पंतप्रधान कार्यालय
'कर्मयोगी साधना सप्ताह' दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
02 APR 2026 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2026
प्रधान सचिव श्री पी. के. मिश्रा जी, कर्मयोगी भारतचे अध्यक्ष श्री एस. रामदोराई जी, क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस. राधा चौहान जी, अन्य मान्यवर, बंधु आणि भगिनिंनो!
कर्मयोगी साधना सप्ताहाच्या या आयोजनासाठी आपण सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. 21व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या व्यवस्था, झपाट्याने बदलणारे जग आणि त्याच वेगाने पुढे जाणारा आपला भारत, यासाठी सार्वजनिक सेवेला काळानुरूप सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे. कर्मयोगी साधना सप्ताह, हा त्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही सर्व परिचित आहात, आज प्रशासनाच्या ज्या सिद्धांताला घेऊन आपण पुढे जात आहोत, त्याचा मूलमंत्र आहे- नागरिक देवो भव:. या मंत्रात सामावलेल्या भावनेसह आज सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम, नागरिकांसाठी अधिक संवेदनशील बनवण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. आता प्रशासनाला नागरिक-केंद्रीत बनवून त्याला एक नवीन ओळख दिली जात आहे.
मित्रांनो,
यशाचा एक महत्त्वाचा सिद्धांत असा आहे, की इतरांची रेषा लहान करण्याऐवजी स्वतःची रेषा मोठी करावी. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर विविध संस्था वेगवेगळ्या उद्दिष्टांसह कार्यरत होत्या, परंतु गरज होती अशा संस्थेची, जिचा मुख्य भर क्षमता बांधणी असेल, जी सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे, प्रत्येक कर्मयोगीचे सामर्थ्य वाढवेल. याच विचाराने क्षमता विकास आयोगाची (CBC) स्थापना झाली. आज सीबीसीच्या स्थापना दिनानिमित्त ही नवीन सुरुवात, आणि iGot मिशन कर्मयोगीची यशस्वी भूमिका आपल्या प्रयत्नांना अनेक पटींनी ऊर्जा देत आहेत. मला विश्वास आहे, या प्रयत्नांनी आपण आधुनिक, सक्षम, समर्पित आणि संवेदनशील कर्मयोगींची टीम बनवण्यात यशस्वी होऊ.
मित्रांनो,
काही आठवड्यांपूर्वी जेव्हा सेवा तीर्थाच्या लोकार्पणाच्या वेळी मी आपल्यासमोर विकसित भारताच्या संकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली होती. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आपल्याला जलद आर्थिक वाढ, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. आपल्याला देशात मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे, आणि या सर्व उद्दिष्टांच्या यशासाठी आपल्या सार्वजनिक संस्था आणि लोकसेवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण सर्व पाहत आहोत, अनुभवतही आहोत की आजचा भारत किती महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येक देशवासीयाकडे त्याची स्वतःची स्वप्ने आहेत, स्वतःची उद्दिष्टे आहेत, आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांना अधिकाधिक सहकार्य देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपली शासन व्यवस्था अशी असावी की नागरिकांचे जीवन सुलभ आणि जीवनमान दिवसेंदिवस सुधारत जावे, हीच आपली कसोटी आहे. आणि यासाठी आपल्याला दररोज काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, तुम्हाला कर्मयोगीच्या भावनेत स्वतःला घडवण्याची गरज आहे.
