पंतप्रधान कार्यालय
आसाममधील सिलचर इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
14 MAR 2026 2:06PM by PIB Mumbai
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
प्रानोप्रिय बोराक उपत्यकार, सम्मानित नागरिकवृंद, आपनादेर शोबाई के आमार प्रोणाम जानाई।
आसाम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल , इथे उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!
संस्कृती, साहस-धाडस आणि चैतन्यशीलता अशा विविध गुणांनी समृद्ध असलेल्या बराक खोऱ्यातील तुम्हां सर्व कुटुंबातील सदस्यांमध्ये आज उपस्थित असणे हा माझ्यासाठी एक अतिशय खास, विशेष अनुभव आहे. सिलचर हे स्थान बराक खोऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या इतिहासाने , भाषेने तसेच संस्कृतीने आणि उद्योग यांनी एकत्रितपणे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथे बंगाली बोलली जाते, आसामीचे बोल ऐकले जातात आणि इतर आदिवासी परंपरा देखील चांगल्या बहरल्या आहेत. ही विविधताच तुमची ताकद बनली आहे. तुम्ही सर्वजण मिळून या संपूर्ण प्रदेशाचा बंधुत्वाने आणि सौहार्दाने विकास साधत आहात. हीच बराक खोऱ्याची मोठी ताकद आहे.
मित्रांनो,
बराक नदीचा सुपीक मैदानी- पठारी प्रदेश , या भागामध्ये असलेले चहाचे मळे, इथले शेतकरी, चहाचे व्यापारी मार्ग आणि इथली शैक्षणिक केंद्रे यामुळे विकासाला प्रेरणा मिळाली आहे. हा प्रदेश केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्य आणि पश्चिम बंगालला जोडणारा दुवा आहे.
21 व्या शतकात बराक खोऱ्याचे हे महत्त्व आणखी वृद्धिंगत व्हावे, यासाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज तुमच्यामध्ये आलो आहे. काही वेळापूर्वीच, बराक खोऱ्याला आणि ईशान्येकडील भागाला जोडणे शक्य व्हावे, यासंबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आणि काही कामांचे उद्घाटन करण्यात आले. रस्ते असोत, रेल्वे असोत किंवा कृषी महाविद्यालये असोत, इथला प्रत्येक प्रकल्प बराक खोऱ्याला ईशान्येकडील एक प्रमुख दळण - वळण केंद्र आणि व्यापार केंद्र बनवणार आहे. यामुळे येथील तरुणांसाठी असंख्य रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. या सर्व विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारांनी ईशान्य भारताला दिल्लीपासून आणि त्यांच्या हृदयांपासून दूर ठेवले. काँग्रेसला ईशान्येकडील राज्यांचा जवळजवळ विसरच पडला होता . परंतु भाजपाच्या डबल इंजिन सरकारने आता ईशान्येला अशा प्रकारे जोडले आहे की, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आज, ईशान्य भारतासाठी "अॅक्ट ईस्ट" धोरण सरकारच्या केंद्रस्थानी आहे. हे धोरणच भारताला आग्नेय आशियाशी जोडणारा सेतू बनले आहे.
परंतु मित्रांनो,
ज्याप्रमाणे काँग्रेसने ईशान्येला स्वतःच्या मर्जीने सोडून दिले, तसेच बराक खोऱ्याच्या विनाश करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, काँग्रेसने एक सीमारेषा आखण्यास परवानगी दिली. याचा परिणाम असा झाला की, बराक खोऱ्याचा समुद्राशी असलेला संबंध तुटला. एकेकाळी व्यापाराचा चांगला मार्ग आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बराक खोऱ्याची ताकद हिरावून घेण्यात आली. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेस सरकारे सत्तेत राहिली, परंतु त्यांच्याकडून बराक खोऱ्याच्या विकासासाठी काहीही महत्त्वाचे किंवा भरीव कार्य केले गेले नाही.
मित्रांनो,
भाजपाचे डबल-इंजिन सरकार आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. आम्ही बराक खोऱ्याला पुन्हा एकदा व्यापार आणि वाणिज्य केंद्र बनवण्यासाठी सतत काम करत आहोत. आज, या दिशेने एक मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. आज, सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या शिलाँग-सिलचर 'हाय-स्पीड कॉरिडॉर' चा म्हणजेच अति वेगवान मार्गिका तयार करण्यासाठी भूमिपूजन समारंभ झाला आहे. 24,000 कोटी रुपये, किती? किती? 24,000 कोटी रुपये. किती? किती? किती? काँग्रेसच्या लोकांना हे विचारा, त्यांना पेन आणि कागद द्या आणि त्यांना 24,000 कोटी कागदावर लिहिण्यास सांगा. किती शून्य आहेत? त्यांना समजणार नाही. ज्याठिकाणी काँग्रेसच्या लोकांच्या मनात कुंपण असते, तिथूनच आमचे काम सुरू होते. ही ईशान्येकडील पहिली प्रवेश नियंत्रित अति वेगवान मार्गिका असणार आहे.
