अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा देताना त्यांची हज यात्रा सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावी यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
Posted On:
18 APR 2026 11:35AM by PIB Mumbai
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांची हज यात्रा सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावी यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. श्रीवत्स कृष्णा यांनी आज सकाळी 9:45 वाजता हज 2026 साठी दिल्लीहून मदिनाकडे जाणाऱ्या हज यात्रेकरूंच्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. प्रस्थानस्थळी यात्रेकरूंना संबोधित करताना त्यांनी, यात्रा सुखकर, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भारत सरकार यात्रेदरम्यान त्यांच्या सुखसोयी आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यात्रेकरूंना निर्धोक धार्मिक यात्रेचा अनुभव मिळावा यासाठी, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि सौदी अधिकाऱ्यांच्या निकट समन्वयाने वैद्यकीय मदत आणि लॉजिस्टिक मदतीसह सर्वसमावेशक व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यात्रेकरूंशी संवाद साधताना, सचिवांनी हज प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकला. अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन, निवड प्रक्रियेत वाढीव पारदर्शकता आणि प्रस्थान स्थळांवरील सुधारित सुविधा यांसारख्या सातत्यपूर्ण सुधारणांमुळे देशभरातील यात्रेकरूंना हज यात्रेत सहभागी होणे सोपे होणार आहे.

प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरूंनी सरकारच्या उपक्रमांबद्दल आणि केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. मजबूत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना आणि सातत्यपूर्ण सुधारणांसह, हज 2026 भारतीय यात्रेकरूंचा धार्मिक यात्रेचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या सर्व 1,75,025 यात्रेकरूंना मनःपूर्वक शुभेच्छा देत हज यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि आरामदायक होईल याची खात्री करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यात्रेकरूंना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी मंत्रालयाने यावर्षी अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2253328)
अभ्यागत कक्ष : 7