सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
साध्वी निरंजन ज्योती यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
27 MAR 2026 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2026
साध्वी निरंजन ज्योती यांनी 18.03.2026 पासून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (एनसीबीसी) अध्यक्षपदाचा, तर किरण उमेश महाले यांनी 20.03.2026 पासून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (एनसीबीसी) सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला.
साध्वी निरंजन ज्योती या माजी खासदार आहेत आणि त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यामध्ये ग्राम विकास मंत्रालय, तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा समावेश आहे. सामाजिक आणि सामुदायिक विकास कामात, विशेषतः समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. सार्वजनिक जीवन आणि प्रशासनातील त्यांचा अनुभव आयोगाच्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महत्वाचे योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.
किरण उमेश महाले यांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा व्यापक अनुभव असून, त्या अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या महापौर म्हणून काम केले आहे, तसेच सार्वजनिक जीवनात विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. महिला सक्षमीकरण, समाजकल्याण आणि तळाच्या स्तरापर्यंत प्रशासनाशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अनेक सहकारी आणि सामाजिक संस्थांशी असलेल्या त्यांच्या सहयोगातून, समावेशक विकासाप्रति त्यांची वचनबद्धता दिसून येते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, अध्यक्षांचे आणि सदस्यांचे स्वागत करते. देशभरातील मागासवर्गीयांचे कल्याण, संरक्षण आणि सामाजिक-आर्थिक विकास, याबाबत आयोगाची कार्यकक्षा अधिक बळकट करण्यासाठी मंत्रालयाला त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाची आणि समर्पित सेवेची अपेक्षा आहे.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246325)
अभ्यागत कक्ष : 23