मित्रांनो,
हा फक्त एक महामार्ग प्रकल्प नाही; तो ईशान्येकडील लोकांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेचा अंत दर्शवणारा आणि आकांक्षापूर्ती करणारा प्रकल्प आहे . हा कॉरिडॉर सिलचर, मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुरा यांना जोडणार आहे. या तीन राज्यांच्या पलीकडे बांगलादेश आणि म्यानमार आहे आणि नंतर आग्नेय आशियातील विशाल बाजारपेठ आहे. बराक खोरे आज एका अतिशय उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे. याचा फायदा आसामसह संपूर्ण ईशान्येकडील शेतकरी आणि तरुणांना होईल. या संपूर्ण प्रदेशात इतकी चांगली संपर्क आणि दळण वळण सुविधा निर्माण झाल्यानंतर उद्योग मजबूत होतील, पर्यटनाला फायदा होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या सर्व कोणाकोपऱ्याशी तुम्हाला सहजपणे जोडणे शक्य जाईल.
मित्रांनो,
सिलचरमधील वाहतुकीच्या प्रश्नामुळे तुम्ही सर्वजण खूप त्रासून गेले आहात. आता सिल्चर उड्डाणपूलामुळे ही समस्या देखील कमी होईल. सिल्चर वैद्यकीय महाविद्यालय, एनआयटी सिल्चर आणि आसाम विद्यापीठात शिकणाऱ्या युवा विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली सोय झाली आहे. यामुळे येण्याजाण्यातील त्यांचा अतिशय मौल्यवान वेळ वाचणार आहे.
मित्रहो,
डबल इंजिनचे भाजपा सरकार आसामच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीवर देखील खूप जास्त काम करत आहे. विशेषतः रेल्वेच्या विद्युतीकरणाला आमचे खूप जास्त प्राधान्य आहे. आता आसामच्या रेल्वे जाळ्यातील अडीच हजार किलोमीटरहून अधिक मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. आता इथेही जलद गतीने रेल्वेगाड्या धावू शकतील, यामुळे बराक खोऱ्याच्या स्वच्छ वातावरणालाही मोठा लाभ होईल .
मित्रहो,
बराक खोऱ्यातील शेतकरी आणि इथल्या चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे आसामच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निरंतर पावले उचलत आहे. कालच गुवाहाटी येथून मी पीएम-किसान सन्मान निधीचा पुढला हप्ता जारी केला आहे. आतापर्यंत पीएम-किसान सन्मान निधीद्वारे देशातील शेतकऱ्यांना लाखो कोटी रुपये आणि एकट्या आपल्या आसामच्या शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळाले आहेत. आता तुम्ही विचार करा, आम्ही 10 वर्षांमध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या खिशात 20 हजार कोटी रुपये दिले आहेत. या काँग्रेसवाल्यानी 10 वर्षे सत्ता उपभोगली,पंतप्रधान तर आसाममधून निवडून गेले होते. मात्र तरीही एक पैसा देखील शेतकऱ्यांना दिला नाही, आम्ही 20 हजार कोटी रुपये दिले आहेत. काल बराक खोऱ्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्येही हा शेवटचा हप्ता जमा झाला आहे,आणि निवडणुकांनंतर वेळ येईल तेव्हाही जमा होईल. ही आर्थिक मदत शेतीशी संबंधित छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करण्यास माझ्या गावातील छोट्या-छोट्या शेतकरी बंधू-भगिनींना मोलाची मदत करत आहे.
मित्रहो,
बराक खोरे आता आपल्या पिकांसाठीच नव्हे तर शेतीशी संबंधित शिक्षण आणि संशोधनासाठी देखील ओळखले जाईल. पाथरकांडी येथे बराक खोऱ्यातील पहिल्या कृषी महाविद्यालयाचे बांधकाम आजपासून सुरु होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होईलच , शिवाय इथल्या युवकांना कृषी स्टार्टअप्ससाठी सहकार्य, समर्थन आणि प्रोत्साहन मिळेल.
मित्रहो,
भाजपाचा मंत्र आहे -विकासाच्या शर्यतीत जे मागे राहिले त्यांना प्राधान्य देणे. काँग्रेसच्या सरकारांनी सीमावर्ती गावांना देशातील शेवटची गावे मानले होते. आम्ही सीमावर्ती गावांना देशातील पहिले गाव मानतो. आणि म्हणूनच , सीमावर्ती भागाच्या विकासासाठी कछार जिल्ह्यातून व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा पुढील टप्पा सुरु केला होता. यामुळे बराक खोऱ्यातील अनेक गावांमध्येही नक्कीच सुधारणा होणार आहे.
