पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
उत्तर प्रदेशातील शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता
भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 99 वर, तर उत्तर प्रदेशात 12 वर पोहोचली
Posted On:
22 APR 2026 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2026
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे, तर उत्तर प्रदेशात ही संख्या 12 वर पोहोचली आहे.
“उत्तर प्रदेशने हा आकडा 99 वर नेला! शेखा झील पक्षी अभयारण्याला (अलिगढ, उत्तर प्रदेश) ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती देताना आनंद होत आहे,” केंद्रीय मंत्र्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले. ते म्हणाले की, या घोषणेमुळे स्थानिक उपजीविका आणि जागतिक जैवविविधता, तसेच जल आणि हवामान सुरक्षेला चालना मिळेल. तसेच, भारताचा 99 हा आकडा आपल्याला ऐतिहासिक शतकाच्या अधिक जवळ घेऊन जातो, असे ते म्हणाले.
“पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली भारताची परिसंस्था पुनर्संचयित (ecosystem restoration) करण्याची मोहीम सुरू असताना, पाणथळ जागा आणि प्राण्यांच्या, विशेषतः पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनाप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेला जागतिक समुदायाने पुन्हा एकदा पसंती दर्शविली आहे," केंद्रीय मंत्री म्हणाले.
या स्थळाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करताना, यादव म्हणाले की, 'शेखा झील' हे 'मध्य आशियाई उड्डाणमार्गा'वरील एक अत्यंत महत्त्वाचे विश्राम-स्थळ म्हणून भूमिका बजावते. हिवाळ्याच्या हंगामात 'बार-हेडेड गूज', 'पेंटेड स्टॉर्क' आणि विविध प्रकारच्या बदकांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे स्थळ एक महत्वाचा अधिवास उपलब्ध करून देते. लोकांनी या स्थळाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254706)
अभ्यागत कक्ष : 11