पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


देशभरात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक छापे घालण्यात आले आणि 66,000 पेक्षा जास्त सिलेंडर्स जप्त करण्यात आले

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय नाविकांचा समावेश असलेल्या परदेशी ध्वजधारक जहाजांवर गोळीबाराच्या घटनांची नोंद; या जहाजांवरील सर्व भारतीय नाविक सुरक्षित

आतापर्यंत 2,680 पेक्षा जास्त भारतीय नाविकांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय करण्यात आली, यामध्ये प्रभावित प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 24 तासात मायदेशी परतण्याची सोय करण्यात आलेल्या 65 जणांचा समावेश आहे

Posted On: 23 APR 2026 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

पश्चिम आशियामध्ये सतत बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना नियमितपणे अद्ययावत माहिती देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या संदर्भात आज राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

अंमलबजावणी तसेच देखरेख कार्यवाही

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणी कारवाई सुरु आहे. कालच्या दिवसात देशभरात 2600 हून अधिक छापे टाकण्यात आले आणि सुमारे 285 सिलेंडर्स जप्त करण्यात आले.
  • एकत्रितपणे आतापर्यंत दीड लाखांहून अधिक छापे  टाकण्यात आले असून 66,000 पेक्षा जास्त सिलेंडर्स जप्त  करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भात 1100 पेक्षा जास्त प्राथमिक माहिती  अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आले आहेत आणि 255 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (पीएसयुज ओएमसीज) अचानक तपासणी सत्रे अधिक मजबुतीने सुरु ठेवली असून कालपर्यंत 298 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर 70 एलपीजी वितरकांची सेवा स्थगित ठेवण्यात आली आहे.

एलपीजीचा पुरवठा

घरगुती एलपीजी पुरवठा प्रणालीची स्थिती:

  • औद्योगिक आधारावर काल, ऑनलाईन एलपीजी सिलेंडर बुकिंग 98% पर्यंत वाढले आहे.
  • दिनांक 22.04.2026 पर्यंत 52 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर्स वितरीत करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा तसेच वितरणविषयक उपाययोजना:

  • एकूण व्यावसायिक एलपीजी वितरण संकटपूर्व स्तराच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले असून त्यात 10% सुधारणा-संलग्न वितरण समाविष्ट आहे.
  • दिनांक 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 5 किलो वजनाच्या 17 लाखांहून अधिक  एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली आहे.
  • काल, देशभरात 5 किलो वजनाचे 86,000 अधिक एफटीएल सिलेंडर्स विकण्यात आले आहेत. 
  • पीएसयुज ओएमसीजनी दिनांक 3 एप्रिल 2026 पासून 5 किलो वजनाच्या एफटीएल सिलेंडर्सच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी 8200 पेक्षा जास्त शिबिरांचे आयोजन केले आहे आणि अशा या शिबिरांमध्ये  5 किलो वजनाच्या 1,27,000 पेक्षा जास्त एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली.
  • काल आयोजित करण्यात आलेल्या 320 पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातून 5 किलो वजनाच्या 7877 एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

  • मार्च 2026 पासून, सुमारे 5.18 लाख पीएनजी जोडण्यांना गॅस पुरवठा सुरू करण्यात आला असून अतिरिक्त 2.58 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण पीएनजी जोडण्यांची संख्या 7.76 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 5.87 लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे.
  • दिनांक 21 एप्रिल 2026 पर्यंत 41,000 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे आपल्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेलशुद्धिकरण प्रकल्प कार्यान्वयन

  • दिनांक 9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची आणि मथुरा येथील तेल शुद्धीकरण कारखान्यांनी रासायनिक आणि औषधनिर्माण उद्योगाला सुमारे 6300 मेट्रिक टनपेक्षा जास्त प्रोपिलीनची विक्री केली आहे.

किरकोळ इंधन उपलब्धता आणि दर विषयक उपाययोजना

  • देशभरातील सर्व किरकोळ विक्री केंद्रे सामान्यपणे कार्य करत आहेत.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती स्थिर असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या (PSU OMCs) किरकोळ विक्री केंद्रांवर/पेट्रोलपंपावर कोणतीही दरवाढ झालेली नाही.

सागरी सुरक्षा आणि नौवहन कार्यप्रणाली

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या 24 तासांत, होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या काही घटना घडल्या. या जहाजांवर भारतीय खलाशी होते. मात्र, दोन्ही जहाजांवरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.

  1. पनामाचा ध्वज असलेल्या 'युफोरिया' या जहाजावर 21 भारतीय खलाशी आहेत. ते सर्व सुरक्षित आहेत.
  2. पनामाचा ध्वज असलेल्या 'एपामिनोंडास' या जहाजावर एक भारतीय खलाशी आहे. तो सुरक्षित आहे.

या प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.

  • भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहक जहाज 'देश गरिमा'ने 18 एप्रिल 2026 रोजी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. 31 भारतीय खलाशी असलेले हे जहाज 22 एप्रिल 2026 रोजी मुंबईत पोहोचणे अपेक्षित आहे.
  • खलाशांची सुरक्षितता आणि अखंड सागरी वाहतुकीची खात्री करण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय हे परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी क्षेत्रातील हितधारकांसोबत समन्वय साधून काम करत आहे.
  • महासंचालक, नौवहन नियंत्रण कक्ष ताजी माहिती: कार्यान्वित झाल्यापासून या नियंत्रण कक्षाने 7,403 दूरध्वनी कॉल्स आणि 15,639 पेक्षा अधिक ईमेल्स हाताळले आहेत. नियंत्रण कक्षाला गेल्या 24 तासांत 161 दूरध्वनी कॉल्स आणि 320 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.
  • नौवहन महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) मदतीने मंत्रालयाने आतापर्यंत 2,680 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याची सोय केली आहे. यात आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 24 तासांत परत आणलेल्या 65 खलाशांचांही समावेश आहे.
  • बंदरांचे कामकाज: संपूर्ण भारतातील बंदरांचे कामकाज नियमितपणे सुरू असून कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा अडथळा निर्माण झाल्याचे वृत्त नाही. 

संघर्षग्रस्त क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालय आखाती देश आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सात्यपूर्णतेने लक्ष ठेवून असून आहे. मंत्रालयाच्या वतीने या क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.  याबाबतीत मंत्रालयाने दिलेली माहिती खाली नमूद केली आहे :

  • परराष्ट्र मंत्रालयामधील समर्पित स्वरुपातील विशेष नियंत्रण कक्ष अजूनही कार्यरत असून ते भारतीय दूतावासांशी समन्वय राखून काम करत आहेत.
  • माहितीची देवाणघेवाण आणि प्रयत्नांमध्ये सुसूत्रता राखण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित संपर्क राखून आहे.
  • या क्षेत्रातील स्थानिक सरकारांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे, विमान उड्डाणे आणि प्रवासाची स्थिती, वाणिज्य दूतावासाच्या सेवा आणि भारतीय समुदायाला सहकार्य पुरवण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांच्या माहिती असलेल्या ताज्या मार्गदर्शक सूचनांसह, वेळोवेळच्या गरजांनुसार अद्ययावत मार्गदर्शक सूचना नियमितपणे जारी केल्या जात आहेत.
  • भारतीय दूतावास या क्षेत्रात वसलेल्या भारतीय समुदायाशी सक्रियपणे संपर्क राखून आहे.
  • या क्षेत्रातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याअनुषंगानेच भारतीय दूतावास या खलाशांना स्थानिक अधिकारी आणि यंत्रणांसोबत समन्वय साधणे, वाणिज्य दुतावासाशी संबंधीत मदत पुरवणे आणि भारतात परतण्याच्या विनंतीसंदर्भातील मदत करण्यासह शक्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत.
  • विमान वाहतुकीशी संबंधीत एकंदर परिस्थिती सुधारत असून, या प्रदेशातून भारतातील विविध शहरांसाठी अतिरिक्त विमाने चालवली जात आहेत. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे आत्तापर्यंत 12,12,000 प्रवाशांनी या प्रदेशातून भारतात प्रवास केला आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये विमान कंपन्या कार्यान्वयन आणि सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान मर्यादित व्यावसायिक उड्डाणे करत आहेत. आज भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान सुमारे 110 विमान उड्डाणे केली जातील अशी अपेक्षा आहे.
  • सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध शहरांसाठीची विमान सेवा सुरू आहे.
  • कतारचे हवाई क्षेत्र अंशतःच खुले आहे, कतार एअरवेजद्वारे भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे केली जात आहेत.
  • कुवेतचे हवाई क्षेत्र अद्यापही बंद आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावरून भारतासाठी बिगर नियोजित व्यावसायिक विमानांचे उड्डाण करत आहेत.
  • बहरीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. गल्फ एअरच्या वतीने बहरीनमधून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे केली जात आहेत.
  • इराकचे हवाई क्षेत्र खुले असून या क्षेत्रातील इतर ठिकाणांसाठी मर्यादित विमान सेवा सुरू आहे, या सेवेचा वापर करून भारताच्या दिशेने पुढचा पुढचा प्रवास केला जाऊ शकत आहेत.
  • इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले आहे. तेहरानमधील भारतीय दूतावास, भारतीय नागरिकांना इराण बाहेर पडून आर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे मायदेशी परत येण्याचा प्रवास करण्यासाठी सहकार्य पुरवत आहे. आतापर्यंत 2428 भारतीय नागरिक इराणमधून आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये 1096 भारतीय विद्यार्थी आणि 657 भारतीय मच्छिमारांचा समावेश आहे.
  • इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले असून या क्षेत्रातील इतर ठिकाणांसाठी मर्यादित स्वरुपात विमान सेवा पुन्हा सुरू झाली आहे, या सेवेचा वापर करून, भारतात येण्यासाठीचा प्रवास केला जाऊ शकतो.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255032) अभ्यागत कक्ष : 16