मित्रांनो,
जेव्हा आपण प्रशासकीय सेवांमध्ये सुधारणा आणि बदलांविषयी चर्चा करतो, तेव्हा त्याचा एक महत्त्वाचा अर्थ आहे- लोकसेवकांच्या वर्तनात बदल. ही गोष्ट आपण सर्व जाणतो की जुन्या व्यवस्थेत अधिकारी असण्यावर अधिक भर दिला जात होता. परंतु आज देशाचा भर कर्तव्य भावनेवर अधिक आहे, पदापेक्षा कार्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. संविधानदेखील आपल्या कर्तव्यांमधूनच आपल्याला अधिकार प्रदान करते. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी, जेव्हा तुम्ही हा विचार कराल की तुमचे कर्तव्य काय सांगते, तेव्हा तुमच्या निर्णयांचा परिणाम आपोआप अनेक पटींनी वाढेल, आणि मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगेन, आपण आपल्या सध्याच्या प्रयत्नांना भविष्याच्या एका मोठ्या कॅनव्हासवर पाहिले पाहिजे. 2047 पर्यंतचा, विकसित भारत, हाच आपला कॅनव्हास आहे, हेच आपले ध्येय आहे. आपण आज जे काम करत आहोत, त्याचा परिणाम देशाच्या विकास यात्रेवर काय होईल, आपल्या एका निर्णयाने किती नागरिकांचे जीवन बदलू शकते. आपले एक वैयक्तिक परिवर्तन कसे संस्थात्मक परिवर्तन बनू शकते. हे प्रश्न आपल्या प्रत्येक प्रयत्नाचा भाग असले पाहिजेत. माझ्या अनुभवावरून मी हे सांगू शकतो की, यासाठी आपल्याला खूप ऊर्जेची आवश्यकता असते, आणि ही ऊर्जा आपल्याला केवळ आणि केवळ सेवाभावातूनच मिळू शकते.
मित्रांनो,
जेव्हा आपण शिक्षणाबद्दल चर्चा करतो, तेव्हा आजच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप वाढते. आपण सर्वजण पाहत आहात, गेल्या 11 वर्षांत शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात कशा प्रकारे तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण झाले आहे. प्रशासन आणि सेवा वितरणापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत, आपण तंत्रज्ञान क्रांतीची ताकद अनुभवली आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनानंतर हा बदल आणखी वेगवान होणार आहे. त्यामुळे, तंत्रज्ञान समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे, हा सार्वजनिक सेवेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आता चांगला प्रशासक आणि सक्षम सार्वजनिक सेवक तोच असेल, ज्याला तंत्रज्ञान आणि डेटाची चांगली जाण असेल. हाच तुमच्या निर्णयप्रक्रियेचा आधार ठरेल. त्यामुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात क्षमता विकास आणि सातत्यपूर्ण शिक्षण सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात आपण सर्वांची भागीदारी आणि सहभाग, अत्यंत महत्त्वाचा आहे. मला विश्वास आहे की, कर्मयोगी साधना सप्ताहात या विषयावरही तितकेच लक्ष केंद्रीत केले जाईल.
मित्रांनो,
आपल्या संघराज्यीय रचनेत, देशाच्या यशाचा अर्थ म्हणजे राज्यांचे सामूहिक यश होय. अनेक दशकांपासून आपण राज्यांचे वर्गीकरण पाहिले आहे, आपण काय-काय ऐकत होतो, आघाडीची राज्ये, मागास राज्ये, ‘बीमारू’ राज्ये—परंतु आता अशा सर्व संकल्पना संपुष्टात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्याला राज्यांमधील सर्व प्रकारचे अंतर कमी करायचे आहे, आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक राज्य समान तीव्रतेने कार्य करेल. आपल्याला विभागीय अडथळे (silos) दूर करायचे आहेत आणि अधिक चांगल्या समन्वयासह व सामायिक समजुतीने पुढे जायचे आहे. यासाठी ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोन आवश्यक आहे. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा दोन्ही हा दृष्टिकोन स्वीकारतील, तर प्रत्येक मोहिमेत यश मिळेल. साधना सप्ताहाच्या माध्यमातून हेच सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मित्रांनो,
आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, सामान्य नागरिकासाठी स्थानिक कार्यालय हेच सरकारचा चेहरा असते. तुमची कार्यशैली, तुमचे वर्तन, यावरूनच लोकशाही आणि संवैधानिक व्यवस्थांमध्ये नागरिकांचा विश्वास निश्चित होतो. त्यामुळे, आपण जे काही करू, ज्या कोणत्याही स्तरावर करू, त्या विश्वासाचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा क्षमता विकास आयोगाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की कर्मयोगी साधना सप्ताह, विकसित भारताच्या आपल्या प्रवासात एक महत्त्वाचा अध्याय बनेल.
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
नमस्कार
नितीन फुल्लुके/नेहा कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2248788)
अभ्यागत कक्ष : 9