विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 'हृदय आणि रक्तवाहिन्यांसदर्भातील आजारामध्ये लठ्ठपणा आणि लिपिड व्यवस्थापन' या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन


पोटाकडील किंवा शरीराच्या मध्य भागातील लठ्ठपणा हा एकंदर लठ्ठपणाच्या तुलनेत  अधिक धोकादायक; विशेषतः भारताच्या संदर्भात, सडपातळ आणि बारीक दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही आंतरअंग (व्हिसेरल फॅट) चरबीचे प्रमाण लक्षणीय - डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 29 MAR 2026 5:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज 'हृदय आणि रक्तवाहिन्यांसदर्भातील आजारामध्ये लठ्ठपणा आणि लिपिड व्यवस्थापन' या विषयावरील सर्वसमावेशक पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरीराच्या एकूण लठ्ठपणाच्या तुलनेत, विशेषतः भारतीय व्यक्तींच्या संदर्भात जिथे सडपातळ आणि बारीक दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही लक्षणीय प्रमाणात आंतरअंग चरबी आढळते, तेव्हा पोट किंवा पोट आणि कंबर या मध्य भागातील लठ्ठपणा अधिक धोकादायक असतो. प्रत्यक्ष लठ्ठपणापेक्षा वेगळी असणारी मध्य भागातील चरबी धोकादायक ठरू शकते, असे मत, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

'अॅडव्हान्सेस इन ओबेसिटी आणि लिपिड मॅनेजमेंट इन सीव्हीडी' या हृदयरोगाविषयीच्या सर्वसमावेशक पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. भारतात बारीक दिसणाऱ्या माणसामध्येही पोटाच्या मध्य भागात चरबी जमा झाल्यामुळे त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फॅटी लिव्हर, लिपिड विकार इत्यादींसह विविध प्रकारच्या चयापचयाशी निगडीत विकारांचा धोका संभवतो, असे ते म्हणाले.

भारतात, पुरुष आणि महिला दोन्हींमध्ये एकुणातच लठ्ठपणा वाढत असला तरीही पोटावरील चरबी प्रमाणापेक्षा अधिक आहे आणि ती हृदयविकाराच्या धोक्याचे स्वतंत्र कारण ठरते.  सर्वसाधारण लठ्ठपणा नसतानाही, पोटाच्या आजूबाजूला असणाऱ्या आंतरअंग चरबीचे उल्लेखनीय वैद्यकीय परिणाम दिसून येतात आणि त्यावर लवकर निदान आणि निश्चित उपचारांची गरज असते, असे ते पुढे म्हणाले.

या पुस्तकाचे योग्य वेळी आणि समर्पक प्रकाशन झाल्याचे सांगतानाच डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे पुस्तक, लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्याच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमाशी सुसंगत असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट अधोरेखित करतानाच नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे आणि तेलाच्या वापरात घट तसेच अनारोग्यकारी आहार सेवन व्यर्ज्य करण्यासह जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहनही केले आहे. हा उपक्रम 'विकसित भारत, स्वस्थ भारत आणि लठ्ठपणामुक्त भारत' या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे ते म्हणाले.

विकसित होत जाणाऱ्या वैद्यकीय ज्ञानाला अधोरेखित करत, मंत्र्यांनी पोटावरील चरबीचा संबंध फॅटी लिव्हर, इन्सुलिन प्रतिकार आणि कमी वयातील हृदयरक्तवाहिन्यांची गुंतागूंत यांसारख्या आजाराशी निगडीत असणाऱ्या पुराव्यांचा उल्लेख केला. चयापचय विकारासह टाइप टू मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या घटनांचे वाढते प्रमाण हे बदललेली जीवनशैली, आहार सवयी आणि शारीरिक संतुलन कमी झाल्याचे द्योतक आहे.

संतुलित आरोग्य सवयींचे महत्त्व डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. पुरेशी तयारी अथवा विश्रांती न घेता अतिश्रम करून सुदृढ होण्याच्या अतिरेकी किंवा अशास्त्रीय पद्धतींचाही आरोग्याला धोका पोहोचू शकतो. शाश्वत जीवनशैली, शिस्त, पुरेशी झोप आणि शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शनाने घेतलेली प्रतिबंधात्मक काळजी यांवरही भर दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

सुविख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एच. के. चोप्रा यांनी संपादित केलेल्या या पाठ्यपुस्तकात भारत आणि परदेशातील 300 हून अधिक संबंधितांनी योगदान देत अत्याधुनिक विचार एकत्रित मांडले आहेत. त्यामध्ये चयापचय उपचारपद्धती, लिपिड व्यवस्थापन, डिजीटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैद्यकीय निर्णय प्रणाली या विषयावरचे लेख आहेत.

***

राधिका अघोर/विजयालक्ष्मी साळवी-साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246685) अभ्यागत कक्ष : 22