वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताची सागरी खाद्य निर्यात पोहोचली 72,000 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर
Posted On:
21 APR 2026 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026
एमपीईडीएने प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची सागरी खाद्य निर्यात विक्रमी 72,325.82 कोटी रुपयांवर (8.28 अब्ज अमेरिकी डॉलर) पोहोचली असून तिचे प्रमाण 19.32 लाख मेट्रिक टन झाले आहे.
या वाढीमध्ये गोठवलेल्या कोळंबीचा (फ्रोजन श्रिम्प) मुख्य वाटा राहिला असून तिचे 47,973.13 कोटी रुपयांचे (5.51 अब्ज अमेरिकी डॉलर) योगदान आहे, जे एकूण निर्यात उत्पन्नाच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहे. कोळंबीच्या निर्यातीत प्रमाणानुसार 4.6% आणि मूल्यानुसार 6.35% वाढ झाली, ज्यामुळे भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीत तिचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.
अमेरिकेने सर्वात मोठे निर्यात स्थळ म्हणून आपले स्थान कायम राखले असून तिची एकूण आयात 2.32 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. तथापि, अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीच्या प्रमाणानुसार 19.8% आणि मूल्यानुसार 14.5% घट झाली, जे प्रामुख्याने परस्पर शुल्कांचा परिणाम दर्शवते.
चीन, युरोपीय महासंघ आणि आग्नेय आशियाई देशांसारख्या पर्यायी बाजारपेठांमधील दमदार वाढीमुळे ही घट भरून निघाली. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात केंद्र असलेल्या चीनला होणारी निर्यात मूल्यानुसार 22.7% आणि प्रमाणानुसार 20.1% ने वाढली. युरोपीय महासंघाने जोरदार वाढ नोंदवली, जिथे निर्यातीमध्ये मूल्यानुसार 37.9% तर प्रमाणानुसार 35.2% वाढ झाली. आग्नेय आशियामध्येही लक्षणीय विस्तार नोंदवला गेला, जिथे मूल्य आणि प्रमाणात अनुक्रमे 36.1% आणि 28.2% पेक्षा जास्त वाढ झाली. जपानला होणारी निर्यात मूल्यानुसार 6.55% ने वाढली तर आर्थिक वर्षाच्या अखेरीस या प्रदेशातील अशांततेमुळे पश्चिम आशियाला होणाऱ्या निर्यातीत 0.55% ची किरकोळ घट दिसून आली.
अनेक स्वतंत्र बाजारपेठांमध्ये दमदार दोन अंकी वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे पारंपरिक बाजारपेठांमधील व्यापारविषयक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विविधीकरणाकडे होणारा स्पष्ट कल अधोरेखित होतो.
लॉजिस्टिक्सच्या बाबतीत, विशाखापट्टणम, जेएनपीटी, कोची, कोलकाता आणि चेन्नई या पाच आघाडीच्या बंदरांचा एकूण निर्यात मूल्यात जवळपास 64% वाटा राहिला , जे भारताच्या सागरी खाद्य निर्यात पुरवठा साखळीतील त्यांचे सातत्यपूर्ण महत्त्व अधोरेखित करते.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254347)
अभ्यागत कक्ष : 19