संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'संशोधक' हे चौथे सर्वेक्षण जहाज जीआरएसई कोलकाता येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द


चार जहाजांच्या प्रकल्पाअंतर्गत 'संशोधक' हे अंतिम सर्वेक्षण जहाज भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात केले दाखल

Posted On: 31 MAR 2026 12:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मार्च 2026

 

भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'द्वारे आरेखित आणि कोलकाता येथील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड' (जीआरएसई) येथे बांधण्यात आलेले, 'संशोधक' (यार्ड  3028) हे  'सर्वेक्षण जहाज  (मोठे)' श्रेणीतील शेवटचे जहाज 30 मार्च 2026 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. 

चार सर्वेक्षण (मोठ्या) जहाजांच्या बांधणीसाठीचा करार 30 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आला होता. या श्रेणीतील आधीची जहाजे आयएनएस संधायक, आयएनएस निर्देशक  आणि आयएनएस ईक्षक अनुक्रमे 03 फेब्रुवारी 2024, 18 डिसेंबर 2024 आणि 06 नोव्हेंबर 2025 रोजी सेवेत दाखल झाली होती.

एसव्हीएल अर्थात सर्वेक्षण (मोठ्या) जहाजांचे आरेखन आणि बांधणी कोलकाता येथील 'मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड' (जीआरएसई) या कंपनीद्वारे, 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग'च्या वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज बंदरे/बंदर-प्रवेशमार्गांचे विस्तृत स्वरूपातील किनारी आणि खोल पाण्यातील जलसर्वेक्षण करण्यास, तसेच नौवहनाचे मार्ग निश्चित करण्यास सक्षम आहे. संरक्षण आणि नागरी उपयोगांसाठी समुद्रशास्त्रीय व भूभौतिकीय माहिती संकलित करणे, ही देखील या जहाजाच्या कार्यकक्षेतील एक महत्त्वाची जबाबदारी आहे.

'संशोधक' या जवळपास 3400 टन वजनाची आणि 110 मीटर लांबीच्या जहाजावर 'माहिती संकलन आणि प्रक्रिया प्रणाली', 'स्वयंचलित पाणबुडी वाहन', 'दूरस्थ-नियंत्रित वाहन', 'डीजीपीएस दीर्घ-श्रेणी स्थान-निर्धारण प्रणाली', 'डिजिटल साइड स्कॅन सोनार' इत्यादी अत्याधुनिक जलसर्वेक्षण उपकरणे बसवण्यात आली आहेत. दोन डिझेल इंजिनांच्या साहाय्याने चालणारे हे जहाज18 नॉट्सपेक्षा अधिक वेग गाठण्यास सक्षम आहे.

जहाजाच्या तळाचा पाया जून 2022 मध्ये रचण्यात आला आणि जून 2023  मध्ये हे जहाज पाण्यात  उतरवण्यात आले. जहाज सुपूर्द करण्यापूर्वी, बंदर परिसरात आणि खुल्या समुद्रात या जहाजाच्या सर्वसमावेशक नियोजित चाचण्या घेण्यात आल्या. 

'संशोधक'  या जहाजामध्ये खर्चाच्या निकषावर 80% टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश आहे. 'संशोधक' जहाजाचे हस्तांतरण म्हणजे 'आत्मनिर्भर भारत' ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारत सरकार आणि भारतीय नौदलाने केलेल्या अथक प्रयत्नांचे एक प्रतीक आहे.  तसेच, हिंद महासागर क्षेत्रात राष्ट्राची सागरी सामर्थ्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी अनेक भागधारक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि भारतीय उद्योगांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना वाहिलेली ही एक आदरांजली आहे.

 

* * *

हर्षल आकुडे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2247187) अभ्यागत कक्ष : 13