवण्यात आले आहे.
  • याव्यतिरिक्त, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांसह सीजीडी नेटवर्कद्वारे होणारा गॅस पुरवठा 80% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
  • पीएनजी विस्तार सुधारणा कार्यक्रमांशी जोडून 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी वाटप मिळत आहे.
  • मार्च 2026 पासून 5.36 लाखांहून अधिक पीएनजी जोडण्या सक्रिय करण्यात आल्या असून अतिरिक्त 2.61 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 7.97 लाख झाली आहे. याशिवाय, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 6.05 लाख ग्राहकांनी नावनोंदणी केली ली आहे.
  • 24.04.2026 पर्यंत, 42,280 पेक्षा जास्त पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे आपली एलपीजी जोडणी स्वेच्छेने परत केली आहे.

कच्चे तेल आणि तेलशुद्धीकरण कार्यान्वयन

  • सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प आपल्या कमाल मर्यादेत प्रक्रिया करत असून त्यांना कच्च्या तेलाचा सुरळीत पुरवठा होत आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या पुरेशा साठ्याचे व्यवस्थापन केले आहे.
  • 9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई आणि मथुरा येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पातून रासायनिक आणि औषधनिर्माण उद्योगांना 7000 हून अधिक मेट्रिक टन प्रोपेलेनची विक्री करण्यात आली आहे.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक

आखाती प्रदेशातील भारतीय जहाजे आणि सागरी वाहतूकीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. बंदरे, शिपींग आणि जलवाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की:

  • सागरी वाहतूक सुरळीत आणि विनासायास होण्यासाठी हे मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी वाहतुकीच्या क्षेत्रातील भागधारकांशी समन्वय साधून आहे.
  • या प्रदेशातील सर्व भारतीय सागरी प्रवासी आणि जहाजे सुरक्षित असून गेल्या चोवीस तासात भारतीय ध्वज असलेल्या जहाजांविषयी कोणतीही घटना नोंदवण्यात आलेली नाही.
  • डीजी शिपींग नियंत्रण कक्षाने हे केंद्र सुरु केल्यापासून भारतीय सागरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत 7,533 फोन कॉल आणि 16,033 ईमेल स्वीकारले असून गेल्या चोवीस तासात 150 कॉल आणि 394 ईमेल स्वीकारल्या आहेत.
  • परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियाई भागातील भारतीयांची सुरक्षा, कल्याण आणि सुरक्षितते संदर्भातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्यांनी माहिती दिली आहे की;
  • एकंदरीत विमान वाहतूकीत सातत्याने सुधारण होत असून या भागातून भारतातील विविध शहरांमध्ये अतिरीक्त विमाने चालवण्यात येत आहेत. 28 फेब्रुवारी पासून या भागामधून 12,65,000 प्रवासी भारतात परतले आहेत.
  • इराणची हवाई हद्द चार्टर्ड विमाने आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांसाठी अंशतः खुली करण्यात आली आहे. भारतीयांना इराणमध्ये प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जे इराणमध्ये आहेत त्यांनी भारतीय दूतावासाच्या मदतीने जमीनींवरील सीमांच्या माध्यमातून इराण सोडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तेहरानच्या भारतीय दूतावासाने आतापर्यंत जमिनींवरील सीमांच्या माध्यमातून 2,443 भारतीयांना बाहेर पडण्यात मदत केली आहे.
  • इस्रायलची हवाई हद्द खुली करण्यात आली असून या भागात मर्यादित विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. ती पुढे भारतात येण्यासाठीही वापरता येणार आहे. 

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255556) अभ्यागत कक्ष : 12