कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बागायती पिकांच्या क्षेत्रफळ आणि उत्पादन यासाठी वर्ष 2024-25 चा अंतिम अंदाज आणि 2025-26 चा पहिला अग्रिम अंदाज प्रसिद्ध केला


क्षेत्रफळ आणि उत्पादन या दोन्हीमध्ये विक्रमी वाढीसह, बागायती पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात एक प्रमुख घटक म्हणून उदयास आली आहेत -शिवराज सिंह

कांदा, बटाटा, टोमॅटो, तसेच मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ झाली –शिवराज सिंह

प्रविष्टि तिथि: 17 MAR 2026 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि बागायती पिकांना मजबूत बनवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान यांच्या मंजुरीनंतर, कृषी आणि  शेतकरी कल्याण विभागाने वर्ष 2024-25 चे अंतिम अंदाज आणि 2025-26 चा पहिला अग्रिम अंदाज प्रसिद्ध केला , ज्यामुळे देशभरात फळे, भाजीपाला, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींच्या लागवड आणि उत्पादनात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

बागायती पिकांचे विक्रमी क्षेत्रफळ आणि उत्पादन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या मंजुरीनंतर सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार,बागायती  पिकांखालील एकूण क्षेत्र 2023-24 (अंतिम) मधील 290.86 लाख हेक्टरवरून 2024-25 (अंतिम अंदाज ) मध्ये 301.36 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे म्हणजेच  10.50 लाख हेक्टर (3.61 %) लक्षणीय वाढ झाली आहे. एकूण उत्पादन 3547.44 लाख टनांवरून 3707.38 लाख टनांपर्यंत वाढले,जे 159.94 लाख टन (4.51 %) वृद्धी दर्शवते . वर्ष 2025-26 साठीच्या पहिल्या अग्रिम  अंदाजानुसार 301.31लाख हेक्टर क्षेत्रफळ  आणि 3708.46 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे, जे 2024-25  पेक्षा 1.09  लाख टनांनी अधिक असून स्थिर प्रगती दर्शवते.

फळे आणि भाजीपाल्यामुळे शेती आणि पोषण मजबूत

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांच्या माहितीनुसार, केळी, आंबा, संत्री, पपई, पेरू, टरबूज आणि फणस यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे 2024-25 मध्ये फळांचे उत्पादन 4.13% (46.71लाख टन) वाढून 2023-24 मधील 1129.78 लाख टनांवरून 1176.49 लाख टन झाले आहे.

कांदा, बटाटा, टोमॅटोमुळे भाज्यांची दैनंदिन  टोपली झाली अधिक मजबूत

जारी अंदाजानुसार, कांदा लागवडीचे  क्षेत्र  2023-24 मधील 15.41 लाख हेक्टरवरून वाढून  2024-25 मध्ये 19.68  लाख हेक्टर  (4.27  लाख हेक्टर किंवा 27.74% वाढ) झाले  आहे, तर उत्पादन 307.67 लाख टन  ( 242.67 लाख टनांच्या तुलनेत  65  लाख टन अधिक किंवा 26.79% वाढ) झाले आहे.

उच्च-मूल्य पिकांमध्ये वाढ: मसाले, फुले, सुगंधी-औषधी वनस्पती

सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीखालील क्षेत्र 6.13% (0.57 लाख हेक्टर) वाढून  9.26 लाख हेक्टरवरून 2024-25 मध्ये  9.83 लाख हेक्टर झाले, उत्पादन 7.26 लाख टनांवरून 9.01लाख टन झाले असून,2025-26 मध्ये 9.03 लाख टनांचे उद्दिष्ट आहे.

वर्ष 2025-26 मधील एकूण 3708.46 लाख टन फलोत्पादन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान, सिंचन, मूल्य साखळी, प्रक्रिया, साठवणूक, शीत साखळी आणि बाजारपेठा यांमधील सरकारी गुंतवणुकीचा परिणाम  आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहेत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे आणि फायदेशीर, शाश्वत शेतीला चालना मिळत आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे आणि कृषी निर्यातीला चालना देणे यासाठी बागायती क्षेत्र  आता एक भक्कम पाया बनत आहे, जेणेकरून देशभरातील शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, मसाले, फुले आणि औषधी पिकांपासून अधिक चांगले, शाश्वत उत्पन्न मिळेल.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2241512) आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Kannada