लोकसभा सचिवालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापती यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळ येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वाहिली पुष्पांजली
Posted On:
14 APR 2026 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळ येथे असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.
त्यानंतर, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह संसदेच्या आजी-माजी सदस्यांनी संविधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात लावलेल्या डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण केली.
यानंतर, लोकसभा सचिवालयाच्या अखत्यारीत लोकशाहींसाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (पीआरआयडीई) संविधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या “तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या (नो युवर लीडर)” या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ओम बिर्ला यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतुलनीय कौशल्य, समर्पणभाव आणि बांधिलकीसह आयुष्यातील प्रत्येक आव्हानाचे संधीत रुपांतर केले, असे नमूद केले. त्यांचे जीवन, आदर्श, विचार आणि राष्ट्र उभारणीतील अत्यंत भरीव योगदान हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा शाश्वत स्त्रोत आहे यावर बिर्ला यांनी भर दिला.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त X मंचावर सामायिक केलेल्या संदेशात ओम बिर्ला म्हणतात, “बी. आर. आंबेडकर यांची जीवन म्हणजे संघर्षाची एक धाडसी कहाणी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागूनही, ते उल्लेखनीय उंचीवर पोहोचले आणि त्यांचे अतुलनीय धैर्य, अथक परिश्रम तसेच शिक्षणाप्रती समर्पण वृत्ती यांच्या मदतीने त्यांनी स्वतःला तर सिद्ध करून दाखवलेच, पण त्याचसोबत लाखो वंचित आणि शोषित लोकांसाठी ते आशेचा नवा किरण झाले.
त्यांनी समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या मूल्यांना स्वतःच्या जीवनाची मार्गदर्शक तत्वे बनवले आणि या आदर्शांचा भारतीय संविधानात समावेश करून त्यांनी देशाला एक सशक्त आणि दूरदर्शी दिशा दिली. बाबासाहेब हे आपल्या देशाचे अनमोल रत्न आहेत आणि त्यांचे जीवन तसेच दूरदृष्टी यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांवर प्रभाव टाकला असून ते प्रेरणेचा एक चिरस्थायी स्त्रोत बनले आहेत.
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाला एक असा दूरदृष्टीपूर्ण दस्तऐवज प्रदान केला जो लोकशाहीचा मजबूत पाया म्हणून कार्य करत, प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण करत आहे. शिक्षण, जागरूकता आणि सामुहिक प्रयत्नांच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल शक्य आहे, ही शिकवण आपल्याला त्यांच्या जीवनातून मिळते.
सध्या आपण विकसित आणि सर्वसमावेशक भारताची उभारणी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, बाबासाहेबांचे विचार अधिकच समर्पक ठरत आहेत. त्यांचा संघर्ष आणि तत्वज्ञान आपल्याला अन्याय, असमानता आणि भेदभावाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतात.
डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवन आणि आदर्श आपल्याला न्यायपूर्ण, सुसंवादी आणि मजबूत भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देत राहतील.”
* * *
माधुरी पांगे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251854)
अभ्यागत कक्ष : 14