मित्रहो,
इथे मोठ्या संख्येने चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे मित्र देखील आहेत. आसाम सरकारने चहाच्या मळ्यांशी संबंधित हजारो कुटुंबियांना त्यांच्या जमिनीचे हक्क देण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. या कुटुंबांचे भविष्य बदलण्याची ही एक मोठी सुरुवात आहे. जमिनीचे हक्क मिळाल्यामुळे या कुटुंबांना संरक्षण मिळाले आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची हमी मिळाली आहे.
मित्रहो,
कृपया तुम्ही जरा दूर रहा, आता जागा नाहीये , पुढे येऊ शकत नाही. हे पहा, त्यांना तिथून जरा दूर ठेवा, आता पुढे येऊ शकत नाही तुम्ही भाऊ. आमचे आसाममधील बंधू-भगिनी तर खूप समंजस आहेत. तुमचे प्रेम , तुमचा आशीर्वाद ही एवढी मोठी ताकद आहे , कृपया जरा लक्ष द्या.
मित्रहो,
मी हेमंतजींच्या सरकारचे अभिनंदन करतो, आज तुम्ही चहाच्या बागांमध्ये सुमारे 200 वर्षांपासून सेवा देणाऱ्या अनेक पिढ्यांच्या संघर्षाचा सन्मान केला आहे. बघा, माझ्या या शब्दांवर ढग देखील गडगडाट करू लागले आहेत. मला आनंद आहे की ज्यांना आधीच्या सरकारांनी वाऱ्यावर सोडले होते त्यांची काळजी भाजपा सरकारने घेतली आहे.
मित्रहो,
ही केवळ जमिनीच्या कायदेशीर हक्कांची बाब नाही . यामुळे ही लाखो कुटुंबे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी जलद गतीने जोडली जातील. कायमस्वरूपी घर, वीज , पाणी आणि गॅसच्या योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ आता या कुटुंबांना मिळणे शक्य होईल.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांमध्ये , भाजपा सरकारने चहाच्या बागांमध्ये असंख्य शाळा उघडल्या आहेत आणि मुलांना शिष्यवृत्ती दिली आहे. सरकारी नोकऱ्यांचे मार्गही खुले केले आहेत. अशा प्रयत्नांमुळे चहाच्या बागांमधील तरुणांसाठी उज्ज्वल भविष्याची दारे खुली होत आहेत.
मित्रहो,
भाजपच्या डबल-इंजिन सरकारसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्यसेवा हे प्रमुख प्राधान्य राहिले आहे. आसामला बऱ्याच काळापासून शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या बाबतीत काँग्रेसची उपेक्षा दीर्घकाळ सहन करावी लागली.
आज, आसाम शिक्षण आणि आरोग्यसेवेचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.याचा खूप जास्त लाभ, बराक खोऱ्याला मिळाला आहे. आज इथे शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित अनेक मोठ्या संस्था स्थापन झाल्या आहेत.
मित्रांनो,
काँग्रेसनं आसाममधल्या युवकांना केवळ हिंसा आणि दहशतवादाच्या दुष्टचक्रात अडकवून ठेवलं होतं. काँग्रेसनं आसामला फोडा आणि राज्य करा धोरणाची प्रयोगशाळा बनवलं होतं. आज मात्र, आसामच्या युवकांसाठी, अनेक संधींचे आकाशच मोकळं झालं आहे.
आज आसाम राज्य, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राचा एक महत्वाचा भाग बनले आहे. इथं नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाशी संबंधित संपूर्ण व्यवस्था आणि कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. इथे आयआयटी आणि आयआयएम यांच्यासारख्या संस्था विकसित होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालये, एम्स आणि कर्करोग रुग्णालयांचे सक्षम जाळे विकसित होत आहे. शांतता आणि प्रगतीचे हे नवे युग, अनेकांचे त्याग आणि प्रयत्नानंतर आले आहे. आता आसामला पुन्हा जुन्या युगात ढकलण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शक्तीला आपल्याला ठोस, सडेतोड उत्तर द्यायचे आहे.
