कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेतकऱ्यांसाठी उत्पन्न आणि सुरक्षिततेची हमी - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे लोकसभेत प्रतिपादन


“तंबाखूऐवजी नगदी पिकांना केंद्र सरकारचे प्रोत्साहन,” -शिवराज सिंह चौहान

“गहू आणि तांदळापासून डाळी आणि तेलबिया पिकांपर्यंत, एमएसपी दराने ऐतिहासिक खरेदी,” -शिवराज सिंह चौहान

Posted On: 17 MAR 2026 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2026

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तंबाखूसारख्या हानिकारक पिकाऐवजी नफ्याच्या पर्यायी पिकांना प्रोत्साहन देणे, पीक विमा योजनेत क्रांतिकारक सुधारणा आणि कठोर देखरेख व्यवस्थेसह विविध उपाययोजना राबवित किमान आधारभूत  किंमत – एमएसपीच्या दराने कृषी मालाची ऐतिहासिक खरेदी याद्वारे सरकारने हे प्राधान्य दिले आहे.

लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना चौहान यांनी सांगितले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तंबाखूच्या लागवडीपासून दूर जाण्याचे केवळ आवाहन केले नाही तर; ज्या प्रदेशांमध्ये तंबाखूची लागवड होते त्या प्रदेशांत पर्यायी लागवडीसाठी ठोस आणि  नफादायी पर्यायही चिन्हित केले आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणाले, देशातील बहुतेक शेतकरी जमिनीच्या लहान तुकड्याचे मालक आहेत,अशा परिस्थितीत एका पिकावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरते. त्यामुळे सरकारने एकात्मिक शेतीचे अनेक मॉडेल  विकसित केले आहेत आणि विविध राज्यांमध्ये त्यांची प्रात्यक्षिके सुरू केली आहेत.

चौहान यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना उचित  दर मिळावा यासाठी गहू, तांदूळ, डाळी  आणि तेलबिया यांसह सर्व प्रमुख पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे आणि चालू हंगामात एमएसपी दराने ऐतिहासिक खरेदी सुरू आहे.

केंद्रीय कृषी मंत्री पुढे म्हणाले, यापूर्वी प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळविण्यासाठी महिनोंमहिने  प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आताच्या सरकारने नियमांमध्ये सर्वसमावेशक सुधारणा केल्या असून, एखाद्याच शेतकऱ्याला पीक नुकसानीचा फटका बसला तरी विमा कंपन्यांना त्याला भरपाई देण्यास नियमबद्ध केले आहे.

सरकारच्या व्यापक दृष्टीकोनाचा पुनरुच्चार करत शिवराज सिंह चौहान म्हणाले, या उपक्रमांचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना अधिक चांगल्या उत्पन्नाची हमी मिळावी त्याचबरोबर  त्यांना जोखमींपासून संरक्षणही मिळावे. परिणामी, देशात सबल आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्राचा  पाया अधिक मजबूत होईल.

निलीमा चितळे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2241380) अभ्यागत कक्ष : 33