माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – एनएफडीसी’कडून 24 एप्रिल 2026 रोजी मल्याळम चित्रपट अच्चप्पास् अल्बम च्या देशभरात होणाऱ्या प्रदर्शनाची घोषणा


या चित्रपटामध्ये कौटुंबिक कल्पनारम्य कथानकाच्या माध्यमातून काळाच्या प्रवासाची दोन पिढ्यांमधील एक भावनिक गुंतागुतीची कथा मांडली गेली आहे

Posted On: 14 APR 2026 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ अर्थात आजीचा अल्बम हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ साधण्यात आला आहे. या चित्रपटाचे सूत्र काळाचा प्रवास असे असून तो येत्या 24 एप्रिल 2026 रोजी देशभर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.  

या चित्रपटाचे दिग्दर्शन दीप्ती पिल्लाई सेल्वन यांनी केले असून कथा पटकथा संजीव सिवन, अनिर्बन भट्टाचार्य आणि उमेश नायर यांची आहे. या कथेत भूतकाळात जाण्याची वैश्विक कल्पना मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे कथानक वडील आणि मुलाच्या भोवती फिरणारे असून एका योगायोगाने हे दोघेजण एकमेकांचे आयुष्य जगू लागतात. दोघांच्या आयुष्याची ही अदलाबदल दोन पिढ्यांमधील जाणीवा आणि आयुष्यातील त्यांच्या आवडीनिवडीच्या पार्श्वभूमीवर विनोदी आणि त्याचवेळी भावनिक पातळीवर उलगडत जाते. या चित्रपटामध्ये अनेक प्रतिष्ठीत कलावंतांच्या भूमिका आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अंजना अप्पुकूट्टन, आदिनाथ कोठारे, प्रियांका नायर आणि सिद्धार्थ संजीव सिवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक अंगाची जबाबदारीही प्रतिष्ठित तंत्रज्ञांनी उचलली असून छायाचित्रण मनोज पिल्लई यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक श्रीकर प्रसाद यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. संगीत संयोजन गुलजार सिंग यांचे आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक दीप्ती सिवन म्हणाले की या चित्रपटामध्ये मानवी नातेसंबंध एका काळाच्या प्रवासासोबत उलगडण्यात आलेले आहेत. आम्ही एनएफडीसीचे आभारी आहोत की त्यांनी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शन आणि प्रसिद्धीबाबत एनएफडीसीचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदुम म्हणाले की या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमांमधील विशेष सादरीकरणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण प्रतिबिंबित होत आहे. एक कल्पनारम्य कथा आणि भावनिक खोली असलेला ‘अच्चप्पास् अल्बम’ सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करण्याची क्षमता असलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या एनएफडीसीच्या समाज माध्यमांवर उपलब्ध असून लवकरच हा ट्रेलर अधिकृतरित्या प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा ट्रेलर तुम्ही https://www.youtube.com/watch?v=G6WDgZNA5u8 या संकेतस्थळावर देखील पाहू शकता.

 

एनएफडीसी संबंधी

एनएफडीसीची स्थापना 1975 साली झाली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ एनएफडीसी - ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली सर्वोच्च संस्था असून ती भारतीय चित्रपटांच्या विकासासाठीची सर्वोच्च संस्था आहे. ती चित्रपट निर्मितीचे पर्यावरण विकसित करण्यात सहाय्य करते, त्याअंतर्गत चित्रपट निर्मिती पासून ते प्रसिद्धी आणि देशभरातील विविध भाषांमधील चित्रपटांचे जतन करण्याचे काम करत असते.

 

* * *

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251940) अभ्यागत कक्ष : 14