कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक संकटाच्या काळात कृषी क्षेत्रात स्थिरता राखण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Posted On: 25 MAR 2026 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी आज त्यांच्या निवासस्थानी एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय कृषी क्षेत्र आणि देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे, तसेच आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक सज्जता सुनिश्चित करणे, हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट होते.

या बैठकीदरम्यान, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, संकटाच्या काळात अधिक सक्रिय राहून महत्वपूर्ण  भूमिका पार पाडायची आहे.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे आणि निर्णय:

खतांचा पुरवठा आणि 'शेतकरी ओळखपत्र'

केंद्रीय कृषी मंत्री  शिवराज सिंह यांनी खतांचा समन्यायी आणि अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर दिला. वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी 'शेतकरी ओळखपत्रे' – फार्मर्स आय.डी. कार्ड  तयार करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उद्देशाने, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्यासोबत आपण लवकरच एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बाजारपेठेतील गैरप्रकारांविरुद्ध निर्णायक पावले - काळाबाजार आणि साठेबाजीवर कडक कारवाई

जागतिक संकटाचा गैरफायदा घेत खते आणि बी-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशेने कठोर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारांनाही प्रोत्साहित केले जाईल, असे कृषिमंत्री  चौहान यांनी स्पष्ट केले.

बियाण्यांचे उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी सहाय्य

या बैठकीत कृषी रसायने आणि बियाणे वाळवण्यासाठी आवश्यक असलेल्या वायूंच्या  उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. जागतिक संकटाच्या काळात पॅकेजिंग साहित्याची, विशेषतः दूध आणि इतर कृषी उत्पादनांसाठी लागणाऱ्या साहित्याची, कोणतीही कमतरता भासता कामा नये, यावर कृषी मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला.यासंदर्भात त्यांनी पेट्रोलियम मंत्रालय आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देशही दिले.

विशेष कक्षाची  स्थापना

कृषी क्षेत्रावर अहोरात्र देखरेख ठेवण्यासाठी एका 'विशेष कक्षाची'  स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडून  खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या उपलब्धतेबाबतचा साप्ताहिक अहवाल केंद्रीय कृषी मंत्र्यांना सादर केला जाईल.

आपल्या समारोपाच्या भाषणात, शेतकरी समुदायाला सर्व आवश्यक कृषी संसाधनांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सरकार वचनबध्‍द  असल्याचे कृषिमंत्री  चौहान यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244992) अभ्यागत कक्ष : 16