मित्रांनो,
आज मी सिलचर इथून आसामला सावध - सतर्क राहण्याचा इशाराही देऊ इच्छितो. तुम्ही काँग्रेसला आसामच्या बाहेर काढले आहे. आज देशातले प्रत्येक राज्य काँग्रेसला धडा शिकवत आहे. काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये पराभूत होत आहे. आता जवळच्या भविष्यात काँग्रेस स्वतःच्या पराजयाचे शतक मारणार आहे. पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता देशाविरोधातच आघाडी उघडली आहे. काँग्रेसचे ने देशाला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपण पाहिले, दिल्लीत इतकी मोठी आंतरराष्ट्रीय एआय परिषद झाली. आज संपूर्ण जग कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी उत्सुक आहे. दिल्लीत झालेल्या या एआय परिषदेतून सगळ्या जगाला एक आशेचा नवा किरण दिसला.जगभरातले नाते, जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातले जागतिक तज्ञ या परिषदेसाठी भारतात आले होते. काँग्रेसने या परिषदेला बदनाम करण्यासाठी कपडे फाडून अर्धनग्न गलिच्छ प्रदर्शन केलं. आता काँग्रेसकडे आपले कपडे फाडण्याशिवाय इतर काही उरलेले नाही. संपूर्ण देशाने काँग्रेसच्या या लाजिरवाण्या आणि किळसवाण्या प्रदर्शनावर टीका केली. मात्र दिल्लीत काँग्रेसचा जो शाही परिवार आहे, त्याने या कृत्याचे कौतुक केले, त्याला ते स्वतःचे भूषण समजत आहे. देशाला बदनाम करणाऱ्यांची ते तारीफ करत आहेत. अशी काँग्रेस, जी देशविरोधी आहे, ती कोणत्याही राज्याचे भले करु शकत नाही. ती आसामच्या युवकांच्या कल्याणाचा कधीही विचार करू शकत नाही.
मित्रांनो,
आजकाल, जगात सगळीकडे, अगदी आपल्या आजूबाजूला ही युद्धाजन्य परिस्थिती आहे. या युद्धाची भीषणता किती आहे, हे आपण सगळे रोजच बघतो आहोत. युद्धामुळे जी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा सामना करण्यासाठी, आपल्या देशातल्या नागरिकांना त्याची कमीविता झळ पोहोचावी, यासाठी आम्ही अनेक प्रयत्न करत आहोत. लोकांना याचा कमीतकमी त्रास व्हावा, अशी आमची इच आहे. अशावेळी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडून अशी अपेक्षा होती, की त्यांनी एका जबाबदार राजकीय पक्षाची भूमिका पार पाडावी. मात्र काँग्रेस देशहिताच्या या महत्त्वाचा कामात देखील पुन्हा एकदा नापास झाली आहे. आपल्या देशातल्या लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, देश अडचणीत यावा, आणि नंतर मोदींना भरभरून बोल लावता यावे, यासाठी काँग्रेस संपूर्ण जोर लावून प्रयत्न करते आहे.
मित्रांनो,
काँग्रेससाठी, आसाम मधल्या असो किंवा मग देशातल्या काँग्रेसकडे, कुठलीही दूरदृष्टी नाही, देशासाठी काहीही विधायक योजना नाही. म्हणूनच, त्यांनी, अफवा, खोटेपणा यांचाच आधार घेतला आहे. जसे की खोटे खोटे रिल बनवण्याचा जणू कारखानाच उघडला आहे. त्यालाच आपले ह्या बनवले आहे. जगातील ज्या शक्तींना भारताचा गतिमान विकास मानवत नाहीये, भारताची प्रगती बघवत नाहीये, अशा लोकांच्या हातातली कळसूत्री बाहुली होण्याची दुर्दैवी वेळ काँग्रेसवर आली आहे. म्हणूनच, आसामच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक तरुणाला काँग्रेसपासून सावध, सतर्क राहण्याची गरज आहे.
मित्रांनो,
आसाम असो, बराक खोरे असो, आता हे विकासाच्या मार्गावर चालू लागले आहे. बराक खोरे, आपली विशिष्ट भाषा, साहित्य, आपली संस्कृती यासाठी ओळखले जाते. बराक खोऱ्याला आता लवकरच, विकासाचे नवे केंद्र म्हणूनही ओळख मिळेल.
मित्रांनो,
आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद द्यायला आले आहात. राजकारणाच्या भविष्याची दिशा शोधणारे, ती सांगणारे जे तज्ञ लोक असता, जे अनेक प्रकारच्या संधी त्यासाठी शोधत असतात, त्यांना, आजचे बराक खोऱ्यामधले हे दृश्य, टी गार्डन समूहातील दृश्य, कालचे बोडो समुदायातील दृश्य हे स्वच्छ पणे सांगत आहे, की येणाऱ्या निवडणुकांचे निकाल काय लागणार आहेत. आपण सगळे इतक्या मोठ्य संख्येने इथे आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि विकासाच्या प्रकल्पांसाठी आपले पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
माझ्यासोबत म्हणा --
भारत माता की जय!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
वंदे मातरम्!
***
यश राणे / सुवर्णा बेडेकर / सुषमा काणे / राधिका अघोर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2240333)
अभ्यागत कक्ष : 7