उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'मोठ्या अधिकारांसोबत मोठी जबाबदारीही येते'-नवी दिल्ली येथे 18 व्या सनदी सेवा दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी सनदी सेवेतील अधिकाऱ्यांना केले संबोधित

Posted On: 21 APR 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज 18 व्या सनदी सेवा दिनानिमित्त, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.

उपराष्ट्रपतींनी बीजभाषणात देशभरात कार्यरत तसेच सर्व निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. अधिकाऱ्यांच्या विविध तुकड्यांनी  गौरवशाली परंपरा सातत्याने जपली असून देशाच्या प्रगती आणि समृद्धीच्या वाटचालीत देशाचा कणा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. विविध राज्यांमध्ये कार्यरत सनदी अधिकाऱ्यांचे  वर्णन त्यांनी 'राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याचे महान दूत' असे केले. मोठ्या अधिकारासोबत मोठी जबाबदारीही येते',असे प्रतिपादन त्यांनी केले.

सरकारी धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणीकर्ते म्हणून सनदी अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. देशाच्या कामगिरीत त्यांची समर्पित वृत्ती महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या तत्त्वाचा अनुभव देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारत @2047 च्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात  देशाला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सर्वसमावेशक विकास आणि प्रभावी प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी  कायम प्रतिबद्धता, सचोटी आणि शेवटच्या घटकापर्यंत  सेवा पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग पाहता सनदी अधिकाऱ्यांनी कौशल्ये आत्मसात करून अद्ययावत आणि येणाऱ्या काळाच्या दृष्टीने सक्षम राहण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. क्षमता बांधणीसाठी 'iGOT कर्मयोगी' सारख्या मंचांचे महत्त्व, तसेच कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूकपणे पोहोचणे या बाबी सुधारण्यात तंत्रज्ञानाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. तांत्रिक प्रगतीमुळे योजनांमधील गळती कमी होण्यास आणि सेवा वितरण सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याचसोबत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कल्याणकारी योजना अत्यंत काळजीपूर्वक आखण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.

सनदी सेवेत  महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. सनदी सेवांमध्ये महिलांचे प्रमाण 2016  मध्ये सुमारे 21% होते, ते वाढून 2025 च्या परीक्षांमध्ये जवळपास 31% पर्यंत पोहोचले असून आज अनेक महिला अधिकारी वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्याचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केले. 


सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2254166) अभ्यागत कक्ष : 16