नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे पश्चिम आशियातील हवाई प्रवासाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष, भारतीय विमान कंपन्यांची रियाधसाठीची विमान सेवा पुन्हा सुरू

Posted On: 12 MAR 2026 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2026

नागरी हवाई  वाहतूक मंत्रालय पश्चिम आशियातील बदलती परिस्थिती आणि त्याचा भारत तसेच या प्रदेशातील देशांदरम्यानच्या हवाई प्रवासावर होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि विमान उड्डाणांचे कामकाज सुव्यवस्थितपणे पार पडावे, यासाठी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विमान कंपन्या आपल्या कार्यान्वयनात आवश्यक ते बदलही करत आहेत.

​या अनुषंगाने, भारतीय विमान कंपन्यांद्वारे रियाधला जाणारी /रियाधवरून येणारी विमान सेवा 12 मार्च 2026 पासून पुन्हा सुरू केली गेली आहे. सेवा पुन्हा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी, एअर इंडिया आणि इंडिगोद्वारे मुंबईसाठी तीन विमाने आणि एअर इंडिया एक्सप्रेसद्वारे कालिकतसाठी एक विमान चालवले जात आहे. अशा तऱ्हेने भारत आणि रियाध (सौदी अरेबिया) दरम्यान महत्त्वाचा  हवाई संपर्क  पुन्हा सुरु झाला आहे.

28 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत आखाती देशांमधून एकूण 1,50,457 हवाई प्रवाशांनी भारतात प्रवास केला आहे.

याव्यतिरिक्त, कार्यान्वयीन व्यवहार्यता आणि त्या त्या वेळच्या परिस्थितीशी अधीन राहून, भारतीय विमान कंपन्यांनी 12 मार्च 2026 रोजी पश्चिम आशियातील अबू धाबी, दुबई, फुजैराह, जेद्दाह, मस्कत, रास अल खैमाह, रियाध आणि शारजाह यांसह विविध शहरांमधून भारतात येणाऱ्या 57 विमानांचे वेळापत्रकीय नियोजन केले आहे.

प्रवासी वाहतूक सुरळीत असावी या उद्देशाने मंत्रालयाच्या वतीने विमान कंपन्या आणि इतर संबंधित भागधारकांसोबत निकट समन्वयही राखला जात आहे. विमान प्रवासाचे दर रास्त असतील आणि या काळात तिकीट दरांमध्ये अनावश्यक वाढ केली जाणार नाही याची सुनिश्चिती करण्याकरता विमान भाड्यासंबंधित परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

विमानांचे वेळापत्रक आणि प्रवासाच्या व्यवस्थेबाबतच्या ताज्या माहितीसाठी प्रवाशांनी आपापल्या विमान सेवा पुरवठादार कंपन्यांच्या संपर्कात राहावे, असा सल्ला जारी केला गेला आहे.

मंत्रालय या परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत राहील आणि आवश्यकतेनुसार अद्ययावत माहिती जारी केली जाईल.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2239332) अभ्यागत कक्ष : 8