संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे जहाज त्रिकंदची सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथील बंदर भेट पूर्ण
भारत आणि सेशेल्स यांच्यातील‘एक्सरसाइज लामितिये 2026' ची पहिली त्रिसेवा आवृत्ती
Posted On:
22 MAR 2026 11:31AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाचे अदृष्यता-क्षम युद्ध जहाज इंडियन नेव्हल शिप त्रिकंदने 20 मार्च 2026 रोजी सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथील यशस्वी बंदर भेट पूर्ण करून तेथून प्रस्थान केले.
जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन कुलकर्णी यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची तसेच सेशेल्समधील भारताचे उच्चायुक्त यांची या उपक्रमादरम्यान भेट घेतली. जहाजाने सेशेल्स सरकारला अत्यावश्यक सुटे भाग आणि आवश्यक साहित्य देखील सुपूर्द केले.
आयएनएस त्रिकंदने‘एक्सरसाइज लामितिये 2026’च्या पहिल्या त्रिसेवा आवृत्तीत सहभाग घेतला. या सरावात भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि सेशेल्स संरक्षण दल (एसडीएफ) यांचे सदस्य सहभागी झाले होते. या सरावात भारतीय नौदलाचा हा पहिलाच सहभाग होता.
बंदर टप्प्यात जहाजावर ‘व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीझर’(व्हीबीएसएस) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये संयुक्त चढाई सरावाचाही समावेश होता. त्यानंतर सागरी टप्प्यात जहाजाने एससीजीएस ले व्हिजिलंट सोबत सराव केला आणि भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोज तसेच एसडीएफच्या विशेष दलाच्या संयुक्त पथकाने समुद्रात संयुक्त चढाई कारवाई केली. त्यानंतर भारतीय सेना आणि सेशेल्स संरक्षण दलाच्या सैन्याने प्रास्लिन बेटावर उतरणीची कारवाई केली.
मेजर जनरल मायकेल रोसेट, एसडीएफचे संरक्षण दलांचे प्रमुख, ब्रिगेडियर जीन अटाला, संरक्षण दलांचे उप प्रमुख एसडीएफ तसेच इतर वरिष्ठ अधिकारी सागरी टप्प्यात सराव पाहण्यासाठी आयएनएस त्रिकंदवर उपस्थित होते.
या सरावामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातील परस्पर कार्यक्षमता वाढविण्याची आणि सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली.‘लामितिये' या क्रेओल भाषेतील शब्दाचा अर्थ मैत्री असा असून तो दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.
ही बंदर भेट भारताच्या महासागर - प्रादेशिक सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दर्शवते आणि हिंद महासागर क्षेत्रात प्राधान्य सुरक्षा भागीदार आणि प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून भारतीय नौदलाच्या बांधिलकीला अधिक दृढ करते.
***
नितीन फुल्लुके / नितीन गायकवाड /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243558)
अभ्यागत कक्ष : 29