जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे जागतिक जल दिन संमेलन 2026 चे आयोजन
इंडस्ट्री फॉर वॉटर” या थीमअंतर्गत 700 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार
Posted On:
21 MAR 2026 12:15PM by PIB Mumbai
दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक स्तरावर पाळला जाणारा जागतिक जल दिन गोड्या पाण्याच्या महत्त्वाची तसेच शाश्वत जलव्यवस्थापनाच्या तातडीच्या गरजेची जाणीव करून देतो. हा दिवस पाणीटंचाई, हवामान बदल आणि सर्वांसाठी समतोल पाणी उपलब्धतेशी संबंधित वाढत्या आव्हानांवर प्रकाश टाकतो, तसेच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जगभरातील सरकारे, उद्योग आणि समुदायांना कृतीसाठी प्रेरित करतो. यंदाचा जागतिक विषय “वॉटर अँड जेंडर” हा समावेशक आणि समतोल जलशासनाच्या गरजेवर अधिक भर देतो.
या जागतिक आवाहनाला बळ देत जलशक्ती मंत्रालय 23 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात “इंडस्ट्री फॉर वॉटर” या विषयाखाली जागतिक जल दिन संमेलन 2026 आयोजित करणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी शासन व उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनातून विभाग, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यात वाढत असलेला समन्वय अधोरेखित केला जात असून “संपूर्ण शासन” आणि “संपूर्ण समाज” या दृष्टिकोनातून भारताच्या जलसुरक्षेला बळकटी देण्यावर भर देण्यात येणार आहे. पाणी हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय साधन मानले जात असून त्याच्या व्यवस्थापनात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रमुख भूमिका लक्षात घेऊन त्यांना या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे जनजागृती वाढविणे, समुदायाचा सहभाग प्रोत्साहित करणे आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यास प्रोत्साहन देणे आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जनजागृती कार्यक्रम राबविणे, पावसाचे पाणी साठवण आणि पुनर्वापर यांसारख्या उत्तम पद्धतींचे सादरीकरण करणे, उद्योग व नागरी स्थानिक संस्थांसोबत समन्वय साधून पाणी वापर कार्यक्षमता वाढविणे तसेच समुदाय-आधारित उपक्रमांना प्रोत्साहन देणे, अशा उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.
शाश्वत जलव्यवस्थापनासाठी संवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी हे संमेलन राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून धोरणनिर्माते, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि तरुण नवोन्मेषक एकत्र येऊन नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना तयार करतील.
उद्योगांना पाण्याचा कार्यक्षम वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रण आणि नवकल्पना यामध्ये महत्त्वाची भूमिका देत, या परिषदेत एक मोठा बदल दिसून येतो. उद्योग आता फक्त पाणी वापरणारे न राहता, पाण्याचे जतन करणारे बनत आहेत आणि अधिक शाश्वत व स्मार्ट पद्धती स्वीकारत आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील 700 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘जल शक्ती हॅकाथॉन’ विजेत्यांचा सन्मान होणार आहे. पाणी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपायांना यावेळी गौरवण्यात येईल. राज्य सरकारेही सक्रियपणे सहभागी होणार असून, विशेषतः जनगणना विषयक सत्रात त्यांचा सहभाग असेल. या सत्रात राष्ट्रीय पाणी जनगणना अहवाल पूर्ण होऊन प्रसिद्ध झाल्याबद्दलही सन्मान करण्यात येईल, ज्यातून माहितीआधारित पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित होते.
उद्घाटन सत्रादरम्यान (सकाळी 10:00 पासून) खालील प्रमुख अहवाल व प्रकाशने प्रसिद्ध केली जाणार आहेत:
7 वी लघु सिंचन गणना
2 री जलस्रोत गणना
1 ली झरे गणना
1 ली प्रमुख व मध्यम सिंचन प्रकल्प गणना
राष्ट्रीय जल डेटा धोरण
तांत्रिक व विषयाधारित प्रकाशने
या सत्रात आघाडीच्या राज्ये आणि उद्योग संघटनांचा सन्मान केला जाणार असून औद्योगिक पाणी वापर कार्यक्षमतेवरील उत्तम पद्धतींचा संच प्रकाशित केला जाईल. यात पुनर्चक्रण, पुनर्वापर आणि पाणी संवर्धनाच्या चांगल्या पद्धती दाखवण्यात येतील.
या संमेलनात चार विषयांवर सत्रे आणि कार्यशाळा होणार आहेत:
गाळ व्यवस्थापन, त्यावर प्रक्रिया आणि पुन्हा वापराचे उपाय
उद्योगांमार्फत पाणी बचत, कृत्रिम बुद्धिमत्ता व आयओटी आधारित स्मार्ट प्रणाली आणि पाण्याचा पुनर्वापर
हिमनद्या आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याचे उपाय, विशेषतः हिमालयीन हिमनद्या
जलगणना माहितीचा वापर करून नियोजन आणि धोरणे तयार करणे
इंडस्ट्री फॉर वॉटर या सत्राचा समारोप संयुक्त उद्योग घोषणापत्राद्वारे होणार असून, यामधून उद्योग क्षेत्राकडून शाश्वत जलसंपदा व्यवस्थापनासाठी दिलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला जाणार आहे. मंत्रालयाकडून जलक्षेत्रातील संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात येणार असून, शासन, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या बहुपक्षीय सहभागाच्या माध्यमातून हे संमेलन “कल्पना. नवोपक्रम. कृती.” या भावनेचे प्रतीक ठरत असून, भागीदारी, नवोपक्रम आणि धोरणात्मक समन्वयाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवते. नवोपक्रम आणि जबाबदारी यांचा समन्वय साधत जलसुरक्षित आणि लवचिक भारत घडविण्याकडे हे पाऊल उचलले जात आहे.
जागतिक जल दिनाची संकल्पना सर्वप्रथम 1992 मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास परिषदेत मांडण्यात आली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. 1993 पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असून सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधेपासून वंचित असलेल्या सुमारे 2.1 अब्ज लोकांबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी असलेल्या शाश्वत विकास ध्येय 6 साध्य करण्यास पाठबळ देणे हा आहे.
***
अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243341)
अभ्यागत कक्ष : 27