कृषी मंत्रालय
कृषी क्षेत्राचा सर्वंकष आढावा : पिकांचे नुकसान, विमा दावे आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत यावर भर
अतिवृष्टी, गारपीट आणि प्रतिकूल हवामानाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून, विमा दावे निकाली काढण्याचे निर्देश
शेतकरी कल्याण केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी कृती आराखडे : समन्वय, कापणी प्रयोग आणि त्वरित मदतीवर भर
Posted On:
20 MAR 2026 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथे कृषी क्षेत्राविषयी सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत अलीकडील अतिवृष्टी, जोरदार पाऊस, गारपीट आणि इतर प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा, विमा दावे प्रक्रिया आणि मदत यंत्रणा यावरही विचारविनिमय झाला. सरकारचा भर केवळ उत्पादनावर नाही, तर पिकांचे वैज्ञानिक मूल्यमापन, विमा दाव्यांचा योग्यरीत्या निपटारा करणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत देणे यावरही आहे, असे चौहान म्हणाले.

हवामानातील अनिश्चितता, पिकांचे नुकसान होण्याचा धोका आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारची धोरणे, मदत यंत्रणा आणि विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळावा, या हेतूने ही बैठक झाली.
राज्य सरकारांशी समन्वय वाढवावा, असे निर्देश बैठकीत चौहान यांनी कृषी सचिव, कृषी आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पीक कापणी प्रयोग तातडीने करावेत, नुकसानाचे वैज्ञानिक मूल्यमापन करावे आणि विलंब न करता मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागू नये म्हणून अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर प्रतिकूल हवामानाने प्रभावित भागांमध्ये विशिष्ट कालमर्यादेत कृती करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवराज सिंह चौहान यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, त्यांनी राज्य सरकारांशी तात्काळ संपर्क आणि समन्वय साधावा. यामुळे पीक कापणी प्रयोग योग्य रीतीने पार पडतील, नुकसानीचे अचूक मूल्यांकन होईल आणि विम्याचे दावे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केले जातील. "जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांचे विम्याचे दावे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केले जावेत, जेणेकरून आपण आपल्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना आधार देऊ शकू," असे ते म्हणाले.
त्यांनी अशीही माहिती दिली की, भारतीय हवामान विभागाने (आय एम डी) येत्या काही दिवसांत आणखी दोन पश्चिमी वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे वादळी वारे, गारपीट यांची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना कोणते सल्ले द्यावेत यावर सविस्तर चर्चा झाली आणि व्यापक स्तरावर आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रतिकूल हवामान, हवामानाचे अंदाज आणि जोखीम व्यवस्थापन
या बैठकीत हवामानाचा अंदाज आणि पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला, जेणेकरून येत्या काही दिवसांत हवामानाशी संबंधित संभाव्य धोक्यांच्या अनुषंगाने तयारी करता येईल. चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला, मदत आणि संरक्षण मिळेल याची सुनिश्चिती करणारी एक व्यापक कृती योजना तयार करण्यासाठी कृषी विभाग, राज्य सरकारे आणि सर्व संबंधित संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे.
केंद्रीय मंत्र्यांनी हे स्पष्ट केले की, कृषी क्षेत्राचे उद्दिष्ट केवळ उत्पादनापुरतेच मर्यादित न राहता त्यामध्ये शेतकऱ्यांची सुरक्षा, उत्पन्नातील स्थिरता आणि वेळेवर मिळणारा आधार यांचाही समावेश असण्याची गरज आहे.
कडधान्यांच्या बाबतीत आत्मनिर्भरता मोहीम, किमान आधारभूत किंमत आणि विक्रमी उत्पादनाची खरेदी
ते म्हणाले की, गहू आणि भाताची खरेदी सुरूच राहील; मात्र कडधान्यांवर विशेष भर दिला जाईल. "शेतकरी त्यांना हवे तितके तूर, मसूर आणि उडीद विकू शकतात आणि आम्ही त्याची खरेदी करू," असे त्यांनी सांगितले.
प्रमाणासोबतच गुणवत्तेवरही भर; 'प्रीमियम' मूल्यासाठी मोहीम
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की, कृषी धोरण हे यापुढे केवळ उत्पादन वाढवण्यावरच लक्ष केंद्रित करणार नाही, तर गुणवत्ता सुधारण्यालाही तितकेच महत्त्व देईल.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी पिकांच्या चांगल्या जाती, जैव-संवर्धित पिके आणि उच्च प्रतीच्या धान्यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
* * *
सुवर्णा बेडेकर/प्रज्ञा जांभेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243136)
अभ्यागत कक्ष : 15